मी अल्का शैलेश वाळके, ता. रामटेक खैरी विजेवाडा ( शितलवाडी) येथील रहिवाशी आहे. याआधी मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राहत होते. माझे पती दवाखान्यामध्ये काम करीत होते. दवाखान्यात कायम स्वरुपी होईल या आशेने २ लाख रुपये भरले. परंतु हातात अपयश आले कारण काही दिवसांनी ती संस्थाच बंद पडली. त्यानंतर माझे पती बेरोजगार झाले. कुठलेही काम मिळत नव्हते. अशा वेळेला पोट भरायचे कसे हा मोठा गहन प्रश्न उभा राहीला. मी याआधी घराबाहेर कधीही गेलेली नव्हती. बाहेरचे जग काय आहे हे मला माहिती नव्हते. त्यामुळे जीवन कसे जगावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला.
मी आपल्या मनाशी निर्णय घेतला की आपण शेतातल्या कामाला जायचे, शेतातील काम कधीही केलेले नव्हते. परंतु आता करण्याशिवाय पर्याय नव्हता. मी बाजूच्या ताईबरोबर शेतात जाऊ लागली. पण मला काम येत नसल्यामुळे शेतमालक मला रागवला व बाजूच्या बाईला म्हणयला लागले की उद्या या बाईला कामाला आणू नका. पोट भरण्याचा प्रश्न समोर उभा राहिला तेव्हा कसेतरी हळूहळू शेतीतील काम मी शिकले.
एक दिवस मी बॅकेत गेले तेव्हा मला सहयोगीनी निशाताई भेटल्या. मी त्यांच्याकडून गटाविषयी माहिती घेतली. आम्हाला त्यांनी गटाविषयी माहिती सांगितली. गटाची संकल्पना प्रशिक्षण दिले. आम्हाला गटाचे महत्व समजले आणि आम्ही ५० रुपये प्रमाणे पैसे भरुन रमाई महिला सक्षमीकरण या योजेनअंतर्गत लुंम्बीनी महिला बचत गट स्थापन केला.
सहा महिन्यानंतर बँकेतून कर्ज घेण्याचे ठरविले. आम्हाला माविमने बरेच प्रशिक्षण दिले. त्यांनतर ग्रेडेशन केले व बॅकेतून ५०,०००/- रु. पहिले कर्ज मिळाले. या पैशाचा वापर
चांगल्या प्रकारे व्हावा म्हणून मी काही तरी उद्योग करण्याचा निर्णय घेतला. गटाला कर्जाची मागणी केली. आज गावामध्ये गरीब व्यक्तिंचे कपडे फाटले, कपडे मापाचे नसले किंवा नविन कपड्यांना शिलाई बरोबर नसल्यास घरबसल्या एका फोनवर कपडे अल्टर करण्यासाठी माझ्याकडे येतात.
गावामधून माझ्याकडे बरेच कपडे अल्टर करण्याकरिता येत असतात. आणि मी १५,००० रु कर्ज घेऊन शिलाई मशीन घेतली आणि शिलाई कामाचा व्यवसाय सुरु केला या व्यवसायामुळे मी घरी बसून शिलाई काम करीत असते, त्याचप्रमाणे पिको फॉल सेंटर चालविते त्यातून २००० रु महिना नफा मिळाते व याच व्यवसायाने मी माझं घर चालविते.
आम्ही दोघेही पती पत्नी आता खूप सुखी आहोत . आज बचत गटामुळे मी माझा परिवार स्वत:च्या पायावर उभा आहे याचा मला अभिमान आहे. मी जर बचत गटामध्ये सहभागी होऊन पुढाकार घेतला नसता , किंवा शेताचे काम येत नाही असे म्हणून घरी रडत बसले असते तर आज माझा व्यवसाय उभा झाला नसता आणि मी स्वत:च्या पायावर उभी झाली नसते म्हणून माझे इतरांना हेच सांगणे आहे की, बचत गटाला खूप महत्व आहे, त्याचे खूप फायदे आहे. फक्त आपण त्यासाठी प्रयत्न व गटात एकजुटीने काम करायला पाहीजे.
प्रयत्न केल्याशिवाय फळ मिळणार नाही किंवा यश मिळणार नाही हेच खरे अशा प्रकारे बचत गटामुळे माझा विकास झालेला आहे. त्यामुळे मी माविमची खूप आभारी आहे. कारण माविमने बचत गटाची सुरुवात केली नसती तर आम्हाला बचतगटाचे महत्व कळले नसते. आणि माझी जीवनात प्रगती झाली नसती. मी माविमची शतश: आभारी आहे.
No comments:
Post a Comment