या विधानमंडळाला ७५ वर्षे पूर्ण झाली. काल राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. विधानमंडळाच्या गौरवास्पद वाटचालीचा आणि संस्मरणीय परंपरेचा उल्लेख करताना सुदृढ लोकशाही निर्मितीतील विधिमंडळाचे योगदान यावेळी आवर्जून अधोरेखित झालं.
आज कार्यक्रमाच्या दुसर्या दिवशी विधानमंडळात प्रवेश करतानाच वातावरणातील प्रसन्नता जाणवत होती. राज्याच्या विकासासाठी योगदान देणार्या आणि लोकहितकारी कायद्याची निर्मिती करणार्या या वास्तूला खूप सुंदर सजवण्यात आले होते. या सगळ्या गोष्टी मन वेधून घेत होत्याच पण त्याही पेक्षा आज जाणवणारा आनंद वेगळा होता. वैचारिक भूक भागविणार्या अनेक परिसंवादाचे आयोजन आज करण्यात आले होते.
विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना लोकहिताच्या अनेक प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चर्चा, संवाद आणि वाद-प्रतिवाद होत असतात. राज्याच्या विकासाला गती देताना समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देण्याचाच सगळ्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे आज विविध विषयांवरील ही भाष्ये ऐकताना मतभेदातही सुसंवादाचे आणि विकासाबाबत असलेल्या एकमताचे रंग मिसळलेले दिसत होते. आपल्या समृद्ध आणि सशक्त लोकशाहीचे हे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे हे सातत्याने जाणवत होते. एरवी विधिमंडळ कामकाजाच्या निमित्ताने इथे आल्यानंतर असे अनेक अनुभव येतात. आजही तेच क्षण परिसंवादाच्या निमित्ताने अनुभवायला मिळाले आणि तितकेच मनाला भावून गेले.
एखाद्या विषयावर आत्ता एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप करणारे विधिमंडळ सदस्य हे थोडय़ा वेळानंतर तितक्याच मित्रत्वाच्या नात्याने पुन्हा एकमेकांशी बोलू लागतात, एकमेकांच्या खांद्यावर मित्रत्वाचा हात टाकून चालू लागतात, हे पाहणं आणि त्यांच्या संवादातील सत्व शोधणं ही एक खूप आनंददायी बाब आहे. आजही असंच काही अनुभवायला मिळणार होतं. म्हणून परिसंवादात सहभागी झालेल्या मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या विचारांची दिशा जाणून घेण्याची आणि यानिमित्ताने मिळणार्या वैचारिक खाद्याची ओढ होती.
आघाडी सरकारची अनिवार्यता आणि आव्हाने, शिक्षणाचा हक्क, प्रचलित शिक्षण पद्धती व जागतिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तिच्यापुढील आव्हाने, दारिद्र्य निर्मूलन योजनांचे मूल्यमापन आणि पुनर्विलोकन, विधानमंडळाप्रती जनतेच्या असलेल्या आशा-आकांक्षा आणि विधानमंडळाचे उत्तरदायित्व, आर्थिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात महिलांचा सहभाग व समान न्यायाची संधी, सामाजिक न्यायाच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये शासकीय योजनांची फलश्रुती, पत्रकारितेचे बदलते स्वरूप आणि विधानमंडळाची अपेक्षा अशा विविध विषयांवर हे परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. कालसुसंगत अशा या विषयांवर साधक-बाधक चर्चा, मत-मतांतरे आणि अपेक्षित सुधारणा यावर चर्चा घडवून आणताना करीत असलेल्या कार्याचे मूल्यमापन करून त्यात सुधारणा सुचविणे, कार्यान्वयीन यंत्रणा अधिक तत्पर, पारदर्शक आणि गतिमान करून त्यांच्यातील उत्तरदायित्वाची भावना वाढविण्याचे प्रयत्न करणे, त्यावर मत व्यक्त करताना राज्य नजरेसमोर ठेवून भाष्य करणे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या वेगळेपणात भर टाकत होत्या. पक्षीय राजकारणापलिकडे जाऊन राज्याच्या विकासासाठी समर्पित होण्याची भावना यावेळी प्रत्येकाकडून व्यक्त होत होती. विरोधक आहोत म्हणून विरोध करायचा अशी मानसिकता न ठेवता व्यक्त होणारा प्रत्येक शब्द महाराष्ट्राच्या परिपक्व अशा वैचारिक अभिव्यक्तीची साक्ष देत होता.
जागतिकीकरणाने जशा अनेक संधी निर्माण केल्या तसेच त्यातून अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत. या प्रश्नांचे संधीत रुपांतर करून राज्याच्या विकासाप्रती समर्पित होताना सामाजिक न्याय, सामाजिक समता आणि सामाजिक हक्कांचे रक्षण यासाठी कटिबद्धता बाळगणार्या विचारांची ही मैफल सर्वांच्याच कार्याची दिशा स्पष्ट करीत होती. आधुनिकीकरणामुळे, तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मिळणारे लाभ, त्यातून निर्माण होणारे प्रवाह आणि त्यांची भविष्याकाळातील दिशा स्पष्ट करणार्या या विचारांचा, यातून साधावयाच्या विकासाचा केंद्रबिंदू होता मात्र सामान्य माणूस !
सकारात्मक हेतूने केलेली कोणतीही समिक्षा ही गुणवत्तापूर्ण आणि सुयोग्य परिवर्तन घडवून आणत असते. आज विकासाच्या अनेक क्षेत्रात क्रांतीकारी बदल घडून येत आहेत. त्या बदलांची दखल घेण्याला जेवढे महत्व आहे तेवढेच अंधारलेल्या दिशांमध्ये आशेची एक पणती पेटविण्यासाठी केलेल्या प्रयत्नालाही. आपण काय करतो आहोत, आपण काय केले पाहिजे, आपले कुठे चुकते आणि या चुका आपण कशा दुरुस्त केल्या पाहिजेत हे जाणून घेणं, आपली समीक्षा आपणचं करणं आणि विकासाच्या संधी ‘कॅच’ करणं ही खूप आशादायी आणि स्वागतार्ह बाब आहे. अमृतमहोत्सवानिमित्ताने आयोजित करण्यात आलेले हे परिसंवादही असेच शुभलक्षणी पाऊल आहे.
विधानमंडळाच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने होत असलेले हे लोकहितकारी मंथन राज्याच्या विकासासाठी फलदायी ठरेल आणि यातून आपल्या राज्याची उज्जवल परंपरा आणि त्यातून प्रतिबिंबित होणारा सामान्य माणूस यांची दोघांचीही जपणूक होईल एवढे नक्की.!
No comments:
Post a Comment