जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव या दुष्काळी पट्टयात आणि शिराळा तालुक्यात सुझलॉन, इनरकॉन आणि वेस्टॉज या कंपन्यांनी सुमारे ४०८ पवनचक्क्या उभारल्या आहेत. या पवनचक्कीतून गतवर्षी सुमारे ४३१ मे. वॅट विजेची निर्मिती केली आहे. ही वीज महावितरणने खरेदी केली असून त्यापोटी तीन कंपन्यांना २६७ कोटी रुपये अदा केले आहेत. या उभारलेल्या पवनचक्कीतून वीज निर्मिती सुरु झाली आहे.
गेल्या दहा वर्षापासून जिल्ह्यात पवनचक्क्या उभारणीच्या कामाला वेग आला. पहिल्यांदा कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे तिसंगीसह घाटमाथ्यावर पवनचक्क्या उभारल्या. आता जत तालुक्यात मोठ्या संख्येने पवनचक्क्या उभारल्या जात आहेत. पवनचक्क्यांनी तयार केलेली वीज कंपनीकडून साडे तीन रुपये प्रति युनिट दराने स्वीकारली जाते. वीज नियामक आयोगाने दरवर्षी १५ पैसे प्रतियुनिट इतकी दरवाढ दिली आहे.
सन २००८-०९ मध्ये वरील तीन कंपन्यांनी अनुक्रमे ७९.९,४२३.१९,११३.७८ दशलक्ष युनिट तयार केली होती. त्यावर्षी पवनचक्क्यांच्या माध्यमातून तयार झालेली एकूण वीज ६१७ दशलक्ष युनिट इतकी होती. गतवर्षी त्यात ५५ दशलक्ष युनिट इतकी वाढ झाली आहे. सद्या जत तालुक्यात गणेशा, ग्लोबल विंड, विन विंड, किनरसिस, सीएस विंड या कंपन्यांच्या सुमारे शंभरावर पवनचक्क्या उभारणीच्या प्रतीक्षेत असल्याने पुढील वर्षभरात भरीव वाढ अपेक्षित आहे.जत तालुक्यात सध्या २३ पवनचक्क्या येत्या काही महिन्यात कार्यान्वित होतील.
'मेढा' या राज्य सरकारच्या प्राधिकरणाकडून झालेल्या सर्वेक्षणानुसार जत तालुक्यात सातशे मेगावॅट वीजनिर्मितीची क्षमता आहे. कमीत कमी सहाशे के. व्ही. ते अडीच मेगा वॅट क्षमतेच्या पवनचक्क्या उभारल्या जात आहेत. सुझलॉनतर्फे २ मेगावॅट तर ग्लोबल विंडतर्फे अडीच मेगावॅट क्षमतेच्या पवनचक्क्या उभारण्यात येत आहेत. एक मेगावॅट पवनचक्की उभारणीची जागा खरेदीपासून कार्यान्वित होईपर्यतचा सध्याचा खर्च साडेसात कोटी रुपये गृहीत धरला जातो. हा खर्च गृहीत धरता येत्या चार-पाच वर्षात सुमारे पंधराशे कोटी रुपयांची गुंतवणूक जत तालुक्यात पवनचक्क्यांच्या माध्यमातून होणार आहे.
गेल्या तीन वर्षात विजेपासून या कंपन्यांना अडीचशे ते तीनशे कोटीच्या आसपास रक्कम मिळालेली आहे. इनरकॉन कंपनीच्या १११ पवनचक्क्या आहेत. त्यांची वीज निर्मिती७१ मे. वॅट असून त्यांनी १०० मे. वॅट वीज निर्मिती केली आहे. तर सुझलॉन कंपनीच्या सर्वात जास्त २४७ पवनचक्क्या असून त्यांची क्षमता २७८ मे. वॅट इतकी आहे. त्यांनी ४४० मे. वॅट वीज निर्मिती केलेली आहे. वेस्टॉज कंपनीच्या ५० पवनचक्कया असून त्याची क्षमता ५० मे. वॅट असून त्यांनी १३१ मे. वॅट वीज निर्मिती केलेली आहे. पवनचक्क्यांमधून निर्माण झालेल्या या वीज निर्मितीतून इनरकॉन २८ कोटी, सुझलॉन १९० कोटी, वेस्टॉज ५० कोटी याप्रमाणे त्यांना पैसे मिळालेले आहेत.
पवनचक्की प्रकल्पामुळे चारचाकी वाहने, ट्रॅक्टर, डोझर, जेसीबी, पाण्याचे टँकर यांना चांगला व्यवसाय मिळाला आहे. सेंट्रिग कामगार, गवंडी त्यांच्या हाताखालचे मजूर यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे. छोट्या-मोठ्या कंत्राटदारांनाही कामे उपलब्ध झाली आहेत. पवनचक्क्या उभारण्याच्या कामांमुळे शेतकऱ्याला जमिनीच्या मोबदल्यापोटी मोठ्या प्रमाणावर पैसे मिळू लागले आहेत. ग्रामपंचायतींनाही पवनचक्क्यावर बसविलेल्या करामुळे ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात भर पडत आहे. त्यामुळे ग्रामपंचायती आर्थिकदृष्टया सक्षम होण्यास मदत होत आहे.
No comments:
Post a Comment