Tuesday, May 22, 2012

देवचंद शिवणकर : काकडी पिकामुळे लखपती


‘इच्छा असली तेथे मार्ग निघतोच’. इतरांना दोष देऊन व स्वत:च्या कामावरुन पळपुटेपणा करणाऱ्यांना भाग्यही साथ देत नाही. याचा प्रत्यय मला आला आहे, असे मनोगत गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील चिखलीचे हरहुन्नरी युवक शेतकरी देवचंद गोविंदा शिवणकर यांनी व्यक्त केले. मेहनतीच्या जोरावर काकडीचे भरघोस पीक घेतल्याने शिवणकर आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाले आहेत.

देवचंद शिवणकर हे आदिवासी कास्तकार. त्यांनी राष्ट्रीय कृषी फलोत्पादन अभियानांतर्गत आपल्या शेतात हजार चौरस फूटाचे ग्रीनशेड-नेट हाऊस बांधण्यासाठी कनेरी येथील आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थेकडे अडीच लाख रूपये कर्जाची मागणी केली. ह्या हजार चौरस फुटाचे ग्रीनशेड-नेट उभारण्यासाठी त्यांनी प्रथमत: तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधला. ह्या तालुका कृषी कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार व त्यांनी प्रकल्प बांधणी केलेल्या तांत्रिक मदतीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर काकडीचे उत्पादन घेण्याचे निर्धारित केले.

वास्तविक काकडीच्या पिकाकरिता शासनाकडून कुठलेही अनुदान मिळत नाही. पण देवचंद ने प्रारंभी काकडीच घ्यायची ठरविली. त्यांना कृषी विभागाने ५० टक्के अनुदानावर शेतात शेड-नेट हाऊस उभे करुन दिले. मात्र अन्य मदत मिळू शकली नाही. देवचंद यांनी हार न मानता आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि विश्वासावर कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार आपल्या शेताच्या लहानशा तुकड्यात पंचेवीस डेसीमील जागेवर काकडीचे उत्पादन घेणे सुरू केले. बघता-बघता काकडीचे वेल बहरले. पाहता पाहता ह्या हजार चौरस फूट ग्रीनशेड-नेट मध्ये लावलेल्या काकडीच्या वेलाला सगळीकडे काकड्याच काकड्या दिसायला लागल्या. या छोट्याशाच जागेमध्ये सव्वा ते दीड लाख रुपयांचे काकडीचे उत्पादन देवचंद शिवणकर यांच्या हाती येणे अपेक्षित आहे.

सध्या काकडीचा भाव १६ ते १८ रुपये प्रति किलो आहे. किरकोळ व्यापाऱ्यांच्या माध्यमातून माल न पाठवता त्यांनी ही काकडी थेट गोंदियाच्या बाजारात विक्रीला पाठविली. चार महिन्यापर्यंत काकडीचे नियमित उत्पादन हाती येईल. त्यामुळे सतत पैशाची आवक हाती येत राहणार आहे. ह्या ग्रीनशेड-नेट मुळे काकडी तजेलदार व ताजी राहत आहे. काकडीच्या पिकानंतर श्री.शिवणकर यांनी आता सिमला मिरचीचे पीक घेण्याची तयारी सुरू केली आहे.

काकडीच्या उत्पादनामुळे त्यांचा उत्साह वाढला असून पारंपरिक धान उत्पादनासोबतच काकडी, सिमला मिरची, टरबूज, केळी, ऊस आदी नगदी उत्पन्न देणारी पिकेही आता क्रमाक्रमाने घेण्याचे देवचंद शिवणकर यांनी ठरविले आहे.

No comments:

Post a Comment