ग्लोबल वॉर्मिंगचा धसका अख्या जगाने घेतला आहे. वृक्षतोड सातत्याने सुरु राहिल्यास निश्चितच ऋतुचक्र बदलून मोठा दुष्परिमाण भोगावा लागेल हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. सामाजिक वनीकरण विभाग वृक्षलागवडीसाठी दरवर्षी प्रयत्न करीत आहे. शासनाबरोबरच नागरिकांनी जेथे पुढाकार घेतला आहे तेथे परिस्थिती आशादायी असल्याचे पहायला मिळते.
'लावा वृक्ष मिळवा मोक्ष' हे ब्रीदवाक्य प्रत्येकजण ऐकतो. मात्र प्रत्यक्ष कृतीतून वृक्षलागवड करताना फार कमी जण पुढे येतात. मोताळा तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वृक्षलागवडीसाठी कसोशिने प्रयत्न केले आहेत. मोताळा-नांदुरा मार्ग, मोताळा-राजूर, वाघजाळा फाटा- रोहीणखेड, मोताळा-शेलापूर या मार्गावर रस्त्यांच्या दुतर्फा लावलेली झाडे आज ऐटीत डोलत आहेत. गेल्या तीन ते चार वर्षापासून हे अधिकारी-कर्मचारी मेहनत घेत आहेत. विभागामार्फत लावण्यात आलेल्या रोपट्यांचे आता वृक्षात रुपांतर होत आहे. मोताळ्याहून नांदुरा, मलकापूर व बुलडाणा तसेच धामणगाव बढे हे मार्ग वनराईने बहरले असून रस्त्यांच्या दुतर्फा आकर्षकपणे डोलत आहेत.
उन्हाळ्याच्या दिवसात या विभागाने ज्या रोपट्यांना पाण्याची आवश्यकता होती त्यांना टँकरने पाणी देऊन जगविले आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी असली तरी रोपटे लावून त्यांना जगविण्याची धडपड खरोखरच कौतुकास्पद आहे. आज रस्त्यांच्या दुतर्फा हजारो वृक्ष डोलताना दिसून येतात. विशेष म्हणजे सामाजिक वनीकरण विभागामार्फत हजारो रोपटे ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिक व ग्रामपंचायतीने यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता वाढली आहे. लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने शासनाने पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना सुरु केली. त्यामध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग वाढला तर सर्वांच्याच हिताचे ठरेल.
No comments:
Post a Comment