जळगाव जिल्हयात कृषी विभागाकडून सन २००८-२००९ मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना व सन २००९-२०१० मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत शेततळयांची निर्मिती योजना राबविली जात आहे. या अंतर्गत जिल्हयात सुमारे २ हजार ६०४ शेततळयांची निर्मिती झाली असून आणखी ४ हजार शेततळी निर्माण केली जाणार आहेत. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतक-यांना १०० टक्के अनुदान शासनाकडून दिले जात असून शेततळयातील प्लॅस्टीकच्या आच्छादनासाठी ही ७५ टक्के अनुदान देण्यात येते. त्यामुळे दोन वर्षाच्या कालावधीत जिल्हयातील शेतक-यांनी सदरच्या योजनेला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शेतक-यांच्या उत्पादनात चांगली वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तसेच जिल्हयात निर्माण झालेल्या शेततळयाकरिता १२ कोटी रुपयांचे अनुदान कृषी विभागाकडून लाभार्थी शेतक-यांना वाटप करण्यात आले असून सन २०१२-१३ मध्ये शेततळयाकरिता १६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
जळगाव जिल्हयाचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६६३.०१ मिलीमीटर एवढे असून जिल्हयात पावसाचे असमान वितरण आहे. जिल्हयाच्या रावेर यावल व चोपडा तालुक्यात अधिक पर्जन्यमान होते तर अंमळनेर, जामनेर, एरंडोल, पारोळा व बोदवड या पाच तालुक्यात पाऊस कमी प्रमाणात पडतो. त्यामुळे या भागास सिंचनाच्या कमी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच जिल्हयातील सुमारे ८३ टक्के क्षेत्र कोरडवाहू असून फक्त १७ टक्के क्षेत्र हे सिंचनाखाली आहे.
म्हणजेच जिल्हयातील ८३ टक्के शेत जमिनीला पावसाच्या पाण्या व्यतिरिक्त सिंचनाची दुसरी सोय उपलब्ध नाही. त्यामुळे या भागातील शेतीतून कमी उत्पादन मिळते. तसेच जमिनीची उत्पादकताही कमी असल्याने शेतक-यांचे एकूण उत्पन्न ही कमीच असल्याने येथील शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेला होता. परंतु सन २००८-०९ मध्ये शासनाने सुरु केलेल्या शेततळी योजनेत या जिल्हयातील शेतक-यांनी मोठया प्रमाणावर सहभाग घेऊन आपली जमीन सिंचनाखाली आणलेली आहे. त्यामुळे त्यांच्या शेतीत एकापेक्षा अधिक पिके घेत येत असल्याने त्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे अशा शेतक-यांची आर्थिक परिस्थितीही सुधारली असून येथील शेतकरी आत्महत्येसारख्या समस्येपासून कोसो पावले दूर आहे.
शेततळी उद्दिष्टय:
राज्य शासनाने राज्यात तीन लाखापेक्षा अधिक शेततळी निर्माण करण्याची योजना आखली असून जळगाव जिल्हयात राष्ट्रीय कृषी विकास योजना व महाराष्ट्र ग्रामीण हमी रोजगार योजनेंतर्गत सन २०१२-१३ मध्ये चार हजार शेततळी निर्माण केली जाणार असून त्याकरिता १६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच जिल्हयाला सन २००९-१० मध्ये ९०० शेततळयांचे उद्दिष्टय देण्यात आलेले होते. परंतु शेतक-यांच्या प्रचंड प्रतिसादामुळे जिल्हयात प्रत्यक्ष ९२० शेततळी निर्माण करण्यात आली. त्यामुळे शेततळी निर्मितीच्या उद्दिष्टयपूर्तीकरिता उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्हा प्रथम आला आहे.
४० हजार हेक्टर क्षेत्रास सिंचन-
जिल्हयात २ हजार ६०४ शेततळी निर्माण झाली असून प्रति शेततळी १० हजार लीटर पाणी साठवण क्षमतेचे अनुमान केल्यास २६०४ शेततळयांच्या माध्यमातून ४० हजार हेक्टर कोरडवाहू जमीन सिंचनाखाली आलेली आहे. जिल्हयाच्या प्रत्येक तालुक्याच्या कार्यक्षेत्रात मोठया प्रमाणावर शेततळयांची निर्मिती झालेली असल्याने जिल्हयात एक प्रकारे शेततळयांचे जाळेच निर्माण झालेले आहे.
या शेततळयातील पाण्याचा सिंचनासाठी वापर केल्याने खरीप पेरणीचे ३० हजार हेक्टर क्षेत्र व रब्बी हंगामाचे १० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले असून कापूस, गहू, हरभरा, बाजरी, ज्वारी आदि पिकांना त्या पाण्याचा लाभ झाल्याने सदरच्या पिकाच्या एकूण उत्पादनात ही वाढ झाली आहे.
No comments:
Post a Comment