सन २०१० ते ऑक्टोबर-२०११ पर्यंत महाराष्ट्र, गुजरात राज्यातील वेगवेगळया कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करुन त्यांना धुळे जिल्हयातील उमेदवारांच्या मुलाखतीसाठी बोलावून मोठया प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींच्या मुलाखती आयोजित केल्या होत्या.
धुळे जिल्हयात धुळे, शिरपूर, पिंपळनेर या ठिकाणी मोठया प्रमाणात रोजगार मेळाव्यांचे आयोजन करुन या दोन वर्षाच्या कालावधीत २,४५० बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिलेली असून ते धुळे, बारामती, शिरपूर, बडोदा, दोंडाईचा, वापी, पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. अशा काम करणा-या युवकांनी नोंकरी करताना व्यवस्थापनाकडून चांगले सहकार्य मिळत असल्याचे सांगून कामात समाधानी असल्याच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रात सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांप्रती असलेले कर्तव्य व इतर बाबीबाबत थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे
५३ हजार बेरोजगार उमेदवारांची नोंदणी
जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, धुळे येथे ५३,००० बेरोजगार उमेदवारांची नावे नोंदणी झालेली असून त्यात प्रामुख्याने अशिक्षित उमेदवारांपासून ते पदवीपर्यंतच्या सुशिक्षित उमेदवारांची नावनोंदणी केली जाते. परंतु शासकीय नोकरीचे प्रमाण पाहता प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराला शासकीय नोकरी मिळेलच असे नाही.
शासनाच्या नवीन रोजगार व स्वयंरोजगाराच्या धोरणानुसार सुशिक्षित बेरोजगार उमेदवाराला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार मिळण्यासाठी शासकीय नोक-या, निमशासकीय नोक-या, स्वयंरोजगार योजना, रोजगार मेळावे आदी माध्यमांची अंमलबजावणी रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडून करण्यात येते.
रोजगार मेळाव्याचे प्रभावी आयोजन-
धुळे जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या वतीने महाराष्ट्र व गुजरात राज्यातील मोठ-मोठया कंपन्यांच्या व्यवस्थापनांशी नियमितपणे संपर्क करुन रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रात नावनोंदणी झालेले दहावी, बारावी, पदवीधर तसेच आय.टी. आय., तांत्रिक शिक्षण घेतलेले विभागाचे सुशिक्षित बेरोजगार व लहान-मोठे तांत्रिक कोर्स केलेल्या बेरोजगार उमेदवारांना मोठया प्रमाणात रोजगार मिळवून देण्यात आला आहे. सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची कंपनी व्यवस्थापनाकडून फसवणूक होऊ नये, त्यांना कामाचा योग्य मोबदला मिळावा यासाठीही वारंवार चर्चा केली जाते.
सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळण्यासाठी सन २०१० पासून आज पर्यंत जिल्हयात वेगवेगळया ठिकाणी आठ रोजगार मेळावे भरवून महाराष्ट्र व गुजरात राज्यातील नामांकित कंपनीच्या व्यवस्थापनेला सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना ४ हजार ८०९ उमेदवारांमधून २,४५० उमेदवारांची प्राथमिक निवड होऊन रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली असून त्यात प्रामुख्याने २८ एप्रिल, २०१० रोजी पीआयजीओ व्हेईकल प्रा. लि. कंपनी, बारामती या कंपनीने आय.टी.आय. झालेल्या ५१७ तांत्रिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन दिला.
३ ऑगस्ट, २०१० रोजी बन्सवार सायंटिक लि. सुरत या कंपनीने शिरपूर आयटीआय मध्ये फक्त टेलरिंग काम करणा-या महिलां रोजगार मेळाव्यात ३१५ महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली. तसेच १३ ऑगस्ट, २०१० रोजी बडोदा येथील अपोलो टायर्स व्यवस्थापनाने बी.एस.सी. /डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक, सिव्हील इंजिनिअरींग झालेल्या ५६ उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली. दि. २७ ऑक्टोबर, २०१० रोजी पिंपळनेर येथील दीनदयाल आदिवासी सहकारी सूत गिरणीच्या माध्यमातून एस.एस.सी. व एच.एस.सी. उत्तीर्ण असलेल्या १५० आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली तर दि. २० नोव्हेंबर, २०१० रोजी दोंडाईचा येथील युनिव्हर्सल स्टॉर्च केम. अलाईड कंपनीत आयटीआय फिटर, डिझेल मेकॅनिक सिव्हील इत्यादी २१५ बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली.
दि. २० एप्रिल, २०११ रोजी व्हेस्पा इंडिया प्रा. लिमिटेड, वापी येथील कंपनीने नावनोंदणी झालेल्या एस.एस.सी. व एच.एस.सी. १०५ सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली असून ३० जुलै, २०११ रोजी पीआयजी कंपनी, बारामती आयटीआय हेल्पर पदांकरिता ८२५ सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली तर दिनांक १२ ऑक्टोबर २०११ रोजी वेंकटेश्वर्या हेचरिंज प्रा.लि. पुणे मध्ये १००, धुळे येथील ओमशांती उद्योगात १७, उज्वल अटोमोबॉईल्समध्ये (टाटा मोटर्स) १५० अशा एकूण २६७ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे संपूर्ण कामकाज संगणकीकृत झालेले असल्यामुळे जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना विविध प्रकारच्या कार्यालयीन सेवाही मिळतात. त्यात एस.एम.एस. द्वारे मुलाखतीची माहिती, नुतनीकरण आदि विविध उपक्रमही अधिकारी, कर्मचा-यांच्या समन्वयाने यशस्वीरित्या राबविण्यात येत आहेत.
No comments:
Post a Comment