'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उध्दरी.` असा स्त्रीचा अगाध महिमा आहे. स्त्री साक्षात जगन्माता, वात्सल्यमूर्ती, सृजनशक्ती आहे. याच स्त्रीच्या हाती आता केवळ पाळण्याची दोरी नाही तर संपूर्ण देशाची धुरा ती वाहात आहे. स्त्री शक्तीने ओवी अंगाई गीतांपासून ते थेट भक्ती, शृंगार, वीर अशा विविध रसांचे दर्शन घडविणार्या प्रयोगात्मक लोकाविष्कारांमधून पिढयानपिढया लोकजागर केला आहे. या लोकजागरातून केवळ रंजन नव्हे तर समाज प्रबोधन स्त्री शक्तीने घडविले आहे. हजारो वर्षांची लोकसंस्कृती ही स्त्रीच्या लोकजागराचे एक प्रतीक आहे. भारतातील स्त्री शक्तीच्या या लोकजागराची सुंबरान पहिल्या अखिल भारतीय महिला लोककला संमेलन २०११ मधून आपणासमोर मांडले जाणार आहे. लोकरंग सांस्कृतिक मंच, ठाणे या संस्थेच्या वतीने हे पहिले अ.भा.महिला लोककला संमेलन आयोजित होत असून भारत सरकारचे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, लोककला अकादमी मुंबई विद्यापीठ, आदी संस्थांच्या सहकार्याने हा अभिनव उपक्रम भारताच्या सांस्कृतिक इतिहासात प्रथमच आयोजित होत आहे.
स्त्री शक्तीचा लोकजागर मांडणार्या या संमेलनाचे स्वरूप सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांच्या विकासासंबंधी परिसंवाद, छायाचित्र प्रदर्शन, पथनाट्ये असे विविधांगी आहे. या पहिल्या अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाचा उद्देश महिलांचा सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक पातळीवरील उत्कर्ष हा आहे. संमेलनाचा उद्घाटन संमारंभ दिनांक ९ ऑक्टोबर २०११ रोजी सकाळी ९.०० वाजता रवींद्र नाटयमंदिर, प्रभादेवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी, गायिका श्रीमती सुलोचना चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. श्री. सुनीलजी तटकरे भूषविणार आहेत. संमेलनाचे अध्यक्षपद राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पंडवानी कलावंत पद्मभूषण तिजनबाई (छत्तीसगड), भूषविणार आहेत. संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचे अध्यक्षस्थान विधानसभेचे अध्यक्ष मा. ना. श्री दिलीप वळसे पाटील भूषविणार आहेत. संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री मा. ना. श्री. संजय देवतळे उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. ना. श्रीमती वर्षा गायकवाड, मंत्री (महिला व बालकल्याण), मा.ना. श्री सचिन अहिर , राज्यमंत्री (पर्यावरण ), मा. उल्हासदादा पवार, अध्यक्ष, उर्वरीत महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ, मा. डॉ. राजन वेळूकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ, श्री. जयराज साळगावकर, संचालक सुमंगल पब्लीकेशन. उपस्थित राहणार आहेत. तर विषेष अतिथि म्हणून शैलेंद्र दशोरा, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक, मा. डॉ. राजपाल हांडे, बी. सी. यु. डी. संचालक, मुंबई विद्यापीठ, मा. डॉ. मुरलीधर कुर्हाडे, प्रभारी कुलसचिव, श्रीमती सुप्रभा अग्रवाल, प्रकल्प संचालिका, पु. ल. देषपांडे महाराष्ट्र कला अकादमी. आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाचा समारोप समारंभ राज्याचे मा. ना. श्री. अजितदादा पवार, सन्माननीय उपमुख्यमंत्री, यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक १० ऑक्टोबर २०११ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संपन्न होणार आहे. यावेळी मा. ना. श्री. विलासराव देषमुख, केंद्रीयमंत्री, विज्ञान व तंत्रज्ञान, हे समारंभाचे अध्यक्षस्थान स्वीकारणार आहेत. मा. ना. श्री. वसंत डावखरे, विधान परिषदेचे उपसभापती, मा. ना श्री. सचिन अहिर, राज्यमंत्री पर्यावरण, मा. श्री. गोविंदराव आदीक, खासदार, डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्षक. आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनात महाराष्ट्रासह, भारतातील विविध राज्यातील महिला लोक कलावंत सहभागी होणार असून यात पद्मभूषण तिजनबाई (छत्तीसगड), गुजरातमधील गरब्याचा संच, केरळमधील लोककलावंताचा संच यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील महिला लोक कलावंत देखील संमेलनात सहभागी होत असून चंदाबाई तिवाडी, मीराबाई उमप, गोदावरी मुंडे, मराठी पाऊल पडते पुढे फेम शाहीर कल्पना माळी, तमाशा सम्राज्ञी अंजली नाशिककर, लावणी सम्राज्ञी छाया-माया खुटेगावकर, रेष्मा-वर्षा परितेकर, असे अकलूजच्या लावणी महोत्सवातील प्रथम पुरस्कार विजेते संच, तसेच रूपेरी पडद्यावरील अनेक तारका या संमेलनात सहभागी होत आहेत. या शिवाय आंबेडकरी शाहिरी आणि कव्वालीच्या क्षेत्रातील मान्यवर महिला लोकगायक संमेलनात सहभागी होत आहेत. रूपेरी लोककला या कार्यक्रमात भार्गवी चिरमुले, स्मिता तांबे, मृण्मयी देषपांडे या चित्रपट अभिनेत्री सहभागी होत असून नृत्य दिग्दर्षन दीपाली विचारे यांचे आहे. तर दिग्दर्षन याकुब सईद यांचे आहे व संगीत संयोजन अषोक वायंगणकर यांचे आहे. स्त्रीभ्रूण हत्या, आदिवासी महिला व बालकांचे कुपोषण, स्त्रियांची साक्षरता अषा विविध विषयांवर अलीकडे लोककलांमधून जागृती घडत आहे. ही राज्याच्या दृष्टीने अतिशय प्रशंसनीय बाब आहे.
डॉ.प्रकाश खांडगे
No comments:
Post a Comment