देव दगडात नसून माणसात आहे, असे ठासून सांगणाऱ्या संत गाडगे महाराजांनी कीर्तनातूनच प्रबोधनाचा सपाटा लावला होता. हाच धागा पकडत कीर्तनातून मुलीलाही जन्माची संधी द्या अशी हाक दिली जात आहे. ही हाक सोलापूर जिल्ह्यापुरतीच मर्यादित राहिली नसून राज्याच्या कानाकोपऱ्यातही ती आता गुंजू लागली आहे.
स्त्रीभ्रृण हत्या हा संवेदनशील विषय बनला असल्याने तो रोखण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. सामाजिक संघटनाही या मोहिमेत उतरल्याने मुली वाचवा या संदेशाला आणखीनच बळकटी आली आहे. यामधील लोकसहभागाची टक्केवारी वाढविण्याची आवश्यकता पाहता पारंपरिक लोकमाध्यमांचा वापर करण्याचा प्रभावशाली प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात सुरु आहे.
प्रारंभीच्या काळात अज्ञान व अशिक्षितांचे प्रमाण अधिक असल्याने कीर्तन हे एकमेव प्रबोधनाचे प्रभावी माध्यम मानले गेले होते. विशेष म्हणजे संत गाडगे महाराजांनी या माध्यमाची ताकद काय आहे हे अनेक बदल घडवून यापूर्वीच दाखवून दिले. जातीभेद, अस्पृश्यता, हिंसाचार, सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रध्दा निर्मूलन याबाबत प्रबोधन करण्यासाठी संत तुकारामांच्या अभंगाचा वापर करीत अनेक कीर्तने गावोगावी केली जायची.
स्त्रीभ्रृण हत्या थांबविण्यासाठी मुली वाचवा हा महत्वाचा कार्यक्रम शासन स्तरावर राबविला जात आहे. या कार्यक्रमाचे महत्व जनसामान्य लोकांना कळू लागल्यामुळे केवळ शासनापुरता हा कार्यक्रम मर्यादित राहिलेला नाही. म्हणूनच बार्शी तालुक्यातील साकत येथील अवघ्या बारा वर्षाच्या सौरभ मोरे या बालकीर्तनकाराने स्त्रीभ्रृण हत्या हा विषय आपल्या कीर्तनात घेऊन त्यावर जागृतीचे काम सुरु केले आहे. नेहरु युवा केंद्रामार्फत या अभिनव कीर्तनाचे प्रयोग राज्यभर केले जात आहेत.
लाडकी लेक मी तुमची...नको मारु आई गर्भातची होईल मी झाशीची राणी, लता दीदीसारखी गाईन मी गाणी जिने दिला महाराष्ट्राला दाता, तिचे नाव आहे जिजामाता होईन मी मदर तेरेसा, तिचा घेईन वारसा लाडकी लेक मी तुमची, नको मारु आई गर्भातची मुलींचे महत्व विशद करणाऱ्या अशा रचना लोकांसमोर मांडून जनप्रबोधन सुरु केले आहे.
अवघ्या बारा वर्षाच्या असलेल्या या बालकीर्तनकाराला जर या विषयाचे गांभीर्य एवढे वाटले असेल तर मोठे म्हणून मिरवणाऱ्यांना ते किती असायला हवे आणि आईची होण्याची अपेक्षा करणाऱ्या परंतु मुलगाच हवा असे म्हणणाऱ्या स्त्रिला तर आणखी किती प्रमाणात ते असायला हवे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. स्त्रीभ्रृण हत्येबाबत जागृती करण्यासाठी कीर्तनाचा प्रभावी मार्ग वापरल्यामुळे निश्चितच या अभियानाला गती मिळाली आहे, यात तिळमात्र शंका नाही.
No comments:
Post a Comment