बचतगट म्हणजे नुसता आर्थिक कणा सक्षम करणारी चळवळ नव्हे तर तो आहे प्रगतीच्या दिशेने झेपावणारा आत्मविश्वास !अशाच एका आत्मविश्वासाची कथा सांगत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाची सहयोगीनी कल्पना गजभिये.
महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत रमाई स्वयंसहाय्य महिला बचत गट मु.वडेगाव, पो. मांढळ, ता. कुही येथे २९ मार्च २००४ रोजी गटाची स्थापना सहयोगीनी ताईच्या मदतीने झाली. गट स्थापन करतांना खूप अडचणी आल्या. अनंत अडचणीतून आमचा गट निर्माण झाला. महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत आयोजित अनेक कार्यक्रम (बैठका) मध्ये सर्व गावातील महिला एकत्रित आल्या. त्यामुळे आमची एकमेकींची ओळख दाट झाली. आणि संबंध जवळचे झाले.
गटामुळे बँकेचे व्यवहार कळले. बचत झाली आणि माझ्याप्रमाणेच गरजू महिलांची अडचण दूर झाली. नंतर मी एलआयसी एजन्ट झाले सुरवातीला खूप अडचणी आल्या. लोकांशी बोलायचे कसे ? बाहेरगावी जाऊन लोकांच्या पॉलीसी काढायच्या कशा ? तसेच गावातील लोक वाईट शब्दात बोलायचे पण मी हिम्मत हारले नाही. जिद्दीने प्रयत्न करीतच राहीले.
बचतगटामुळे माझा व्यवसाय वाढू लागला. गटामुळे संबंध जवळ आले. याची मदत एलआयसी व्यवसायाच्या कामात आली. गटामुळे हिम्मत वाढली आणि आज मी मोठ-मोठ्या ऑफीसमध्ये जाऊन पॉलिसीधारक करु लागले. माविमने मला बोलायला शिकविले माविमची भेट यापूर्वी झाली असती तर माझी जास्त प्रगती झाली असती.आज दोन हजार रुपये कमावून मी माझ्या कुटुंबाचे पालन करते
जीवनात वादळं खूप आली. पण बचतगटामुळे सावरले. वेळोवेळी गटातून आर्थिक मदत झाली. म्हणून तर म्हणते माविमने मला पोटाशी धरलं आणि माझ्या संसाराचे संकट टळलं. माझ्या माविमने मला दूर लोटल नाही. मी माविमची सदैव ऋणी राहीन आता तर मी गावातील अन्य भगिनींना एलआयसी एजन्ट म्हणून काम करण्याबद्दल मार्गदर्शन करते. माझ्याप्रमाणेच माझ्या अन्य भगिनी जर एलआय सी एजन्ट झाल्या तर त्यांना भांडवल न गुंतवता या व्यवसायाच्या माध्यमातून कमिशन मिळेल. व आपला चरितार्थ अतिशय चांगल्या प्रकारे करून समाजात ताठ मानेने जगता येईल.
याकरिता गरज आहे, ती जिद्दीची, संघर्षाची, फिरण्याची आणि वाट पाहण्याची. संधी आपल्या जवळच आहे तिचं सोनं करा माविम आपल्या पाठीशी आहे. माविमच्या आधारावर पुढचे पाऊल टाका म्हणजे यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली सापडेल.
तेव्हा माविमच्या लेकींनो पुढे हरू नका आपल्याला जिंकायचे आहे. जिंकायचे आहे माझ्यात जिद्द होती म्हणून मी हरली नाही. म्हणून जिंकले !
No comments:
Post a Comment