वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात यावर्षी फळबाग योजनेत प्रचंड वाढ झाली आहे. डाळींब, द्राक्ष व पपई या फळांनी बागा बहरल्या असून सावरगावात कुलदीप राऊत यांच्या शेतामध्ये १९ महिन्यात डाळींबाच्या झाडाला मोठमोठी फळे लागली आहेत.
मंगरूळपीर तालुक्यात यावर्षी फळबागांसह मसाला पीक व भाजीपाल्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तालुक्यात द्राक्ष क्षेत्र चार हेक्टर, डाळींब १५० हेक्टर, पपई २०० हेक्टर, संत्रा १२५ हेक्टर, मोसंबी २५ हेक्टर, लिंबू ७५ हेक्टर, आवळा तीन हेक्टर, केळी ५० हेक्टर, करवंद एक हेक्टर, सीताफळ २० हेक्टर, टरबूज ५० हेक्टर, भाजीपाला १२५ हेक्टर, मसाला पीक ६४५ हेक्टर, अद्रक १०० हेक्टर, कांदा १०० हेक्टर एवढी लागवड झाली आहे.
विदर्भात मूलस्थानी जलसंधारण कामाची सुरूवात मंगरुळपीर तालुक्यापासून झाली आहे. फळबाग लागवडीमध्ये हा तालुका सध्या विदर्भात आघाडीवर आहे. संपूर्ण राज्यभरातून शेतकरी येथील पपई, द्राक्षे, डाळींब पाहण्यासाठी येत आहेत. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यांना तालुक्यातील शेतकरी फळबाग लागवडीसंदर्भात मार्गदर्शन करीत आहेत.
डाळींब झाडाची उंची सहा ते साडेसहा फूट असून झाडांची संख्या आठ हजार आहे. प्रत्येक झाडाला आकर्षक अशी ४० ते ६० डाळींबाची फळे लागलेली आहेत. राऊत कुटुंबाला १९ महिन्यात ३० लाख रुपये खर्च आला आहे. तर, यावर्षी पहिले उत्पन्न ५० ते ६० लाख रुपये येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यांनी २० किलोमीटर अंतरावरुन विहीर व धरणावरुन सिंचनासाठी शेतात पाणी उपलब्ध करून घेतले आहे. राऊत यांनी डाळींब पिकाचे यशस्वी उत्पन्न घेतले आहे. त्यांच्या शेतातील आकर्षक भगवा जातीच्या डाळींब फळाला व्यापाऱ्यांची चांगली मागणी असून सध्या हैद्राबाद येथील व्यापारीही हे फळ घेण्यास उत्सुक झाले आहेत.
तालुक्यात यावर्षी २०० हेक्टरच्यावर पपईची लागवड करण्यात आली असून पपईचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे. एकरी पाच-सहा तोड्यात २५ ते ३० टन पपईचे उत्पादन होत आहे. मंगरुळपीर मधील पपई व्यापारी दिल्ली, गाजियाबाद, आग्रा, चेन्नई, चंदीगढ, ग्वालियर येथे विक्रीसाठी घेऊन जात आहेत.
No comments:
Post a Comment