आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग असले तरी काही बाबींस अवास्तव महत्व आले आहे. आज घरोघरी टी. व्ही. आहेतच, टीव्ही कार्यक्रमांमुळे ज्ञान मिळते हे जरी सत्य असले तरी दूरदर्शनवर दिवसभर कार्यक्रम दाखविले जातात. त्यामुळे मुले, लहान मोठे हे बहुसंख्य वेळ हे दूरदशन कार्यक्रम पाहण्यात घालवितात, हे चित्र चांगले नाही. वाचनाशिवाय ज्ञान नाही. संस्कार नाहीत. अशा परिस्थतीत नाशिक येथील हिरकणी बचतगटाने वाचन वृध्दीची पताका हाती घेतली आहे. याबाबत एक दृष्टीक्षेप ..
मराठी पुस्तकांच्या वाचनाची गोडी सर्वसामान्यांमध्ये वाढावी व त्याव्दारे जीवनाकडे अधिकाधिक डोळसपणे बघून लहानांपासून मोठयांचे व्यक्तिमत्व समृध्द व्हावे या एका तळमळीने नाशिक येथील हिरकणी महिला बचतगटाने तीन वर्षापूर्वी पुस्तक विभाग सुरु करुन पुस्तकांची विक्री सुरु केली आहे.
केवळ स्वत:च्या आर्थिक सक्षमीकरणाचा विचार न करता वाचनवृध्दीची पताका हाती घेणारा हा राज्यातील पहिला महिला बचतगट ठरला आहे. नाशकातील रोहिणी मालेगांवकर व राजश्री दंडगव्हाळ यांच्या पुढाकारातून सन २००७ मध्ये हिरकणी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाची स्थापना झाली. या गटात एकूण दहा महिलांचा सहभाग आहे. काहीतरी वेगळं करण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. चविष्ठ खाद्यपदार्थ बनवून स्वत: आर्थिकदृष्टया सक्षम होणे त्यांना सहज शक्य होते. मात्र समाजाला ज्ञानाची शिदोरी पुरवावी , जेणेकरुन चांगल्या पुस्तकांच्या वाचनातून प्रत्येकाला एक चांगला सोबती व मार्गदर्शक लाभेल.
प्रेरणादायी पुस्तक महान व्यक्तींची चरित्र, विज्ञान व पर्यावरण विषयक माहितीचे भांडार सर्वांना खुले व्हावे, यातून व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते. या स्वानुभवाच्या जोरावर त्यांनी पुस्तक विक्री विभाग सुरु केला आहे. यात त्यांनी सर्वप्रथम सेवापूर्ती सोहळे, लग्न समारंभ वाढदिवस अशा कार्यक्रमासाठी भेट देण्यासाठी अक्षर भेट योजना सुरु केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. नंतर अक्षर दान योजना पुढे आली.
या अंतर्गत मुलींच्या लग्नात तिला माता पित्याकडून ज्ञानाचा अक्षय ठेवा मिळावा हा हेतू होता व लहानग्यांसाठी वाढदिवसाला पुस्तके भेट द्यावी म्हणून अंकुर योजना सुरु केली.
या गटाकडे सध्या पाच हजाराहून अधिक मराठीतील विविध पुस्तकांचा साठा आहे. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे नव्या को-या पुस्तकांचा संच हे उपलब्ध करुन देतात. पुस्तक विक्री करणारा हा राज्यातील पहिलाच बचतगट आहे.
मुळातच आपल्याकडे पुस्तक खरेदीसाठी खास बाजारात जाणारा वर्ग नाही म्हणून ही संकल्पना प्रत्यक्षात आणल्याचे रोहिणी मालेगाव यांनी सांगितले. आजही आपल्याकडे दहा पैकी सहा सात सात लोकांच्या मनात पुस्तके खरेदीला स्थानच नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. हे चित्र उदासीन असले तरी तीन वर्षात अनेकांमध्ये वाचन गोडी वाढविण्यात हा बचतगट यशस्वी झाला आहे.
No comments:
Post a Comment