गावात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहयोगिनीने बचत गटाविषयी माहिती दिल्यावर नेहमीच्या कष्टापेक्षा काहीतरी वेगळे करण्याच्या निश्चयाने रतीया रुके यांच्या नेतृत्त्वाखाली गावातील महिला एकत्र आल्या. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर बचत गटाची स्थापना केली. रोजच्या मजूरीतून बचत करणे कठीण असतानादेखील दररोज दहा रुपयाप्रमाणे त्यांनी बचत सुरू केली. डोंगराळ भागात भातशेतीची कामे करतांना सायंकाळी बचत गटाविषयी चर्चा होत असे. स्टेट बँकेने दिलेल्या १२ हजाराच्या कर्जातून अंतर्गत गरजा भागवितांना भाजीपाला विक्री, पापड तयार करणे अशा व्यवसायाने गटाच्या कामाला सुरुवात केली. या व्यवसायातून दोन पैसे हातात पडल्यावर या महिलांचा उत्साह वाढला. घरातून सुरुवातील थोडा विरोध झाला मात्र गटाचे महत्व लक्षात आल्यावर पुरुषमंडळीदेखील गटाला प्रोत्साहन देऊ लागली. 'माणसं नाय म्हणायची, पर पैसा कोणाला नकोय' एका महिलेने आपली प्रतिक्रीया व्यक्त केली. विशेष म्हणजे आता झालेल्या बदलामुळे या महिलांशी संवाद साधतांना पुरुषमंडळी गटाच्या कामाविषयी भरभरून आमच्याशी बोलत होती.
पहिल्या कर्जाची परतफेड झाल्यावर दुसरे १.३४ लाखाचे कर्ज दुग्ध व्यवसायासाठी मंजूर झाले. त्यातून प्रत्येक महिलेच्या घरी दोन गायी आल्या. म्हशींना पाणी जास्त लागत असल्याने गायी घेणे पसंत केल्याचे रुके सांगतात. बँकेमार्फत आणखी १.७५ लक्षचे कर्ज मंजूर झाले. पशुखाद्यासाठी ३० हजार वेगळे मिळाले. पाण्याची सोय व्हावी म्हणून ग्रामस्थांच्या मदतीने टाकी बांधून घेतली. त्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून १२ हजाराची मदत मिळाली.
गायींना चारापाण्याची व्यवस्था लक्षपूर्वक करण्यात आल्याने चांगले दुध मिळू लागले. शेतीची कामे करतांना जोडीने हे काम करणे महिलांना सहज शक्य होते. प्रत्येक घरात ५ ते ६ लिटर दुध आता मिळते आहे. शेजारील फुरुस येथील डेअरीत दररोज ४० ते ५० लिटर जाते. प्रत्येक महिलेला घरासाठी दुध आणि दररोजच्या घरखर्चाची रक्कम हाती पडते. कर्जाची नियमीत परतफेड करण्यात येत असून गोठा बांधण्याचा निश्चय या महिलांनी केला आहे. डोंगराळ भागातील तीन एकर शेतावर पुरुषांच्या मदतीने हळदीची शेतीदेखील प्रथमच करण्यात येत आहे. घरातील पुरुषांना दोन पैसे मिळत असतील असे म्हटल्यावर 'आमचे पैसे पुरुषांना नाही देत, आमच्या उपयोगासाठीच असतात' एका महिलेची उत्स्फुर्त प्रतिक्रीया..
गटात काम केल्यामुळे या महिलांना प्रथमच बँकेचे व्यवहार कळू लागले आहेत. त्यासाठी कांचन मोरे या सहयोगिनीला त्या मनापासून धन्यवाद देतात. त्यांच्यातला विश्वास वाढला असून या महिला गटाच्या प्रगतीविषयी गांभिर्याने बोलतात. एका महिलेने भ्रमणध्वनी क्रमांक सांगतांना चक्क 'नाईन, एट, डबल टू...' असे सांगितल्यावर आम्ही चकीतच झालो. चाळीस वर्षाची ही महिला मुंबईत काही काळ राहिल्यानंतर गावात गटाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करते आहे. अशा प्रयत्नातूनच ग्रामीण भागात ही चळवळ मजबूत होऊन महिलांना स्वावलंबनाकडे नेत आहे.
No comments:
Post a Comment