आष्टी तालुक्यातील साहुर क्लस्टर मधील सावंगा (पुर्न.) हे एक छोटेसे गाव. त्या गावाची लोकसंख्या ५३६ आहे. नलिनी कुकडे ही महिला सर्वसाधारण कुटुंबातील आहे. बचत गटामुळे त्यांची हिंमत वाढली. त्यांना आपल्या गावाची सुधारणा व्हावी या दृष्टीने गट स्थापना करण्याकरीता माविम सहयोगीनीला मदत केली. गावामध्ये माविमचे २ गट स्थापन झालेले होते. त्यानंतर नलिनी कुकडे यांनी ३ तेजस्विनीचे गट स्थापन केले. त्यांना आपल्या गावाबद्दल फारच आपुलकी आहे.
त्यामुळे त्या गाव विकासाच्या प्रत्येक कामामध्ये हिरीरीने भाग घेतात व आपल्या सोबत इतर सर्व महिलांना घेऊन जातात. त्यामुळे त्यांच्याप्रती महिलांची आपुलकी सतत वाढत आहे. तसेच त्या सर्व गटाच्या मिटींग सुध्दा स्वत: घेतात. गटामध्ये असलेल्या अडचणी स्वत: सोडविण्याचा प्रयत्न करतात. जर त्यांच्याकडून झाले नाही तर सी.एम.आर.सी. कार्यालयाला कळवितात. तसेच गावामध्ये त्यांनी गाव विकास समिती स्थापन केलेली आहे.
गाव समितीच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम घेतात. त्यामध्ये उदा. हिमोग्लोबिन तपासणी, स्त्रीभ्रूण हत्या, आरोग्य तपासणी शिबीर, हुंडा विरोधी, ग्राम स्वच्छता अभियान, हगणदारीमुक्त गाव, कुपोषित माता व बालकांना आहार वाटप, गरोदर मातांना आहार देण्याचे काम हाती घेवून पुर्ण केले. गावामध्ये २१ दिवसापर्यंत कुपोषित माता व बालक यांना आहार देण्याचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडल्यामुळे पी.एस.सी. साहुर व्दारे त्यांचा सत्कार करण्यात आला. आता त्यांच्यामध्ये एवढी हिंमत निर्माण झाली की कुठल्याही कामात माघार घेत नाहीत. त्यांनी वर्धा येथे झालेल्या तेजस्विनी प्रदर्शनीमध्ये भाग घेवून यशस्वी झाल्या. त्यामध्ये त्यांनी ४००० रुपये खर्च केला व त्यातून त्यांना २००० नफा झाला. आता त्यांच्यामध्ये यशस्वी उद्योजक कसे बनावे या सर्व गुणांचा विकास झाला. तसेच नलिनी कुकडे सी.एम.आर.सी. आष्टीच्या सहसचिव पदी आहे. त्यांनी इतर गावांना सुध्दा भेटी दिलेल्या आहे. त्या आपली सहसचिवाची भूमिका योग्यपणे पार पाडतात.
त्यांना त्यांच्या पतीचे योग्य सहकार्य आहे. त्यामुळे त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून त्यांची अधिकाधिक प्रगती होत आहे. त्यांच्या बद्दल सांगायचे झाले तर महिलांचे काबाडकष्ट कमी होण्याच्या दृष्टीने गावातील महिलांची अडचण जाणून घेवून सामूहिक कपडे धुण्याचे ओटे व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी टाके बांधकाम करण्यासाठी प्रस्ताव तयार करुन माविमला पाठविला. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळे गावामध्ये काम सुरु झालेले आहे. आपल्या बचत गटाच्या महिलांना चार पैसे कसे कमावू शकतील याचा विचार नेहमीच त्यांच्या मध्ये सुरु असतो. त्यांनी आपल्या गावाकरिता कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. त्या नेहमीच नवकल्पकता, बुध्दीचातुर्य व नेतृत्वगुण असलेले दिसून येतात
No comments:
Post a Comment