वनविभागातर्फे चिखलदरा तसेच सेमाडोह वनक्षेत्रातील वन्यजीवांचे संरक्षण तसेच वनांच्या संवर्धनासाठी वनकर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी आमडोह ते बंदरकहू आणि पुढे पिली या गावापर्यंत वनभ्रमण आयोजित केले होते. या वनभ्रमणामध्ये मुख्य वनसंरक्षक डॉ. मोहन झा, राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाचे सदस्य किशोर रिठे, उपवनसंरक्षक बी.टी. इंगळे, चिखलदरा वन्यजीव विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी एस.एम. बेदरकर यांच्यासह निसर्गप्रेमी सहभागी झाले होते. सोळा किलोमीटरच्या जंगल सफारीमध्ये वनौषधीसह विविध प्रजातींची फुले दुर्मिळ वृक्ष, वेली तसेच वन्यजीवांची ओळख अगदी जवळून पाहण्याचा अभिनव उपक्रम वनविभागाने उपलब्ध करुन दिला होता.
चिखलदरा येथील वन विश्रामगृहापासून सुरु झालेल्या वन पदभ्रमण मोहिम सेमाडोहकडे जाणाऱ्या आमडोह फाट्यावरील निसर्ग पाऊलवाटेने सुरुवात झाली. मेळघाटचे जंगल केवळ गाडीत बसूनच अनुभवता येत नाही याचा प्रत्यही या जंगल सफारीमध्ये क्षणोक्षणी अनुभावायला मिळाला. वाघ पाहणे किंवा वन्यजीव दृष्टीस पडणे हाच केवळ या मोहिमेचा उद्देश नव्हता. आमडोह परिसरातील बोरखेडी क्षेत्रात तसेच चिखलदरा रेंजमध्ये दहा ते बारा वाघ आहेत. वाघ असल्याबदृदलच्या नोंदी कॅमेरामध्ये ट्रॅप झाल्या आहेत. संपूर्ण मेळघाटात वाघांची संख्या वाढत असल्याचे पुरावे वनविभागानेही गोळा केले आहे. वन्यजीवांच्या वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्नासोबतच त्यांच्या अधिवास क्षेत्राचे संरक्षण केल्यास वन्यप्राण्यांच्या संख्येत मोठयात प्रमाणात वाढ होऊ शकते. हे वनविभागाने सिध्द करुन दाखविले आहे.
मेळघाट परिसररात दुर्मिळ वनस्पती आहेत. या वनस्पतींची ओळख येथील आदिवासींना असल्याने त्यांच्याकडून या माहितीचा खजिना वनरक्षक गोळा करतांना येथे पहायला मिळते. वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एम. बेदरकर यांनी दुर्मिळ वनस्पती वृक्ष, प्राणी यांच्या नोंदी अद्ययावत ठेवल्या आहेत. मेळघाटातील लेंजा ही अशाच प्रकारची एक दुर्मिळ वनस्पती. लेंजा या झाडाची साल कॉफी, बोर्नव्हिटा तसेच बिस्कीट बनविण्यासाठी वापरल्या जाते. त्यामुळे या वनस्पतीचे संरक्षण अत्यंत आवश्यक झाले आहे. मुरडशेंग, घोडवेल, बेल, कोरांटी, बिजा, नागवेल, खोबरवेल (अनंतमुळ), पारवरी, निरगुडी, जंगली कापूस तसेच चित्रक सारख्या अगदी दुर्मिळ वनस्पती येथे जवळून बघायला मिळाल्या. चित्रक या वनस्पतीच्या पानात लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे आदिवासी गरोदर मातांना या पानांचे विविध पदार्थ करुन खायला देतात. वन्यप्राणीही या झाडांची पाने खातात.
होंबा, कार्वी, पांढरी मुसळी, माऊलवेल, भोरकांदा, जंगली केळी, बचनाग (पेव) ही अत्यंत दुर्मिळ असलेली आणि मेळघाटचे वैभव असलेली वनस्पती अशा दुर्मिळ वनस्पती जंगलातील पाऊलवाटेने पदभ्रमण करतानाच बघायला मिळतात.
मेळघाटात सुमारे २६५ प्रकारचे पक्षी आहेत. यामध्ये सर्पगरुड, मोर, घार, रानपिंगळा आणि पक्षांना खाद्य म्हणून रान कोंबडी विविध प्रकारचे साप आदींनी समृध्द असलेले हे जंगल जगाच्या इतर जंगलाच्या तुलनेत समृध्द असल्याची ग्वाही वन्यजीव संरक्षक किशोर रिठे यांनी दिली.
वनांचे संरक्षण करताना वनकर्मचाऱ्यांवर पडणारा ताण आणि प्रतिकूल परिस्थितीतही वनकर्मचारी विविध वन्यजीवांचे व जंगलाचेही संरक्षण समर्थपणे करतात याची माहिती देण्यासाठी अशा प्रकारच्या जंगल सफारीचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगताना मुख्यवनसंरक्षक डॉ. अनिल मोहन म्हणाले की, राज्यातील समृध्द वनसंपदा संरक्षणाची जबाबदारी सर्वांचीच आहे. वनसंवर्धनासाठी लोकसहभाग वाढावा ही अपेक्षा असतानाच मेळघाट हा परिसर जंगलांना आगी लागण्यासाठी प्रसिध्द होता. वनविभागाच्या सामुहिक प्रयत्नामुळे मागील दोन वर्षापासून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त झाल्याचेही यावेळी आवर्जून सांगीतले.
गुगामल वन्यजीव क्षेत्रातील बोरखेडी अंतर्गत चार वनखंड असून सुमारे ७ हजार ८८५ हेक्टरवर हे जंगल मोठ्या डौलाने उभे आहे. या वनपरिक्षेत्रात वाघ, हरिण, गवा, सांबर, रानडुक्कर त्यासोबत सायाळ आदी प्रजातींचे वास्तव्य आहे. वन्यजीवांसाठी सात नैसर्गिक पाणवठे असून यामध्ये बंदरकहू, आमराई, कोहूपाणी, सांबरपाणी, वारुडा, जिंगोतडा, हलदूपाणी यांचा समावेश आहे. यामध्ये साधारणत: मे पर्यंत वन्यप्राण्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध राहील. या संपूर्ण वनक्षेत्राचे संरक्षण एक वनरक्षक करतो. तो सतत तीन दिवस वनक्षेत्रातच राहतो आणि त्यांच्या मदतीला याच भागातील आदिवासी वनमजूर जंगलाच्या संरक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असतात.
मेळघाटचे समृध्द जंगलाचे समवर्धन आणि संरक्षण हे वनविभागाचे प्राथमिकता असली तरी निसर्गप्रेमींनीही आपला सहभाग दिल्यास समृध्द वनसंपदेसोबत जैवविविधता व वन्यप्राण्यांच्या सरंक्षणासाठी आपला सहभाग असल्याचा निश्चितच आनंद मिळेल. सोळा किलोमीटरच्या वनभ्रमणाचा आनंद सुमारे पाच तासात घेऊन कोलखासच्या वनविश्रामगृहाकडे परतीचा प्रवास सुरु झाला.
No comments:
Post a Comment