Thursday, October 20, 2011

स्नेह'ज्योती'

रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यातील निसर्गरम्य परिसरात अनेकविध फुलांचे सौंदर्य पहायला मिळते. मात्र घराडी गावातील दुर्गम भागात या फुलांइतकेच दृष्टी नसताना दृष्टीपथास असणारं आणि दृष्टीपलिकडील विश्व जाणू शकणाऱ्या 'देवाघरच्या फुलांचं' सौंदर्य वर्णनापलिकडले आहे. जागतिक अंध दिनाच्या निमित्ताने शनिवारी स्नेहज्योती निवासी अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सहवासात काही क्षण घालविल्यावर हाच अनुभव आला.

निमित्त होतं कोकण विभागाचे माहिती उपसंचालक देवेंद्र भुजबळ यांच्या 'प्रकाशमय' ग्रंथाच्या ब्रेल आवृत्तीच्या प्रकाशनाचे. या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता यांनीच हे ब्रेल रुपांतर केले आहे. रत्नागिरीहून मंडणगडला जायला साधारण चार तास लागतात. खेडहून पालगडमार्गे पुढे गेल्यावर दहागावपासून तीन किलोमीटर अंतरावर घराडी गाव आहे. गावाकडे जाणारा कच्चा रस्ता आहे. गावात प्रवेश केल्यावर डावीकडे उंचावर जुना वाडा दिसतो. हेच विद्यालयाचे कार्यालय. विद्यालयाच्या संस्थापिका सुनिला कामत यांनी त्यांच्या आईच्या आजोळीचे हे घर अंध विद्यालयासाठी दिले आहे.

आत प्रवेश करताक्षणीच अत्यंत प्रेमाने स्वागत झाले. कार्यक्रमासाठी पुण्याहूनही अंध विद्यार्थींनींचा एक ग्रुप आला होता. त्यातली मैथीली चव्हाण जपानी भाषा शिकते आहे. समीरा शेख ही नृत्यकलेत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करते आहे. त्यांच्या प्रगतीविषयी जाणून घेतल्यावर त्यांच्या प्रयत्नांना सलाम करताना शब्दांचा उपयोग कसा करावा हा प्रश्न होता. कारण मानवी सामर्थ्याचे अनेक किस्से यापूर्वीदेखील ऐकले होते. मात्र निसर्गाने दिलेल्या अपंगत्वाविषयी कोणतीही तक्रार न करता त्याच्याशी सामंजस्याने सहचर्य करीत काळाच्या पडद्यावर आपल्या कर्तुत्वाची खूण सोडण्याचे प्रयत्न काही वेगळेच होते. शिवाय बोलताना चेहऱ्यावरचं स्मित कायम...त्यांच्या अंधत्वाविषयी वाईट वाटताना मात्र या भाग्याचा हेवा वाटत होता. जणू जीवनातील सगळी दु:खे त्यांच्यापासून कोसो दूर असावी किंवा त्यांनी ती आपल्या कौशल्याने सहजपणे बाजूला सारली असावी...

...सुनिलाताई आणि प्रतिभाताई दोघी बहीणींनी शाळेतल्या मुलांना आईची माया दिली आहे. त्यामुळे आग्रहाने कोकम सरबत आम्हाला देताना त्या मुलांच्या कलेविषयी भरभरून बोलत होत्या. या मुलांची स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आदींकडे लक्ष देताना त्यांना पाच किलोमीटर दूरच्या गावात संगीताच्या शाळेला आपल्या गाडीत नेण्याचे कष्टही त्या घेतात. श्री.कामत हे सेनेतून निवृत्त झालेले अधिकारी आहेत. त्यांचा मुलगा वायुसेनेत अधिकारी तर मुलगी अमेरिकेत शास्त्रज्ञ म्हणून काम करते. घरात सर्व समृद्धी असताना अंध मुलांचे आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी या भगिनींनी आपल्या प्रेमाची 'ज्योती' इथे लावली. कष्टाने आणि जिद्दीने कुठलीही मदत नसताना त्यांनी शाळेची सुरुवात केली. त्यांच्या सुदैवाने समाजातील अनेक हात त्यांना सहकार्य करण्यासाठी सरसावले, उत्तम जैनसारखे तरुण सोबत आले आणि पाहता-पाहता नजरेत भरेल असे कार्य उभे राहिले...

...शाळा सुंदर बांधली आहे. स्वतंत्र वर्ग खोल्या, संगीतासाठी हॉल, वाचन कक्ष, भोजन कक्ष, बापट दाम्पत्याने उभारून दिलेला नाना-नानी कक्ष असे विविध कक्ष शाळेत आहेत. संपूर्ण डोंगरावर जेसीबीने सपाटीकरण करून शाळा उभारल्याचे सुनिलाताईंनी सांगितले. शाळेच्या परिसरात आणि वर्गात स्वच्छता दिसत होती. परिसरात छान हिरवळ तयार करण्यात आली आहे. मुलांना दिसत नसले तरी निसर्गाचा छान सहवास देण्यासाठी या भगिनींनी त्यासाठी दीड वर्ष खटाटोप केल्याचे कळल्यावर कौतुक वाटले.

शाळेच्या भिंतीवर सर्व शिक्षा अभियानाचे बोधचिन्ह होते. त्यात पेन्सिलीऐवजी ब्रेल लिपीसाठी वापरल्या जाणाऱ्या टोच्याचा उपयोग करण्यात आला होता. या टोच्या सहाय्याने सहा टिंबांवर आधारित ही लिपी असण्याची माहिती आम्हाला देण्यात आली. बाजूला चित्रात असलेल्या पोपटाच्या तोंडात एक पत्र होते. या पत्रावर 'तुमचे भाग्य तुमच्या हाती' असे शब्द लिहिले होते. शाळेतील विद्यार्थ्यांचे कलागुण पाहिल्यावर जणू ते विद्यार्थीच हा संदेश देत असल्याचे वाटले. चिमुकल्या आशिकाने ब्रेल लिपीतील कार्यक्रमाबाबतची सूचना भराभर वाचून दाखविली. विशेष म्हणजे ही मुले पायऱ्यांवरून न गडबडता चढत-उतरत होती. आयुष्याचा चढ चढताना त्यांनी स्पर्श आणि संवेदनेचे छान गणित सोडविले आहे. म्हणून त्यांच्या जीवनात हास्य आहे, सोपेपणा आहे, सहजता आहे. धडपड, निराशा, वेदना यापासून ते खूप दूर आहेत. नव्हे या गोष्टींनी त्यांच्या प्रयत्नांपुढे शरणागती पत्करली आहे...

...भुजबळ साहेबांसह शाळेचा फेरफटका मारल्यानंतर कार्यक्रमस्थळी आलो. कार्यक्रमाची तयारी करताना दोन्ही बहिणी अगदी घरचं कार्य असल्याप्रमाणे धावपळ करीत होत्या. मधूनच मुलांच्या डोक्यावर हात फिरवून 'आज पाहुणे आले, छान गाणं म्हणणार ना' असं म्हणत त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्याचे प्रयत्न सुरूच होते. पाहुण्यांचे स्वागत, त्यांना माहिती देणे, स्टेजची तयारी, पारितोषिके...ही धावपळ सुरुच होती. शाळेचा कर्मचारी तल्लीनतेने काम करीत होता. त्याच्यावर या परिसरात कसे संस्कार झाले असतील याची कल्पना त्याच्या उत्साहाने होणाऱ्या हालचालींवरून दिसत होती. शिक्षकही विद्यार्थ्यांसोबत कार्यक्रमाची तयारी करण्यात तल्लीन होते.

पाहुण्यांचे आगमन झाल्यावर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरूवात झाली. पाहुण्यांमध्ये भुजबळ साहेबांसोबतच ब्रेल लिपीतील पहिले साप्ताहिक काढणारे 'स्पर्शज्ञान' साप्ताहिकाचे संपादक स्वागत थोरात, सिद्धी विनायक ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मयेकर, दापोलीतील प्लास्टीक मुक्तीसाठी झटणारे मुख्याधिकारी रामदास कोकरे आदींचा समावेश होता. मुलांनी सादर केलेल्या कलेला या सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. आशिका शेळगे हीने 'घननिळा लडिवाळा' हे भावमधूर गीत सादर केले. आशिषने गायलेले 'गणपती बाप्पाची पमपम छान','काठीनं घोंगडं घेऊ द्या की रं' या गीतांनी धमाल उडवून दिली. शाळेच्या मुलांनी सादर केलेल्या 'दृष्टी' या नाट्य प्रवेशात चिमुकल्या मनिषच्या गावरान संवादांनी सर्वांना भरभरून हसविले. पुण्याहून आलेल्या समिराचे कथ्थक प्रकारातील 'गद्भाव' सुंदरच झाले. आम्ही हे सर्व खुर्चीत बसून पहात असताना मात्र प्रतिभाताई आणि सुनिलाताई मात्र घराच्या पायऱ्यांवर असून आईच्या मायेने आपल्या या लेकरांचं कौतुक पहात होत्या. डोंगरावर हा स्वर्ग का फुलतोय हे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव समजावून घेतल्यावर जाणून घेण्याची कुणालाच गरज वाटणार नाही.

कार्यक्रम संपल्यावर भोजनही तेवढेच चविष्ट आणि गावाकडची आग्रहाने वाढण्याची पद्धत म्हणून मसाला भातावर सर्वांनी ताव मारला. बाहेर जोरदार पाऊस सुरू झाल्याने सर्वांनी मिळेल त्या जागी बसून जेवणाची चव घेतली. या 'स्नेह'वास्तूत एकमेकांचा स्नेह वाढावा यासाठी निसर्गानेच ही खेळी खेळली असावी. (एरवी शहरात हे दिसतयं कुठे) जेवणानंतर निरोप देतांना प्रत्येकाला अंध विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कागदी पिशव्या प्रत्येकाला देतांना सुनिलाताई मुलांच्या कलेचे कौतुक करीत होत्या. आलेल्या पाहुण्यांना आपल्या या चिमुकल्यांचं किती सांगावं असं त्यांना झालं होतं. पाऊस थांबल्यावर आम्ही या सर्व सहृदयी माणसांची निरोप घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.


'प्रभूची लेकरे सारी,
तयांना सर्वही प्यारी,
कुणा ना तुच्छ लेखावे,
जगाला प्रेम अर्पावेll'

या साने गुरुजींच्या 'वैश्विक' प्रार्थनेच्या ओळी गुणगुणत पालगडला त्यांच्या जन्मगावी पोहचलो. रिमझीम पावसात त्यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेतलं. ते ज्या प्राथमिक शाळेत शिकले त्या शाळेकडे एक नजर फिरविली. जगावर प्रेम करण्याचे संस्कार करणारी ही तीर्थक्षेत्रे आजही प्रेरणा देणारी आहेत हे त्याठिकाणी अनेक युवकांनी लिहीलेल्या प्रतिक्रियेवरून लक्षात आले.

केवळ दहा किलोमीटरच्या परिसरात जगावर भरभरून प्रेम करणाऱ्या गुरुजींचे जन्मस्थान आणि गुरुजींचा संदेश अक्षरवत मानून स्नेह'ज्योती' तेवत ठेवणारी अंध मुलांची शाळा असावी हा खरोखरच सुवर्णयोग असावा. परतीच्या प्रवासात,

'सदा जे आर्त अतिविकल
जयांना गांजनी सकल,
तया जाऊन हसवावे,
जगाला प्रेम अर्पावेll'

ही प्रार्थना गुणगुणणे सुरूच होते. अर्थात त्या स्नेहमय कार्यक्रमाने उल्हासित झालेले मन आणि परिसरातील निर्मल निसर्गाच्या सहवासात गुरुजींच्या पवित्र जन्मस्थानाचा स्पर्श झाल्यानंतर मनात अशी भावना निर्माण होणे तेवढेच स्वाभाविक आहे. म्हणून अशा 'तीर्थक्षेत्रांना' आवर्जून भेट द्यावी असे सारखे वाटते.

  • डॉ.किरण मोघे 
  • No comments:

    Post a Comment