Sunday, October 9, 2011

अनुदानामुळे सुटला हृदयशस्त्रक्रियेचा प्रश्न

सातारा जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सर्व शिक्षा अभियान योजने अंतर्गत करण्यात येत आहे. या योजनेस अपंग समावेशित शिक्षण उपक्रमाची जोड देऊन जिल्ह्यात सर्व शिक्षा अभियान अपंग समावेशित शिक्षण अंतर्गत आरोग्य तपासणी अंती हृदय शस्त्रक्रिया करणे आवश्यक असलेल्या १४४ शालेय विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. हृदयशस्त्रक्रिया करण्यास राज्य शासनाने विशेषत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्तीश: लक्ष घालून या विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रिया करण्यास आवश्यक अनुदान उपलब्ध करुन दिल्याने गेली अनेक दिवस प्रलंबित असलेला प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लागला आहे.

सर्व शिक्षा अभियान अपंग समावेशित शिक्षण अंतर्गत शालेय आरोग्य तपासणी अभियान जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि शासनाचा आरोग्य विभाग प्रभावीपणे राबवित आहे. या तपासणीत मुलांच्या सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या करुन आवश्यकतेनुसार उपचार केले जातात. या तपासणीत गंभीर दोष आढळणाऱ्या मुलाची अधिक तपासण्या करुन निदान निश्चित करावयाचे आहे. अशा निवडलेल्या मुलाची आरोग्य तपासणी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत करून घेतली जाते. हे तज्ज्ञ डॉक्टर त्या संदर्भातील मुलांची आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया करण्याची शिफारस करतात.

दृष्टीदोष प्रवर्गातील सर्व अस्थिव्यंग, कर्णदोष/वाचादोष इत्यादी शस्त्रक्रिया स्थानिक पातळीवर सर्व शिक्षा अभियान अपंग सामावेशित शिक्षण उपक्रमाच्या अनुदानातून करण्यात येतात. मात्र हृदयाला छिद्र असणे किंवा गंभीर स्वरुपाच्या हृदय शस्त्रक्रिया सर्व शिक्षा अभियान आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान यांच्या उपलब्ध अनुदानातून करण्यात येत होत्या. तथापि सन २००९ पासून ही सुविधा बंद करण्यात आली.

जीवनदायी योजनेतून हृदय शस्त्रक्रियेसारख्या शस्त्रकिया करण्याची तरतूद आरोग्य विभागातून उपलब्ध करुन दिली असून या शस्त्रक्रिया आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या हॉस्पिटल संबंधित उपसंचालकांच्या मान्यतेतून कराव्या लागतात. यासाठी बराच कालावधी लागतो. या कालावधीत शिफारस केलेली मुले गंभीर झालेस तातडीने शस्त्रक्रिया करणे शक्य होत नाही. सातारा जिल्ह्यात अशा प्रकारची शिफारस केलेली एकूण १४४ विद्यार्थी नोंदले गेले आहेत. ० ते ६ वयोगटातील अंगणवाडीमध्ये दाखल झालेल्या व हृदयाची शस्त्रकिया करावयाची संख्या ३८ वर गेली आहे. अशा विद्यार्थ्यांच्या शस्त्रकियेसाठी सर्व शिक्षा अभियान अपंग समावेशित शिक्षण व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानमध्ये कोणतीही तरतूद नसल्याने अडचण निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेच्या पाठपुराव्यामुळे आरोग्य विभागाच्या अप्पर सचिवांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. शासनाने विशेष बाब म्हणून सातारा जिल्ह्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्ह्यातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.

जिल्ह्यातील हृदयरोग पिडित बालकांसाठी सातारा जिल्हा परिषदेनं सर्व शिक्षा अभियान अपंग समावेशित शिक्षण उपक्रमामधून कार्यकारणी समितीच्या मान्यतेने या मूलांचा प्रवास व भोजनासाठी अनुदान उपलब्ध करुन दिले. सातारा जिल्हा परिषदेच्या या निर्णयासाठी प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी परवानगी दिली. ० ते ६ वयोगटातील ३८ मुलांच्या शस्त्रक्रियेचा कार्यक्रम जीवनदायी योजने अंतर्गत मान्यताप्राप्त सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे दि. २०/६/२०११ पासून सुरू झाला आहे.

सर्व शिक्षा अभियान अपंग समावेशित शिक्षण अंतर्गत आरोग्य तपासणीअंती हृदय शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या शालेय विद्यार्थ्यांची संख्या १०६ इतकी आहे. या शस्त्रक्रिया २००८ पासून निधीच्या उपलब्धतेमुळे प्रलंबित होत्या. वरील पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने सातारा जिल्ह्याचे सुपूत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना शालेय विद्यार्थ्यांच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारे अनुदान नागपूरच्या धर्तीवर विशेष पॅकेज उपलब्ध करुन देण्याबाबत विनंती केली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या या अतिशय उपयुक्त आणि महत्वाकांक्षी उपक्रमास सहाय्य करण्याची भूमिका घेऊन तातडीने अनुदान उपलब्ध करुन दिले आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या या क्रांतीकारी निर्णयामुळे जिल्ह्यातील हृदयरोग पिडित बालकांवर हृदयशस्त्रक्रिया पुणे आणि कोल्हापूर येथील जीवनदायी मान्यताप्राप्त हॉस्पिटलमध्ये करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. जिल्ह्यातील हृदयरोग पिडित शालेय विद्यार्थ्यांच्यादृष्टीने ही एक महत्त्वाची बाब आहे.

No comments:

Post a Comment