नागपूर जिल्हयातील उमरेडपासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर नवेगाव आहे. या गावाची लोकसंख्या २८८१ असून गावाची विशेषत: अशी की या गावातले सर्व ग्रामस्थ हे गावविकासाच्या दृष्टीने पछाडलेले आहेत. या गावातील ग्रामस्थांचा असा मानस आहे की, आणखी थोडया कालावधीनंतर नवेगाव साधू हे गाव भारतातील अव्वल क्रमांकाचं आदर्श गाव म्हणून झळकेल व त्यासाठी कष्ट करण्याची प्रवृत्ती या गावात निदर्शनास येते. यासाठी त्यांनी प्रथमत: स्वच्छता विषयक सर्व घटकाच्या अनुषंगाने पावलं उचललेली आहे.
या गावातल्या कोणत्याही रस्त्यावरुन फेरफटका मारला असता असे दिसून येते की ,स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण अशी कामे त्यांनी केलेली आहे. या गावात कुठेही उघडी गटारे वाहात नाहीत, सांडपाण्यासाठी सर्वांना नाल्या बांधून दिल्या आहेत. गाव हागणदारीमुक्त केले आहे, त्यामुळे दुर्गंधीचा लवलेशही नाही, दुर्गंधीच नसल्याने मच्छरांनाही स्थान नाही. प्रत्येकाकडे शुध्द पिण्याचे पाणी जाईल, याची व्यवस्था केली आहे. आरोग्याची पुरेपूर काळजी घेतली गेली असल्याने दोन वषांर्पासून गावात कोणतीही साथ फिरकली नाही. लोक डॉक्टारांचा पत्ता देखील विसरले आहेत.
गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी या ग्रामपंचायतीला प्रचंड कष्ट घ्यावे लागले. सर्वप्रथम प्रत्येकाच्या घरी शौचालय बांधकाम करण्यासाठी बाध्य केले. गावात जाता-येता शौचालय बांधकामाची विचारणा केली तसेच शौचालय बांधण्याच्या विषयावर अनेक बैठका घेतल्या गेल्या. यात महिलांच्या वेगळ्या सभा आयोजित करण्यात आल्या या सभामधून संडास नसल्याचे अपाय समजावून सांगितले व शौचालयशिवाय महिलांची होणारी अडचण यावर विशेष भर देण्यात आला. रस्त्यावर लोटा घेऊन कोणी बसू नये म्हणून पाळत ठेवण्यात आली. बाई असो की बापडा, लोटा घेऊन दिसला की, त्याला फूल देऊन गांधीगिरीचा मार्ग ग्रामस्थांनी अवलंबला. अनेक प्रसंगी बायांच्या शिव्याही ग्रामस्थांनी खाल्ल्या, पण तरीसुद्धा हार न मानता स्वच्छतेचा ध्यास त्यांनी सोडला नाही.
सततचे कार्यक्रम व मार्गदर्शन, गावफेरी शौचालय नसलेल्या घरांना भेट, गवंडी प्रशिक्षण, गावस्वच्छता कार्यक्रम विद्यार्थ्यांची प्रभातफेरी इ. उपक्रम गावातील युवक मंडळ व महिला बचत गटाव्दारे राबविण्यात आले. याचा परिणाम प्रत्येक घरी शौचालय बांधकाम पूर्ण झालेत, व त्याचा वापर होऊ लागला. काही ग्रामस्थ ग्रामपंचायतीनं बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांचा सुदधा वापर करु लागले त्यामुळे आपोआपच उघडयावरील शौचविधी करण्याची प्रक्रिया समूळ नष्ट झाली आणि गाव निर्मळ झालं. पूर्वी गावासभोवतालच्या जागेत गावकरी शौचास जात. ती जागा गावक-यांनी श्रमदानाच्या माध्यमातून बगीचा व नैसर्गिक सभागृह तयार करुन सुशोभित केली आहे. तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण गावाचा कचरा टाकण्यासाठी सिमेंटच्या कचराकुंडया उभारलेल्या आहेत. यापासून खत तयार करण्यात येते. भूजल पातळी राखण्याच्या उद्देशाने सांडपाण्यासाठी शोषखड्डे केले आहेत. पावसाचे पाणी वाहून जाऊ नये यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम तयार करुन विहिरीत ते पाणी सोडण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या सर्व कामगिरीमुळे केंद्र शासनाचा सन २००८-०९ मध्ये सदर गावास निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे.
ग्रामस्वच्छता अभियानाबरोबरच जलसंवर्धनाचाही प्रकल्प ग्रामस्थांनी हिरिरीनं राबवला. रुफवॉटर हार्विस्टिंगचा प्रयोग गावात सुरु झाला. छतावर पडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब साठवण्यासाठी गावकरी प्रयत्न करु लागले. आजूबाजूच्या घरांतील छतांचे पाणी विहिरीत साठवलं जाऊ लागलं.
सांडपाणी जमिनीत मुरवण्यासाठी शोषखड्डयांसोबतच स्वतंत्र सांडपाणी व्यवस्थापन तंत्र अवलंबण्यात आलं. गावपरिसरात शेततळी खणली गेली. गावाची पाण्याची समस्या कायमची संपली शेतशिवारही हिरवीगार होऊ लागली. गांडूळखत निर्मितीचा व कंपोस्ट खत निर्मितीचा पथदर्शी प्रकल्प शाळा व ग्रामपंचायतींन राबविला आहे. त्याचा अवलंब गावकरी करु लागले आहे. गोबरगॅस प्रकल्प गावात सुरु झाले आहे. स्वत: निर्मिलेली वीज घराघरात खेळू लागली.
गावात कुठेही पानठेला नाही, त्यामुळे खर्राशौकीन प्लास्टिक कुठेही टाकत नाहीत. दारुबंदी असल्याने गावात एकही दारुचे दुकान नाही. दारुच पोटात जात नसल्याने तंटामुक्त गावाची संकल्पना एका झटक्यात प्रत्यक्षात उतरली. तंटामुक्त गाव म्हणून गेल्या वर्षी दोन लाख रुपयांचे, तर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना अंतर्गत जिल्हयातून पहिले आल्याबददल ५ लाख रूपयांचे पारितोषिक शासनाकडून गावाला मिळालेले आहे.
आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे, या गावात पहिली ते सातवीपर्यंत एकच शाळा व अंगणवाडी आहे. मात्र, ही शाळा पाहिल्यानंतर शहरातील कॉन्व्हेंटलाही ती मागे टाकेल, इतकी चांगली उभारलेली आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी, छोटी मुलेच वापरु शकतील असे पिटुकले संडास, हिरवळीचे चोहीबाजूने नटलेले बगिचे, ठिकठिकाणी रेखाटलेले सुंदर वाक्प्रचार व म्हणी, संताची शिकवणूक, संस्काराचे संदेश, भिंतीवर चित्ररुपी रेखाटलेले सुंदर वाकप्रचार व म्हणी, प्रत्येक मुलाला शाळेत जावसंच वाटेल अशीच रचना या शाळेची केलेली आहे. छोटीशी प्रयोगशाळाही या शाळेत आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे,. या गावाचा गावक-यांनी केलेला विकास खरोखरच कौतुकास्पद असाच आहे.
No comments:
Post a Comment