दापोली शहराला लागून असलेल्या जालगावमधील रस्त्याच्या कडेला असलेल्या देवळापासून उजव्या बाजूला गव्हे गावाला जाण्यासाठी अरुंद रस्ता आहे. रस्ता दाट झाडीतून जातो. या रस्त्याने जातानाही कोकणातील पारंपरिक वृक्षांसह अनेक रानफुलांचे सौंदर्य पहायला मिळते. गावात शिरताना 'अमृते' नाव विचारल्यावर 'वर टेकडीच्या टोकाला' एवढं ठरलेलं उत्तर मिळतं. रस्त्याने दिसणारा 'निसर्ग सहवास ' नावाचा फलक पाहिल्यावर दाट झाडीतील एखादे हॉटेल असावे असाच अंदाज येतो. प्रत्यक्षात याठिकाणी पोहोचल्यावर फळझाडांची कलमं उपलब्ध करून देणारी बाग असावी असंच वाटलं. वरच्या बाजूस घराला लागून टेबल-खुर्च्या असल्याने चहा-नास्त्याची सोय आणि झाडातून भटकंती एवढंच काय ते असावं असं वाटलं. मात्र अरविंद अमृते यांच्याशी गप्पा सुरू झाल्या आणि त्या ऐश्वर्यामागचे परिश्रम आणि जागेचे खरे सौंदर्य क्रमाने समोर येऊ लागले...
...मुंबई येथे विकास अधिकारी म्हणून काम करणाऱ्या अरविंद अमृते यांची आर्थिक स्थिती तशी चांगलीच. पत्नी शैलजा अमृते यादेखील नोकरी करीत. मात्र गावातील माती, माणूस आणि पाणी यासाठी प्रत्येकाने काहीतरी करावं या तत्वज्ञानावर निष्ठा असलेल्या अमृते यांनी नोकरी सोडून कोकणचा रस्ता धरला. त्यांनी अर्ध्या एकर जागेवर फळझाडांची लागवड केली. फळबाग फुलविताना निसर्गाचं अवलोकन आणि त्यातूनच नवे प्रयोग सुरू झाले. श्री.अ.दाभोळकर यांच्यासारख्या तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथे द्राक्षाच्या डॉग्रीजचा साठा करून त्याचे कलम करण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी केला.
'जे जे आपणासी ठावे...' या तत्वानुसार आपल्या परिसरातील तरुणांना कलमाचे शास्त्र शिकविण्यासाठी गव्हे येथे त्यांनी २०० ते २५० तरुणांच्या बॅचला प्रशिक्षण देण्याचे सुरू केले. आतापर्यंत ४००० पेक्षा जास्त तरुणांनी ही कला शिकून नाशिक परिसरात रोजगार मिळविल्याचे अमृते अभिमानाने सांगतात. एकीकडे प्रशिक्षण सुरू असताना दुसरीकडे फळबागेचे क्षेत्रफळ आणि फळप्रक्रीया उद्योग विस्तारत होता. फळबागेतील यशस्वी प्रयोगांमुळे त्यांना उद्यान पंडीत तर शैलजा अमृते यांना जिजामाता कृषिभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आज २० एकराच्या बागेत आंबा, काजू, फणस, चिकू, कोकम, नारळ अशी अनेक झाडे आढळतात. फळबागेसोबत असलेल्या नर्सरीत १८० प्रकारची फुलझाडे आहेत. केवळ गुलाबाचे ८३ प्रकार आहेत. गुलाब कोकणात प्रथम आणल्याचे अमृते अभिमानाने सांगतात. फळापासून अनेक प्रकारचे ज्यूस, जॅम आणि इतर पदार्थ तयार करून पर्यटकांना इथे उपलब्ध करून दिले जातात. २५ वर्ष ही फळप्रक्रियेची यशस्वी परंपरा सुरू आहे. परिसरातील महिलांना रोजगार मिळावा म्हणून शैलजा अमृते यांनी बचत गटाचा संघ तयार केला आहे. या संघाच्या माध्यमातून ५० बचत गट उभे राहिले असून या महिलांना कोकणातील पारंपरिक उत्पादनावर प्रक्रीया करून उत्पादने विकण्याचे प्रशिक्षण त्या स्वत: देतात. आम्ही भेट दिली तेव्हा नुकत्याच नाचणीपासून कुरकुरे बनविण्याच्या यंत्राची माहिती कृषि विद्यापीठातून घेऊन त्या परतल्या होत्या. 'आपल्या गरजा कमी ठेवायच्या आणि जे आपल्यापाशी आहे ते इतरांना द्यायचं' हेच यशाचं रहस्य असल्याचं या दाम्पत्याने सांगितले. यांचा मुलगा आशिष याने वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन कृषि पर्यटनाच्या क्षेत्रात अल्पावधीतच यश मिळविले आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे मुंबईत शिक्षण घेतल्यावर वडिलांनी प्रयत्नाने उभारलेल्या 'हिरव्या' ऐश्वर्यात आणखी भर घालण्याचा निश्चय करून कृषि पर्यटनाकडे वळण्याचा निर्णय त्याने घेतला. त्याच्याच प्रयत्नांना येणाऱ्या पर्यटकांसमोर अभिमानाने ठेवणारा हा 'निसर्ग सहवास' आहे...
...हे पर्यटन केंद्र उंच टेकड्यावर असल्याने परिसराशी निसर्ग शोभा एका नजरेत दिसते. दारातून प्रवेश करताच अनेक फळझाडांची कलमे स्वागतासाठी असतात.खाली आणि वरच्या बाजूला दाटझाडी असल्याने याठिकाणी निवास व्यवस्था असेल असे प्रथमदर्शनी वाटत नाही. समोर अमृते यांचे निवास, खालच्या बाजूस कलमांचे प्रशिक्षण देण्यासाठी लहानशी खोली, घराच्या समारेच्या बाजूस असलेल्या टेंटमध्ये टेबल-खुर्च्या मांडलेल्या, सभोवती अनेक पर्यटकांच्या भेटीची छायाचित्रे लावलेली...मात्र हे ओलांडून पुढे गेल्यावर निसर्गाचा अदभूत 'सहवास' मिळतो.
अनेक रंगांची फुले, झाडात लटकणारे झोपाळे, लाल मातीची वाट, लाकडी तंबू आणि एका ठिकाणी पिंपळाच्या झाडाकडे नजर गेल्यावर तर आपली पाऊले थबकतातच. झाडाच्या वरच्या टोकाला मोठी झोपडी बांधलेली दिसते. बाजूच्या लाकडी जिन्याने वर गेल्यावर तर सुखद धक्का बसतो. या लाकडी झोपडीत डबलबेडसह हॉटेलच्या रुमप्रमाणे सर्व प्रकाराच्या सुविधा उपलब्ध आहेत. मुळात या झोपडीवजा घराचे चारही कोपरे ज्या कल्पकतेने पिंपळाच्या फांद्यांवर फिट केले आहे ते पाहता येणारा प्रत्येक पर्यटक या कल्पकतेला सलाम करतो. या 'ट्री हाऊस'च्या खिडकीचा पडदा बाजूला सारताच समोरच्या अद्भूत निसर्गाच्या दर्शनाने पाऊले तिथेच रेंगाळतात. समोर असते हिरव्यागार डोंगरांची रांग आणि सभोवती असणारी दाट झाडी. अनेक प्रकारचे पक्षी या ठिकाणाहून आपल्याला पहायला मिळतात.
सायंकाळची वेळ आणि त्यातच दापोलीला आणखी एक भेट असल्याने मनात असूनही चटकन खाली उतरावे लागले. थोडं पुढे गेल्यावर त्याचप्रकारचा सुखद धक्का देणारे 'लॉग हाऊस' आहे. हेदेखील लाकडापासून बनविलेले आहे. फयान वादळात पडलेल्या झाडाच्या लाकडापासून ते बनविल्याचे आशिषने सांगितले. विशेष म्हणजे या लाकडी खोलीला टाईल्स बसविल्या आहेत आणि बाथरूममध्ये सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. या दोन्ही हाऊसच्या मधोमध असलेल्या तंबूत मोकळ्या हवेत चहा किंवा जेवण घेता येते. इथल्या कॉटेजेस मध्ये वारली पेंटींग्ज'चा उपयोगही नाजूकपणे करण्यात आल्याने आतही प्रसन्न वाटते.
या पर्यटन केंद्राचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. याठिकाणी फळप्रक्रिया करताना किंवा कलम करण्याच्या प्रक्रियेत स्वत: काही वेळ सहभागी होता येते. मुलांना शिडीद्वारे झाडावरून नारळ तोडून त्यातील पाणी पिण्याची वेगळीच मज्जा मिळते. पारंपारिक खेळ, पाण्यात डुंबण्याची मजा, दाट झाडीतील विविधरंगी पक्ष्यांच्या सहवासात मनसोक्त भटकंती आणि सोबत अस्सल कोकणी पदार्थाची चव चाखण्यासाठी हे निवास न्याहरी केंद्र पर्यटकांच्या आवडीचे केंद्र बनले आहे. अमृते कुटुंबियांचे ३२ वर्षाचे श्रम या कृषि पर्यटन केंद्रामागे आहे. त्यासोबतच या कुटुंबियांचा मृदु स्वभाव आणि आतिथ्यशिलता पर्यटकांना मनापासून भावणारी आहे. म्हणूनच काही सेलेब्रिटीजनीदेखील या ठिकाणाला भेट दिल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना मोबाईलच्या जगातही सुंदर पत्र लिहिले आहे. कोकणातील सौंदर्य पर्यटकांना असेच भुरळ पाडणारे आहे. इथल्या निसर्गाचे महत्व नव्या पिढीला उमगू लागले आहे. त्यामुळेच निसर्गाचे रक्षण करतानाच त्यामाध्यमातून रोजगारासाठी कृषि पर्यटनासारख्या पर्यायाकडे तरुणवर्ग आकर्षित होत आहे. कोकणच्या विकासासाठी ही आश्वासक बाब म्हणावी लागेल. त्यातच आशिषसारख्या तरुणांचा आदर्श असला की परिसरात अशी पर्यटन केंद्र निश्चितच विकसित होतील. अर्थात त्यासाठी अरविंद आणि शैलजा यांच्यासारख्या थोरल्यांच्या कष्टाची पार्श्वभूमी आणि आशिर्वाद असले तर आणखी उत्तम.
No comments:
Post a Comment