राज्यात बचत गट चळवळीचा विकास वेगाने झाला आहे. बचत गटांच्या संख्येत वाढ होत असताना त्यांच्या कामातील गुणवत्ताही वाढावी यासाठी विविध पातळींवर प्रयत्न केले जात आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाने यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. रत्नागिरी येथील महामंडळाचे 'बिझनेस डेव्हलपमेंट सर्व्हिस सेंटर' सुरू करण्यात आले आहे. या सेंटरच्या माध्यमातून बचत गटांना व्यवसायासंबंधी मार्गदर्शनाचे विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
कोकणातील बचत गटांना व्यावसायिक स्वरुपाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता वाढवावी या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळाने एप्रिल २०१० मध्ये रत्नागिरी येथे 'बिझनेस डेव्हलपमेंट सर्व्हिस सेंटर' ची सुरुवात केली. सेंटरमध्ये एका व्यवस्थापकाच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रमोटर्स नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील बचत गटाच्या महिलांना आपला व्यवसाय विकसीत करण्यासाठी मार्गदर्शन करणे तसेच उत्पादनात नाविन्य आणण्यासाठी प्रेरित करण्याचे काम हे प्रमोटर्स करतात.
सेंटरद्वारे कोकणातील बचत गटांना त्यांच्या व्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्यात येते. त्याचबरोबर त्यांना पॅकेजिंग आणि लेबलींगचे तंत्र शिकवून उत्पादनाचे मुल्य वाढविण्यासाठी प्रवृत्त करण्यात येते. कोकणात प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून विविध उत्पादने तयार केली जातात. यात ज्युस, जॅम, मिठाई, तळलेले पदार्थ आदींचा समावेश आहे. या उत्पादनांना आकर्षकपणे ग्राहकासमोर सादर केल्यास दर जास्त मिळतो. हे तंत्र आतापर्यंत झालेल्या प्रशिक्षणाच्या दहा सत्रातून तीन हजारपेक्षा जास्त महिलांपर्यंत पोहचले आहे.
प्रशिक्षणांतर्गत महिलांना पॅकेजिंगची प्रात्यक्षिके करून दाखविली जातात. शिवाय व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या नव्या तंत्राची माहिती देण्यात येते. उत्पादनाची नोंदणी कशी करावी, बाजारपेठेचा अभ्यास कसा करावा, व्यवसाय वृद्धीचे तंत्र आदी माहितीदेखील देण्यात येते. सोबतच कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्याचे तंत्र शिकविले जाते. प्रशिक्षण घेणाऱ्या महिला उत्पादनाच्या दर्जाबाबत अधिक जागरूक असतात, अशी माहिती या केंद्राच्या वैभवी घाटवीलकर यांनी दिली.
केंद्रातर्फे महिलांना विविध मॉल्समध्ये अभ्यास भेटीसाठी नेले जाते. उत्पादक, विक्रेते, अधिकारी आणि महिला यांची एकत्र बैठक घेऊन गरजानुरूप उत्पादन करण्यासाठी महिलांना मार्गदर्शन करण्यात येते. प्रत्येक बॅचमध्ये ३० महिलांचे प्रशिक्षण होते. या महिलांना प्रदर्शनात उत्पादन विक्रीसाठी कॅनोपी (टेन्ट) उपलब्ध करून दिला जातो. केंद्रातर्फे लवकरच विभागीय स्तराचे मोठे प्रदर्शन भरवून बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे.
माविमच्या विकास केंद्रातर्फे दिले जाणारे प्रशिक्षण घेतल्याने बचत गटातील महिलांच्या उत्पादनाला मॉल्समधूनही मागणी येत आहे. लांजा, पाली, सिंधुदूर्ग येथील सुपर मार्केटमध्ये बचत गटाची उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. शिवाय विविध ठिकाणी होणाऱ्या प्रदर्शनातही अशा बचत गटाच्या उत्पादनाला चांगली मागणी येत आहे. केंद्राद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन ५० पेक्षा अधिक बचत गटांनी बाजारपेठेत आपल्या उत्पादनाची ओळख प्रस्थापित करण्यात यश मिळविले आहे. हे यश इतरही बचत गटांना उत्पादन आणि विपणनाचे तंत्र शिकण्यास प्रवृत्त करणारे आहे आणि हेच या केंद्राचेही यश आहे.
No comments:
Post a Comment