देशात महिला सक्षमीकरण चळवळीने वेग घेतला आहे. पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रात यश मिळवितानाच आपल्या पारंपरिक पाककलेच्या माध्यमातूनही महिलांनी स्वावलंबनाकडे वाटचाल केल्याची अनेक उदाहरणे आहेत. रत्नागिरी शहरातील सुरुची महिला उद्योग यापैकीच एक आहे. सुशिलाबाई दाते यांच्या महिला मंडळाकडून प्रेरणा घेत त्यांच्या कार्यकुशलतेला आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या पहिल्या स्मृतीदिनी त्यांच्याच नावाचे आद्याक्षर 'सु' आणि त्यांची पाककलेतील 'रुची' असे मिळून 'सुरुची' हे नाव संस्थेला देण्यात आले आहे.
उद्योगाच्या संस्थापिका सरोज गोगटे यांनी प्रारंभी तीन महिलांच्या मदतीने उद्योगाला सुरुवात केली. त्यानंतर आणखी चार महिला या उपक्रमात सहभागी झाल्या. पुरणपोळी, चकली, कडबोळे आदी वस्तू तयार करून त्या शासकीय कार्यालये, बाजारपेठ, रेल्वे स्टेशन आणि घरोघरी जाऊन विकले जात असे. मात्र मालाला उचल कमी असल्याने तेवढेसे यश आले नाही. अशा परिस्थितही स्मिता गावडे, विद्या पटवर्धन, गीता जोशी आदींच्या सहकार्याने उद्योगाला पुढे नेण्याचे प्रयत्न सातत्याने सुरुच राहिले.
महिलांनी एकत्रितपणे जोड व्यवसाय म्हणून १९९२ मध्ये जिल्हा परिषदेच्या कॅन्टीनसाठी निविदा भरली. ती स्विकारण्यात आल्याने कँन्टीनचा व्यवसाय सुरू झाला. उत्पन्नाची शाश्वती झाल्याने उद्योगाला थोडा आधार मिळाला. मात्र पाच वर्षानंतर महिलांनी फारसा लाभ नसल्याने कँन्टीन चालविणे बंद करून घरगुती गरजांच्या वस्तूंवर लक्ष केंद्रीत केले. मात्र कँन्टीन बंद झाल्याने उद्योगाच्या मालकीचे साहित्य ठेवण्याची समस्या महिलांसमोर उभी राहिली. काही दिवस सदस्यांच्या घरी साहित्य ठेवण्यात आले. महिलांची धडपड पाहून आजगावकरवाडीतील प्रेमजी आरस ट्रस्टने उद्योगासाठी आपल्या मालकीची जागा उपलब्ध करून दिली. त्यानंतर या महिलांनी मागे वळून पाहिलेच नाही.
कामकाजातील व्यस्ततेमुळे महिलांना घरातील कामासाठी वेळ कमी मिळत असल्याने 'फास्ट आणि रेडीमेड फूड' ला मोठी मागणी असते. विशेषत: सणाच्यावेळी ही मागणी आणखी वाढते. हेच डोळ्यासमोर ठेऊन 'सुरुची'च्या माध्यमातून या महिलांनी मागणीप्रमाणे फराळ करून देण्यास सुरुवात केली. काही दिवसातच हा प्रयोग यशस्वी ठरला. पदार्थांचा दर्जा आणि चव चांगली असल्याने मागणी वाढू लागली. घरोघरी जाऊन पदार्थ विक्री बंद झाली. उलटपक्षी ग्राहकच आजगावकरवाडीत येऊन ऑर्डर नोंदवू लागले.
पदार्थ तयार करताना गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड न करण्याचे धोरण स्विकारतानाच उद्योगातील महिलांसाठी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उद्योगाच्या ठिकाणीच प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. आज १० ते १५ महिलांना या उद्योगात रोजगार मिळाला आहे. वस्तूंची खरेदी, हिशेब ठेवणे, विक्री, ऑर्डर स्विकारणे अशी कामे महिलांना वाटून देण्यात आली आहेत. हिशेब चोख असल्याने लेखापरिक्षणात या महिला उद्योगाला 'ब' वर्ग देण्यात आला आहे.
दिवाळीच्या फराळाची तयारी २० दिवस पूर्वीपासून सुरू करण्यात आली आहे. घरातील कामे सांभाळून सोईप्रमाणे संस्थेच्या सदस्या कामासाठी वेळ देतात. दिवाळीच्या काळात चिवडा, शंकरपाळे, चकली, करंज्या,अनारसे, लाडू आदी पदार्थांना चांगली मागणी असल्याचे अध्यक्षा विद्याताईंनी सांगितले. एरवी पुरणपोळी, उकडीचे मोदक, कडबोळी आणि चकल्या मागणीप्रमाणे तयार करून देण्यात येतात. पदार्थंाच्या विक्रीतून होणाऱ्या लाभातून महिलांच्या नावे पोस्टात रक्कम ठेवली जाते. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे कार्यक्रमही त्यातून आयोजित करण्यात येतात. महिलांना रोजगार देताना सामाजिकतेचा जपलेला पैलू या संस्थेचे मुख्य उद्दीष्ट आहे.
वयाची साधारण साठी ओलांडलेल्या महिला सामाजिक भावनेतून एकत्रितपणे काम करताना बघून इतर महिलांचा उत्साहदेखील वाढतो. कामाच्या ठिकाणी असणारी तन्मयता आणि उत्साह बरेच काही सांगून जातो. इतरांची दिवाळी गोड करण्यासाठी परस्परातील गोडवा जपत या महिलांनी पुढे नेलेला हा उद्योग इतरही महिलांना प्रेरक आहे. त्यांनी तयार केलेल्या लाडूचा गोडवा कदाचीत कमी-जास्त असू शकेल किंवा चकलीतला कुरकुरीतपणा कमी होईल मात्र त्या उद्योगासाठीचे प्रयत्न आणि त्यामागची भावना लक्षात घेतल्यास हे पदार्थ आणखी चविष्ट लागतील. इतरांसोबत आपलीही दिवाळी गोड करावी ती अशी...!
No comments:
Post a Comment