Wednesday, August 31, 2011

बचतीचा आधार

रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यातील वेरळ गावातील बहुतेक महिला बचत गटाच्या माध्यमातून संघटीत झाल्या आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गट चळवळ या भागात चांगली रूजली आहे. अल्पशा बचतीतून आपल्या बचत गटाची उभारणी करणाऱ्या महिलांनी आता मोठ्या व्यवसायाकडे झेप घेण्यास सुरूवात केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ गावात बौद्धवाडीतील महिलांना २००६ पूर्वी व्यवसाय किंवा बँक व्यवहाराची माहिती देखील नव्हती. किबहुना आपण असं काही करू शकू असेही त्यांना वाटत नव्हते. मात्र माविमच्या सहयोगिनी समृद्धी विचारे यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे या महिला एकत्र आल्या आणि गावात एकाच वेळी सहा-सात बचत गट सुरू झाले. त्यापैकी सावित्रीबाई आणि शिल बचत गटांनी एकत्रितपणे व्यवहार करण्यास सुरूवात केली.

बौद्धवाडीतील सुवर्णा जाधव या महिलेने गावातील इतर महिलांना एकत्रित येण्याचे महत्व सांगितले. या दोन्ही बचत गटात प्रत्येकी १३ सदस्य आहेत. बचत गटातील सदस्यांनी मासिक वीस रुपयांनी बचतीला सुरूवात केली. 'दुसऱ्याकडून १० टक्क्यांनी कर्ज घेण्यापेक्षा स्वत:च्या गटातील २ टक्क्यांनी हक्काचे कर्ज भेटतयं' सुवर्णाताईंनी गटाच्या स्थापनेमागची कल्पना स्पष्ट करताना सांगितले. गटाला सुरुवातीला वैनगंगा सहकारी बँकेकडून १३ हजार रुपयाचे कर्ज मिळाले.

गटातील महिलांना व्यवसायाच्या व्यवस्थापनाचे आणि उत्पादनाचे प्रशिक्षण माविमतर्फे देण्यात आले. त्याचा फायदा या महिलांना झाला. अंतर्गत कर्जासाठी गटाचे व्यवहार चालविण्यापेक्षा व्यवसाय केल्यास दोन पैसे अधिक मिळतील या विचाराने या महिलांनी घरच्या घरी उदबत्ती, फिनाईल, मेणबत्ती आदी वस्तू तयार करून जवळच्या बाजारात विकण्यास सुरूवात केली. सुरुवातीला सरळ बाजारात जाणे या महिलांना अवघड वाटायचे. बैठकीच्या निमित्ताने पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी ठिकाणी ग्राहक मिळविण्यास सुरूवात झाली.आत्मविश्वास वाढल्यावर विक्री वाढविण्यासाठी बाजाराच्या ठिकाणीदेखील गेल्याचे शर्मिला जाधव यांनी सांगितले.

गणपतीपुळे येथील प्रदर्शनात चांगली विक्री झाल्याने महिलांचा विश्वास दुणावला. सहयोगिनींच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन सुरूच होते. गतवर्षी गटाला ५० हजाराचे कर्ज मिळाले. त्यातून महिलांनी कुक्कुट पालन व्यवसाय सुरू केला. काही महिलांनी घरच्या घरी तर काहिंनी एकत्रितपणे शेड बांधून व्यवसायाला सुरूवात केली. कोंबडी पालनाचे सर्व तंत्र या महिलांना अवगत झाले आहे. कर्ज फेडत असताना घरखर्चाला दोन पैसे हाती पडत असल्याने हा व्यवसाय पुढे नेण्यासाठी या महिला गांभिर्याने लक्ष घालत आहेत. फारशी चांगली आर्थिक पार्श्वभूमी नसल्याने व्यवसायात रिस्क न घेता आहे ते कर्ज फेडून व्यवसाय मोठा करण्याचा निश्चय या महिलांनी केला आहे.

गावातील इतर बचत गटांना मार्गदर्शन करतानाच गावातील सामाजिक कार्यातही या महिलांचा सहभाग वाढला आहे. बचत गटामुळे बाहेर पडता आलं अन् आत्मविश्वासही मिळाल्याचे या महिला सांगतात. पारंपरिक पद्धतीने कष्ट करून जीवन जगण्यापेक्षा नवे आव्हान स्विकारून स्वत:च्या व्यवसायासाठी प्रयत्न करण्याच्या विचाराने या दोन्ही गटांची परस्पर सहकार्याने यशस्वी वाटचाल सुरू आहे.

No comments:

Post a Comment