बचतगटातील महिलांनी एकत्र येऊन व्यवसाय करणे ही बाब आता
नवी राहिलेली नाही. बचतगटाच्या माध्यमातून एकत्र येऊन महिला आपल्या
व्यवसायात जम बसवू लागल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांनी देखील हे
दाखवून दिले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यापासून
नेरूर हे गाव १० कि.मी. अंतरावर वसलेले आहे. कोकणातील इतर गावांप्रमाणेच या
गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून शेतीमध्ये तांदूळ, भूईमूग,
कुळीथ, उडीद, सूर्यफूल, कलिंगड, नाचणी यासारखी पिके घेतली जातात. गावामध्ये
दुग्धव्यवसाय व गांडूळ खत निर्मिती व विक्री यासारखे लहान मोठे व्यवसाय
देखील केले जातात. ६००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या गावाचा
विस्तारही खूप मोठा आहे.
गावामध्ये इतर सोयी सुविधा असल्या तरी
बचतगट मोठ्या प्रमाणावर कार्यरत नव्हते. त्यामुळे दारिद्र्य रेषेखाली
असणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन बचतगट स्थापन करण्याचे ठरविले. या
स्वयंसहाय्यता गटाला निर्मिती स्वयंसहाय्यता बचतगट असे नाव देण्यात आले.
त्यांनतर गटाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून दिनांक २४ मार्च २०१२ रोजी
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या नेरूर शाखेत खाते उघडण्यात आले. या गटामध्ये १२
सदस्य आहेत.
या गटाला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर गटाचे प्रथम
मूल्यांकन करून २० हजार रूपये इतका फिरता निधी देण्यात आला. या फिरत्या
निधीचा वापर गटातील सदस्यांनी कुक्कूटपालन, भाजी विक्री, नारळ विक्री
यासारख्या छोट्या व्यवसायासाठी तसेच शौचालय व गोबरगॅस बांधकामासाठी केला.
या गटाला वेळोवेळी गोमुख संस्था, कुडाळ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी
यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे.
फिरत्या निधीचा वापर
केल्यानंतर या गटातील सदस्यांनी काथ्या व्यवसाय करण्याचा निश्चय केला व
त्याचे एक महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. या गटाचे दुसरे मूल्यांकन होऊन
काथ्या व्यवसायासाठी २.५० लाख रूपये मंजूर करण्यात आले. याचा उपयोग गटाने
काथ्यापासून दोऱ्या, पायपुसणी, गाद्या या सर्व प्रकारच्या शोभेच्या आणि
कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्यासाठी केला. यासाठी लागणारा चांगल्या प्रतीचा
काथा केरळमधून खरेदी करण्यात आला. या काथ्यापासून तयार झालेल्या वस्तुंना
स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे गटाला हा व्यवसाय फायदेशीर
ठरत आहे. या व्यवसायातून गटाला बँकेचा हप्ता भरून व इतर खर्च वजा करून १७००
ते १९०० रूपये पर्यंत मासिक फायदा होत आहे.
या गटातील महिला या
गावातील ग्रामसभेत स्वच्छता मोहिमेत भाग घेतात, तसेच इतर सामाजिक
कार्यक्रमातही सहभागी होतात. अलिकडेच ऑगस्ट २००७-०८ मध्ये दिल्ली येथे
प्रादेशिक सरस प्रदर्शनामध्ये हा गट सहभागी झाला होता. निर्मिती
स्वयंसहाय्यता गटातील सदस्य स्वतःबरोबरच गावातील इतर महिलांचाही गटाच्या
माध्यमातून कसा विकास होईल, याकडेही लक्ष देत आहेत. एकूणच बचतगटांच्या
माध्यमातून एकत्र आल्याने क्षमतांचा विकास होऊन महिला आर्थिक भरारी घेऊ
लागल्या आहेत, हे निश्चित.
No comments:
Post a Comment