जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात तळेगाव येथील शिवाजी काशिनाथ शिवतारे यांनी डाळींब फळबाग लागवड करण्याचे ठरविले. ते यापूर्वी सतत १५ वर्षे जिल्हा परिषद सदस्य, शिक्षण सभापती या पदावर कार्यरत होते. त्यासोबतच त्यांना शेती करण्याचा छंद होता. त्यांनी रोजगार हमी योजने अंतर्गत ३ हेक्टर क्षेत्रावर डाळींब लागवड केली.
वेळोवेळी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन डाळींब पिकामधील आदर्श व्यवस्थापन, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन तसेच सूत्रकृमीचे नियंत्रण, उच्च प्रतीच्या डाळींब उत्पादनासाठी फर्टिगेशनव्दारे खत व्यवस्थापन अशा प्रकारे नियोजन केले. लागवड करण्यापूर्वी मे महिन्यात खड्डे खोदून त्यामध्ये सेंद्रिय पालापाचोळा, शेणखत, लिंडेन पावडरने खड्डे भरुन घेतले. नंतर लगेच ३ हेक्टर क्षेत्रावर ठिबक सिंचन संच बसवून लागवड केली.
पाण्याचे व्यवस्थापन करुन गरजेनुसार डाळींब बागेला पाणी दिले. वर्षातून तीन ते चार वेळा खुरपणी करुन निघालेल्या तणाचे डाळींब पिकाच्या बुडख्यापाशी आच्छादन करुन पाण्याची बचत केली. ट्रायकोडर्मा, पी.एस.बी. हे शेणामध्ये मिश्रण करुन प्रत्येक झाडास दोन लिटर याप्रमाणे दिले. डाळींबाची छाटणी स्वत: दरवर्षी अनुभवी कामगारांकडून करुन घेतली. फांदीची फळे आकाराने मोठी असतात यामुळे पंजा छाटणी व पोट छाटणी अशा दोन प्रकारच्या छाटणी करण्यात येतात. छाटणीनंतर लगेच एक टक्का बोर्डी मिश्रणाची फवारणी करण्यात आली.
आधुनिक तंत्रज्ञान वापरुन एका झाडापासून ३५ किलो उत्पादन मिळते. एकूण २४०० झाडांपासून ८४ हजार किलो उत्पादन झाले. यावर्षामध्ये मिळालेला सरासरी बाजारभाव २० रुपये प्रति किलो प्रमाणे १६ लाख ८० हजार रुपये एवढे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. या सोबतच डाळींबाची पॅकींग, ग्रेडिंग करुनच बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी पाठविले जाते.
शेतकऱ्यांकडून डाळींब रोपासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मागणी प्रमाणे ७० हजार डाळींब कलमे तयार करुन प्रती रोप १५ रुपये दराने विक्री करण्यात येते. त्यापासून १० लाख ५० हजार रुपये मिळाले आहेत. डाळींब विक्रीपासून व डाळींब कलमापासून २७ लाख ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे श्री. शिवतारे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment