Thursday, October 13, 2011

माझ्या आरश्यातील जपान

नरिता एअरपोर्ट ही अक्षरे वाचल्यावर जे काही वाटलं ते शब्दातीत आहे.पटापट कॅमेरे काढून आम्ही दिसेल त्याची छायाचित्र टिपण्यास सुरवात केली.मोकळे आणि स्वच्छ रस्ते,फुले,हिरवळ अगदी दिसेल ते.या दिवशी जेट लॅक खूप त्रास होत असल्याने पहिल्या दिवशी झालेली लेक्चर्स डोक्यावरुन गेली.भारतातून या उपक्रमात १२० जण सहभागी झालेले होते.यांची पाच गटात विभागणी करण्यात आली.या गटांना जपानमधील वेगवेगळी शहर दाखविण्यात येणार होती मी हयोगो गटात होते.हयोगोसाठी आम्ही नरिता एअरपोर्टहून ओसाकाला एएनए फ्लाईटने आलो.

कोबे शहरातील पोर्टापिया या पंचतारांकित हॉटेलमध्ये आम्ही चेक इन केल.जपान मध्ये असल्याचं थ्रिल जाणवत होतं. आमची रुम विसाव्या मजल्यावर होती त्या दिवशी थकल्यामुळे पाठ टेकताच झोप लागली.रोज सकाळी वेकअप कॉल असायचा.आणि मजेशीर भाग म्हणजे रोज नाश्त्यापूर्वी बॉडी टेंपरेचर चेक होत असे.आमच्यापैकी बऱ्याच जणांना यायला उशीर होत असे अशा वेळी प्लीज बी ऑन टाईम असं हसऱ्या चेहऱ्यान म्हणण्यापलिकडे आमच्या जपानी सुपरव्हायजरने काहीही म्हटलं नाही.कोबेतल्या मुक्कामात आम्ही बरीच ठिकाणे पाहिली जपानचा सगळयात जुना आणि तितकाच अप्रतिम मानला जाणारा हिमेजी कॅसल मला खूपच भावला.शत्रूची फसगत व्हावी अशी त्या किल्ल्याची रचना होती. अगदी साध्यासुध्या दगडाच्या रचनेमागेही विशिष्ठ प्रयोजन होतं.यावेळी मला आपल्या महाराष्ट्रातील शिवरायांच्या गडांची आठवण झाली. दोन संस्कृतींना जोडणारा धागा गवसला.

दिवसभर गडावर फिरल्यानंतर मात्र आम्ही खूप दमलो होतो.पण नियोजनानुसार आणखी कोठेतरी जायच होतं.आम्ही कसेबसे कोकोएन अर्थात पारंपारिक उद्यानात पोचलो.आणि सगळा शीण नाहीसा झाला.तिथली हिरवळ,छोटाश्या तलावातलं संथ पाणी, तलावातले रंगीबेरंगी मासे आणि शिरशिरी आणणारी थंडी आमचा थकवा कुठल्या कुठे पळवून गेली.मरगळलेले चेहरे उत्स्फूर्तपणे हसले आणि झालं आमचं फोटो सेशन सुरु. निसर्गाच्या कुशीतील तो दिवस चटकन सरला.

दुसरा दिवस आपत्‍कालीन व्यवस्थापनासाठी राखून ठेवण्यात आला होता तंत्रज्ञानात अफाट प्रगती करत असताना निसर्गाचं लेणं मायेनं जपणारा नव्हे वाढवणारा हा जपान हे दुर्मिळ रसायन जाणवलं आणि आश्चर्यचं वाटलं. जपान म्हटल्यावर जश्या गोंडस बाहुल्या ,सुबक पंखे आठवतात तसेच दुर्दैवाने आठवतात तेथील भूकंप.१९९५ साली अशाच एका भीषण भूकंपाने आम्ही रहात असलेल्या कोबो शहराचा घास गिळला होता.आपत्कालीन व्यवस्थापनाच्या चर्चासत्रात आम्हाला या विषयी अनेक माहितीपट दाखवण्यात आले.निव्वळ पंधरा वर्षाच्या तुरळक कालावधीत ते शहर ज्या जिद्दीने पुन्हा उभारलं होतं आणि सौंदर्यानं वाढवलं होतं ते पाहून आम्ही चाट पडलो,आणि मनोमनी जपानच्या अथक प्रयत्नांना तसेच राष्ट्रीय स्पिरिटला सलाम ठोकला.

टी सेरिमनी जपानचं आणखी एक वैशिष्टय. या सांस्कृतिक उपक्रमाविषयी आम्ही ऐकून होत मात्र अनुभव नसल्याने उत्सुकता होती. या सेरिमनीत दिला जाणारा ग्रीन टी अतिशय कडू असतो.तो पिता यावा म्हणून गोड असा केक दिला जातो.गोड केक खाल्यावर चहाच्या कडवटपणाचाही आनंद मनमुराद लुटता येतो असे मानतात. तो प्यायची विशिष्ट पध्दत असते. वज्रासनात बसून, चहा देणाऱ्या व्यक्तीला नम्रपणे वाकून नमस्कार करुन चहाचा कप दोनदा फिरवावा लागतो. मुख्य म्हणजे तोंडातून अवाक्षरही बाहेर न काढता या कडवट चहाचे घोट घ्यावेत असा संकेत आहे. ऐकलं होतं तितका तो कडू जाणवला नाही.हाच ग्रीन टी आम्हाला करावयासही शिकवला. हा लाईफ टाईम एक्सस्पिरियन्स अर्थात (इचि गो इचि ) घेऊन समाधानाने आम्ही पुढील कार्यक्रमाकडे वळलो.

मुकोगावा महिला विद्यापीठास भेट हा पुढील कार्यक्रम होता. तिथली शिक्षणपध्दती अनुभवायची ती एक चांगली संधी होती.तिथला कॅम्पस दाखवायला प्रत्येक व्यक्तीसाठी एका विद्यार्थ्यीनीची नेमणूक केली होती.माझ्या वाटयाला १७ वर्षाची ओची आइ सान आली.कॅम्पस पहाण्याच्या निमित्ताने तिच्याशी अगदी मनसोक्त गप्पा मारल्या. हा परिसर अफाट तसेच अतिशय स्वच्छ होता.यामध्ये स्वतंत्र पिआनो रुम,डान्सरुम,कॅलिग्राफीचे दालन, प्रशस्त वाचनालय, क्रिडांगण, अनेक सभागृहे व इतर अनेक गोष्टींचा समावेश होता. वेळेअभावी आम्हाला संपूर्ण परिसर पाहता आला नाही.त्यांच्यापैकी निवडक विद्यार्थीनीनी आमच्या समोर प्रेझेंटेशन्स केली. तसेच प्रयोगशाळेत नेऊन काही प्रयोगही करुन दाखवले,एवढेचं नाही तर आम्हाला त्यात सहभागीही करुन घेतले.नंतरच्या देखण्या सांस्कृतिक कार्यक्रमात समृध्द संस्कृती प्रतिबिंबीत होत होती. शक्य तेवढा भारत त्यांच्यासमोर खुला करण्याच्या प्रयत्नात आम्ही पॉवर पॉइंट प्रेझेंटशन सादर केले.एकचं देश पण इतक्या भाषा इतक्या वेषभूषा हे सर्व त्यांना नवीन होतं. त्यांच्या चेहऱ्‍यावर कुतुहुलमिश्रीत कौतुक होतं. 'वंदे मातरम' गाऊन हा कार्यक्रम संपला.यावेळी त्यांच्यासमवेत खूप फोटो काढले.त्यांना आम्हाला सोडवत नव्हतं व आमचेही पाय तिथून बाहेर पडण्यास तयार नव्हते.कायम संपर्कात राहण्यासाठी जपानी विद्यार्थ्यानी पटापटआम्हाला त्यांचे ई मेल आयडी दिले त्या हसऱ्‍या चेहऱ्यांना सायनारा (गुड बाय) म्हणताना आम्ही जपानमधील पहिला पाऊस अनुभवला.

जपानमध्ये येण्यापूर्वीपासून आम्हाला होम स्टे चे वेध लागले होते.तो क्षण आला. मी राहणार होते तेराजी फॅमिलीत. हॉटेलमध्ये राहताना भारत काय जपान काय दोन्हीही बऱ्‍यापैकी सारखेच होते. होम स्टे अनुभवताना मी खरा जपान जगणार होते.या घरात आई बाबा आणि दोन मुली होत्या. घरातील रिओ आणि एरी या दोघींशी तर माझी अगदी लगेच गटटी जमली.त्यांच्या हालचाली,हातवारे,देहबोली, शब्दोच्चार अनुभवणं किंवा जवळून पाहणं हा गमतीशीर अनुभव होता. तिथली ओकाआसान (आई) ने मी येण्यापूर्वीच गुगलवर भारताविषयी बरचं सर्च करुन ठेवलं होतं. घरातल्या सगळयांनी विशेषत: आईनं मला प्रश्न विचारुन मला अगदी भंडावून सोडलं.आई बाबांचे प्रश्न अगदी लहान मुलांसारखे मूलभूत आणि तितकेच निरागस. माझ्या तोंडून शब्द बाहेर पडायचा अवकाश की तो लगेच पाळला जायचा. त्यांना भारताविषयीचे कुतुहूल तेवढेच त्यांच्या समृध्द संस्कृती विषयी सांगत राहण्याची इच्छा. यामुळेच या दिवसात खऱ्या अर्थानं सांस्कृतिक देवाण घेवाण झाली.

भारतातील काही तरी आम्हाला खायला घाल असं ते सारखे म्हणत होते. पोहे करायचे ठरले. मी पोहे करत असताना बाबांपासून एरी पर्यंत सगळेच ओटयापाशी आले.मला साडी नेसायची आहे असे मला रियो म्हणाली.मी लगेच साडी घेऊन आले. रियोने साडी, मी किमोनो घालायचं ठरलं.मला लगेच हसू फुटलं.कारण जपानला जाऊन किमोनो घालण्यात स्वप्नपूर्तीचा आनंद मिळणार होता. जपानी लोक आणि फोटो नाहीत अशक्य या आठवणी जपून ठेवाव्यात म्हणून आम्ही शक्य तितक्या पोझेस घेऊन फोटो काढले.नंतर तयार होऊन आम्ही शॉपिंगला गेलो.

दिवसभर मॉल्समध्ये फिरलो व रात्री उशीरा जेऊन घरी आलो. रात्री खूप गेम्स खेळलो. त्यांच्या पध्दतीनुसार ते ओफुरोनी हायडू अर्थात आंघोळीला गेले.तू काय करणार असे त्यांनी मला विचारले मी क्षणाचाही वेळ न घालवता सकाळी असं उत्तर दिलं. दुसऱ्‍या दिवशी आम्ही जिंज्या (श्राईन) आणि ओतेरा (देउळ) येथे जाण्यास निघालो.जिंज्या घराजवळच एका छोटयाशा टेकडीवर होते.ही टेकडी चढून आम्ही तिथं गेलो.तिथं आलेली लोकही इनदोजिन (ही भारतीय असावी)असं काहीतरी कुजबूजत होती.त्यांना पंजाबी ड्रेसचं आर्कषण वाटत होत.हात धुऊन देवळात प्रवेश करणं,देवाला वाहन असणं,घंटा वाजवणं,नमस्कार करणं अशा अनेक गोष्टी आपल्यासाख्याच होत्या. देवळाबाहेरील परिसरही रम्य होता.तिथंही तळ, त्यात मासे आणि मुख्यत: पारंपारिक किमोनो घातलेल्या सुंदर मुली पाहताना खूप छान वाटत होतं.

आपल्याप्रमाणे तेथील लोकही भविष्य वेडे आहेत. आपण निवडलेल्याओकुजी काडीवर तर कधी दारुमासानवरआपले भविष्य लिहिलेले असते अशी त्या लोकांची श्रध्दा आहे. मी देखील गंमत म्हणून काडी उचलून भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला.संध्याकाळी जेवायला मोठया रेस्टॉरंट मध्ये जायचं की रियोच्या आजीच्या छोटया उपहारगृहात असं मला विचारल्यावर मी लगेच मला आजीच्या हातचं खायचं आहे असं सांगितलं.त्यांना माझं उत्तर खूप आवडलं.ते उपहारगृह छोटयाशा दुकानासारखं होतं. रियोची आजी मात्र प्रचंड उत्साही होती. माझा फोटो काढ आणि तो भारतात दाखव असं म्हणत आजीने लगेच वेगवेगळया पोझेसही दिल्या.मी शाकाहरी असतानाही मला त्यातल्या त्यात चालेल अशा पदार्थांची एक डिश तिने मला दिली.खर सांगते,आतापर्यंतच्या दौऱ्यात पहिल्यांदाच मला जपानी डिश आवडली. निघताना आजीने प्रेमाने मला एक किमेनो भेट म्हणून दिला.मी ही लगेच येथून नेलेली शाल तिला पांघरली,आम्ही घरी परतलो.

दुसऱ्या दिवशी मी निघणार म्हणून ते मला भेटवस्तू देऊ लागले.त्यांची पारंपारिक शोपिसेस, ओकाशी (स्विटीस), ओहाशी (चॉकस्टीक्स) अशाअनेक वस्तू दिल्या. बॅग तुम्ही दिलेल्या भेटवस्तूनी पूर्ण भरुन गेलीये हो. मी म्हटलं. किमोची मो इप्पाई (तुझी बॅग वस्तू बरोबर भावनांनी भरलेली आहे ) असे ते म्हणाले आणि टचकन त्या सर्वांच्या डोळयात पाणी आलं. मीही त्यांच्यासाठी आणलेल्या वस्तू त्यांना दिल्या. त्यांनाही मी दिलेल्या भेटवस्तू खूप आवडल्या. खरचं जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी माणसं सगळी सारखीच असतात असं जाणवलं. एरीने तिच्या अक्षरातील दोन तीन पत्रं दिली. या खेपेला वेळ थोडा होता पुढच्या वेळेला खूप दिवसांसाठी ये. मी ठरवलयं आपण काय काय करायचं असेही ती म्हणाली.

आम्हाला भारतात यायचयं आम्हाला तुझ्या आई बाबांना बघायचयं,ताजमहाल पहायचायं, गंगास्नान करायचयं.आम्ही नक्की येऊ असेही ते म्हणाले.तिथून पाय निघत नव्हता, इच्छा नसली तरी जाणं भाग होतं.पुन्हा जपानला येईन असं कबूल केल्यानंतरच त्यांनी मला सोडलं..

संध्याकाळी आम्ही आमच्या सुपरव्हयजर्सना भेटलो.जायच्या दिवशी सगळे ग्रूप एकत्र आले. दहाव्या दिवशीही सुपरव्हाजर्सचे हास्य पहिल्या दिवसा सारखेच होते. नेहमी मदतीला धावणारे हे हसरे चेहरे, स्वच्छ परिसर, हलकी थंडी हे सारं काही आम्ही आता मिस करणार होतो.आमच्या निरोपासाठी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये आम्ही सर्वानी मनसोक्त नाचून घेतलं. दहा दिवसांचा आठवणीचा खजिना घेऊन जपानला सायनारा म्हणत आम्ही मायदेशी प्रयाण केलं.


  • संपदा सतीश पंडित

  • No comments:

    Post a Comment