जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार संघाकडून या उपक्रमाचे स्वागतच झाले आहे. गेली अनेक वर्षे या केंद्राची मागणी सातत्याने त्यांच्याकडून केली जात होती. लोकाभिमुख प्रशासनाला चालना देणारे सांगलीचे जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी ही मागणी त्वरीत मान्य करुन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना या बाबतची कारवाई करण्यास सांगून प्रस्ताव तयार केला गेला होता. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण कामासाठी राखून ठेवलेल्या निधीतून ३० लाख रुपये देण्यात आले होते. द्राक्ष संशोधन केंद्रानेही या नाविन्यपूर्ण कामास त्वरित मान्यता देऊन आवश्यक ते सहकार्य देण्याचे मान्य केले.
या हवामान केंद्रासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार म्हणाले की, या हवामान केंद्रांना प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपये खर्च आला आहे. निविदा मागवून एका खाजगी कंपनीव्दारे या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
या केंद्रामुळे ९ कि.मी. परिघातील शेतकऱ्यांना हवेतील आर्द्रता, पाऊस, तापमान, वाऱ्याचा वेग, दिशा, ढगांतील पाण्याचे प्रमाण अशा आठ गोष्टींची माहिती दर तासाला शेतकऱ्यांना मिळेल. पुणे आणि कोलकत्ता येथून ही सेवा शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यावर्षी अवकाळी पावसाने द्राक्ष पिकाची झालेली हानी लक्षात घेता पुढील वर्षी या हवामान केंद्रामुळे शेतकऱ्यांना आवश्यक ती दक्षता घेता येईल. पिकाची हानी टाळता येईल. इकडेही श्री. बिराजदार यांनी लक्ष वेधले.
द्राक्ष पिक हे या जिल्ह्याचे मुख्य बागायती पिक आहे. त्यामुळे ही केंद्रे उभारताना ज्या ज्या भागात हे पिक घेतले जाते त्या त्या भागात ही केंद्रे उभारण्यात आली आहेत. ही केंद्रे उभारण्यामागे श्री. वर्धने यांनी व्यक्तिगत केलेले परिश्रम कारणीभूत आहेत. अवकाळी पावसाने द्राक्ष पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्ह्यात दौरा काढून त्यांनी केली होती. तसेच केंद्रीय पथकास पाचारण करुन त्या पथकाचाही सल्ला घेण्यात आला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
जिल्ह्यातील मणेराजूरी, सावळज, निमणी, कवठेएकंद, पलूस, आगळगाव, बिळूर, जत, सोनी, सुभाषनगर, वाळवा, पळशी, शिराळा, शिवणी, कडेगाव येथे ही केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार शेतकरी आपल्या पिकांचे संरक्षण करु शकतील. तसेच पर्यायाने आवश्यक ती उपाययोजना केल्यामुळे त्यांच्या उत्पादनातही वाढ होईल यात शंका नाही.
No comments:
Post a Comment