तानाजी १० वी पासूनच घरातील पारंपरिक शेतीकडे लक्ष देत होता. घरात वडिलोपार्जित १० हेक्टर शेती आहे. या क्षेत्रात भातशेती होत होती. मात्र त्यातून फारसे उत्पन्न मिळत नसे. त्यामुळे कर्जाच्या चिंतेत असलेल्या वडिलांकडे बघितल्यावर ही परिस्थिती बदलावी असे तानाजीच्या मनात सारखे येई. त्याने आयटीआयचे शिक्षण घेतल्यानंतर इलेक्ट्रीक सुपरवायझर म्हणून १९९६-९७ मध्ये नोकरीदेखील केली. मात्र सुटीत घराकडे येताना शेताशी असलेली नाळ तोडली नाही. शेतीतच आधुनिक तंत्राचा वापर करण्याचा निश्चय करून त्याने १९९८ मध्ये चारसूत्री पद्धतीचा वापर केला. भातशेती बहरू लागताच तेवढ्यावर समाधान न मानता त्याने डोंगराळ भागात शेतीसाठी योग्य भूमी तयार केली. त्यासाठी वर्षभर परिश्रम करावे लागले. अशा भागात आधुनिक शेतीचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी कष्ट करताना गावकऱ्यांसाठी तो चेष्टेचा विषय झाला होता. मात्र तानाजीने माघार घेतली नाही.
शेतीची चांगली मशागत केल्यावर त्याने प्रथमच २००६ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर केळीची लागवड केली. केळीच्या पिकातून चांगला फायदा झाल्यावर केळीचे क्षेत्र वाढविले. आज केळी पिकाद्वारे वर्षाला २ ते २.५ लाखचे उत्पन्न होत आहे. उत्पन्नात वाढ करण्यासाठी यंदा तानाजीने हळदीची लागवडही केली आहे. ८ एकरात केळी आणि २७ गुंठ्यात हळदीचे पीक चांगले बहरले आहे. शेताच्या बांधावर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून १०० नारळाची रोपे लावली असून त्यांची वाढही चांगली झाली आहे.
तानाजीने पाण्याची समस्या सोडविण्यासाठी २००८ मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून ३४ बाय ३४ मीटर आकाराचे शेततळे उंचावर डोंगराच्या मधोमध तयार केले. बाजूच्या नदीतून पाणी पंपाने शेततळ्यात सोडून ते ग्रॅव्हीटीद्वारे शेतात पोहचविले जाते. कृषि विभागामार्फत ठिबक सिंचनासाठी प्रती हेक्टर ३० हजार रुपयांचे सहकार्य मिळाल्याने त्याने संपूर्ण डोंगरावर ठिबकचे जाळे विणले आहे. शेतात जी-९ जातीच्या केळीचे घड लागलेले दिसतात. शेतीचे सर्व व्यवस्थापन स्वत: करीत असल्याने चांगला फायदा मिळत असल्याचे तानाजी सांगतो.
शेतात नवे प्रयोग करताना शासनाच्या विविध योजनांची माहिती हा तरुण शेतकरी सातत्याने घेत असतो. गाव अत्यंत दुर्गम भागात असूनही कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा, कुठेही कृषि प्रदर्शन भरले की त्यात सहभाग, चांगल्या शेतकऱ्यांच्या भेटी यामुळे तानाजीला आपल्या शेतात अनुकूल बदल करणे शक्य होत आहे. 'नोकरी पेक्षा शेती बेस्ट' असं सांगणाऱ्या तानाजीला पूर्वी नावं ठेवणारी माणसं आपल्या शेतात काम करायला येतात याचं समाधान आहे.
शेती कष्टाचं काम आहे, शेतीसाठी सर्व चांगले घटक उपलब्ध पाहिजेत, अशी धारणा असणाऱ्या युवकांपुढे तानाजी चव्हाण यांनी यशस्वी शेती कशी करावी याचा आदर्श ठेवला आहे. आपल्या प्रयत्नातून 'केल्याने होत आहे रे...' हेच त्याने आपल्या युवामित्रांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मातीशी इमानाने नातं जोडलं की ती भरभरून देते हे तानाजीच्या शेताकडे पाहिल्यावर लक्षात येतं.
No comments:
Post a Comment