आठवडाभरापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शासकीय कार्यक्रमानिमित्त परभणी येथे मुक्कामी होते. त्यांच्या या शासकीय दौ-याची सुरुवात उद्योजकांच्या भेटीने तर शेवट अधिका-यांच्या आढावा बैठकीने झाला. शेतक-यांच्या हितासाठी अनेक योजना राबविण्यासोबतच उद्योगांनाही प्रोत्साहन, असे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे स्थानिक उद्योजकांच्या समस्या, उद्योगांची अवस्था प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीने परभणीचा नुकताच दौरा केला. या समितीत अध्यक्ष दिलीप मोहिते पाटील यांच्यासह आमदार रवींद्र वायकर, आमदार सुभाष झनक, आमदार अब्दूल राशीद, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार विनोद घोसाळकर, आमदार मोहन जोशी, आमदार अशोक जाधव, आमदार प्रदीप जाधव नाईक, आमदार शिरीष कोतवाल यांचा समावेश होता.
महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीने आपल्या दौ-याची सुरुवात अजय बाहेती यांच्या दत्तकृपा रोलर फ्लोअर मिलपासून केली. गाड्यांचा ताफा मिलच्या प्रवेशद्वाराजवळ येताच मिलच्या मालकासह अधिकारी आणि कर्मचा-यांनी समितीतील आमदारांचे स्वागत केले. मिलची पाहणी करताना सर्व आमदारांनी मिलमधील प्रत्येक युनीटची जाणीवपूर्वक पाहणी केली. डाळ कशी निर्माण होते, पीठ आणि बेसन यांची निर्मिती कशी केल्या जाते, उत्पादित झालेला नवीन माल कुठे निर्यात होतो आदींबाबत आमदारांनी जाणून घेतले. गत चार वर्षांत जवळपास १०० कोटींची उलाढाल असलेला हा उद्योग आणखी वाढावा त्यासाठी शासन स्तरावर मदत केली जाईल. तसेच या उद्योगासोबतच कर्मचा-यांचे हितसुध्दा जोपासावे, असा सल्ला समितीने बाहेती यांना दिला. त्यानंतर आमदारांच्या गाड्या रोकडेश्वर दाल मिल आणि नंतर इटको स्पिनर्सकडे वळल्या. तब्बल ६०० कोटींची उलाढाल असलेल्या इटको स्पिनर्समध्ये सर्व मशिन ‘चायना मेड’ असून ३६५ दिवस अविरत चालणारा हा प्रकल्प आहे. इटको जिनिंग प्रेसिंगमध्ये प्रवेश होताच सर्व आमदारांचे स्वागत करण्यात आले. कापसावर प्रक्रिया करणारा हा उद्योग असल्यामुळे आत जाण्यापूर्वी सर्वांना तोंडावर लावण्यासाठी ‘मास्क’ देण्यात आले. आमदारांनी कापसावर प्रक्रिया करणा-या मशिनपासून पाहणीला सुरुवात करीत अनेक टप्पे पार केल्यानंतर धागा कसा तयार होतो, याचे प्रात्यक्षिक पाहिले. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने आमदार आणि अधिकारी पाहून येथील कर्मचारी प्रसन्न तर वाटतच होते शिवाय त्यांच्या कामात कोणताही अडथळा येत नव्हता. महिला कर्मचारी तर नजर चुकवून कुतुहलाने आमदारांच्या आणि अधिका-यांच्या हालचाली टिपत असल्याचे जाणवले.
अखेर संपूर्ण प्रकल्प पाहिल्यानंतर येथील सभागृहात सुरुवातीला उद्योजकांच्या समस्या आमदारांनी जाणून घेतल्या. स्थानिक उद्योगाची भरभराट व्हावी, त्यातून रोजगार निर्मितीस हातभार लागावा, असा शासनाचा प्रयत्न असून या उद्योजकांच्या थेट दारापर्यंत पाणी, वीज आणि रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना समितीने अधिका-यांना केल्यात. अखेर औद्योगिक परिसराचा दौरा आटोपून विधानमंडळ अंदाज समितीचा ताफा मराठवाडा कृषी विद्यापीठाकडे वळला.
No comments:
Post a Comment