Thursday, October 13, 2011

राष्ट्रीय भूमि अभिलेख अधुनिकीकरण कार्यक्रम (NLRMP) भाग - ३

केंद्र सरकारने सध्या त्यांच्या मार्फत चालू असलेल्या भूमि अभिलेखाचे संगणीकरण व महसुल प्रशासनाचे सबळीकरण व भूमि अभिलेखाचे अद्यावतीकरण या दोन योजना एकत्रित करून सदर राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम सुरू केला आहे.सदर कार्यक्रम केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूमि साधनसंपत्ती विभागाकडून राबविण्यात येत आहे.

त्याअतंर्गत:
तहसिल,उपविभागीय/जिल्हास्तरावर संगणक कक्षाची स्थापना :-

सदर कक्षामुळे तहसिल,उपविभागीय स्तरावर जमिनीविषयक अभिलेखाचे संधारण करता येते तसेच सदर कक्षा मार्फत नागरिकाना पाहिजे असलेले अभिलेख तात्काळ उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.जिल्हा स्तरावरील डाटा बेसचा उपयोग माहितीचे वर्गीकरण,विविध विभागाच्या नियोजनासाठी व तपासणी कामी उपलब्ध होऊ शकतो.सदर कक्ष सर्वे अद्यावत यंत्रसामुग्रीने परिपूर्ण असणारा आहे त्यामुळे अभिलेखाची जिल्हास्तरावरील देवाण घेवाण व अद्यावतीकरण करणे सोपे जाणार आहे.

नोंदणी कार्यालय व महसूली कार्यालयाची अंतर्गत जोडणी :-
राज्यातील विविध भूमि अभिलेख कार्यालये,तसेच तहसील कार्यालये व नोंदणी कार्यालये LAN अथवा WAN च्या साहयाने जोडण्यात येतील त्यामुळे सर्वप्रकारचा भूमि अभिलेख तात्काळ अद्यावत करण्यास मदत होणार आहे.

आवश्यक त्या जमीनीचे भूमापन/मोजणी व पुर्निभूमापन/पुर्निमोजणी करणे व भूमापन व जमाबंदी विषयक अभिलेख अद्यावत करणे.
भारतामध्ये सर्वसाधारणपणे भूमापनचे काम १९ व २०व्या शतकात करण्यात आले आहे तर काही भागामध्ये भूमापनाचे काम करण्यावर शिल्लक आहे त्या ठिकाणी भूमापन व पूर्निभूमापन करण्याची गरज आहे.

मोजणी :-
ज्या भागामध्ये भूमापनाचे काम करण्यावर शिल्लक आहे त्या ठिकाणी भूमापन करण्याची गरज आहे.

पुर्निमोजणी :-
ज्या ठिकाणी भूमापनाचे काम करण्यात आले आहे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी मुळ भूमापनाच्या वेळीची स्थिती व सध्य स्थिती या मध्ये मोठयाप्रमाणावर फेरबदल झाले आहेत त्यामुळे भूमि अभिलेखातील मापे व जागेवरील परिस्थितीची जुळत नाही त्याची प्रमुख कारणे म्हणजे भूमापन क्रमांकामध्ये मोठया प्रमाणावर पोटहिस्से निर्माण झाले असतील किंवा मुळ भूमापनाच्या हद्दी मोठया प्रमाणावर गहाळ झालेल्या असतील ज्यामुळे जागेवरील भूमापन क्रमांकाची भूमापन नकाशाआधारे पडताळणे करणे अशक्य झाले असेल.तसेच पुर्निमोजणी ही जागेच्या वापरात मोठया प्रमाणावर बदल झाले असतील किंवा मोठया प्रमाणावर मालकी हक्कामध्ये बदल झाले असतील तर त्या ठिकाणी करणे आवश्यक आहे.

मोजणी व पुर्निमोजणी करण्यासाठी आपणाकडे शंकु साखळी,फलकयंत्र या पारंपारिक साधनासोबतच आधुनिक साधने जे ई.टी.एस.मशीनद्वारे मोजणी, जी.पी.एस. मशीनद्वारे मोजणी, हवाई फोटो मार्फत मोजणी, उपग्रहाद्वारे घेण्यात आलेल्या फोटो मार्फत मोजणी अशा विविध तंत्रज्ञान आपणाकडे आवश्यक आहे सदर तंत्रज्ञानापैकी एका किंवा अनेक तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर करून मोजणी करता येईल पण कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर सदर कामासाठी करण्याचा आहे त्यासाठी खालील पैकी एका किंवा अनेक मुद्दयांचा विचार करावा लागेल.

• जागेवरील परिस्थिती जसे मोजणी अथवा पुर्निमोजणी करण्याची जागा डोंगराळ आहे का सपाट आहे.
• मोजणी अथवा पुर्निमोजणी करण्याचे स्थळामध्ये लोकसंख्येची घनता किंती आहे.
• मोजणी अथवा पुर्निमोजणी करण्याच्या ठिकाणी बांधकामे कशी आहेत.
• मोजणी अथवा पुर्निमोजणी करण्याच्या जागेचे क्षेत्रफळ.
• मोजणी अथवा पुर्निमोजणी आवश्यक असलेली अचुकता.
• मोजणी अथवा पुर्निमोजणी लागणारा आवश्यक कालावधी
• मोजणी अथवा पुर्निमोजणी लागणारा खर्च व साधनसामुग्री.
वर नमूद बाबीचा विचार करून कोणत्या मोजणी साधनाचा वापर करण्याचा आहे ते निश्चित करण्याचे आहे.

नोंदणी विभागाचे संगणकीकरण.:-
नोंदणी विभाग हा सदर कार्यक्रमाअंतर्गतचा महत्वाचा विभाग आहे.सदर विभाग यापूर्वीच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आला नाही.सदर विभागाचे संगणकीकरण करण केले असता दस्त नोंदणीची प्रक्रीया ही जलद व सुलभ होणार आहे त्यासोबत सदर माहितीचे एकत्रिकरण अधिकार अभिलेखासोबत करण्यास मदत होणार आहे ज्यामुळे नोंदणी होताच त्याची अंमलबजावणी तात्काळ त्याच्या अधिकार अभिलेखात होईल.

जर नोंदणी विभागाचे संगणकीकरण केले नाही तर राज्याना हस्तलिखत स्वरूपात अधिकार अभिलेख ठेवणे भाग पडेल व त्यामुळे बऱ्याच अनियमीतता जसे खरी माहिती लपून राहणे ,कोणती मालमत्ता घेताना त्याचा सर्च /शोध अहवाल घ्यावा लागणे तसेच खरेदीदाराचा वेळ व पैसा काही प्रकरणात वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही हे सर्व टाळण्यासाठी सदर विभागाचे संगणकीकरण करण्याची कार्यवाही सदर कार्यक्रमाअंतर्गत करण्यात येणार आहे.

अत्याधुनिक संगणीकृत अभिलेख कक्षाची निर्मिती :-
सदर कार्यकामाअंतर्गत अत्याधुनिक संगणीकृत अभिलेख कक्षाची निर्मिती करण्यात येणार आहे.ज्यामध्ये जमीनविषयक सर्व कागदपत्रे अभिलेख ई-स्वरूपात ठेवण्यात येणार आहेत.ज्यामुळे ऑन लाईन अभिलेखाचे अद्यावतीकरण करता येणार आहे.

No comments:

Post a Comment