विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी स्वत: विदर्भात येऊन पॅकेजची घोषणा केली होती. पंतप्रधान पॅकेज म्हणून या पॅकेजची ओळख आहे. शेतकऱ्यांना शेतीबरोबरच आर्थिक हातभार लावणारे अन्य उद्योग उभे करता यावे म्हणून या पॅकेज मधून शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात आले. यवतमाळपासून अवघ्या १० किलोमिटर अंतरावर असलेल्या रातचांदणा या गावातील संत तुकडोजी शेतकरी पुरुष गटाला पॅकेजमधून २००७-२००८ या वर्षी २० गाई मिळाल्या होत्या. या २० गाईच या गावाच्या विकासाचा मार्ग ठरल्या. पॅकेजमधील या गाईंचा उत्कृष्ठ जोडधंदा म्हणून गावाने उपयोग केला. या गाई मिळण्यापूर्वी गावात केवळ शंभर लिटर दुध निघत होते. हे दुध उत्पादन आता १२०० लिटरपर्यंत पोहोचले आहे. सुरुवातीस काहीच लोकांकडे असलेले गाईंचे प्रमाण गावकऱ्यांच्या दूरदृष्टीने प्रचंड वाढले आहे. आजमितीस ६०० दुधाळ जनावरे गावात आहे. त्यात ५०० जरशी गाई तर ५०० म्हशींचा समावेश आहे. याशिवाय गावरान जातीच्या ५०० गाई गावकऱ्यांकडे आहे. पॅकेजमधून मिळालेल्या गाईंपासून चांगले दुध मिळत असल्याने व त्यातून चांगली आर्थिक कमाई होत असल्याचे पाहूण गावातील बहुतेकांनी आपल्या थोड्याश्या बचतीतून गाई, म्हशींची खरेदी करुन दुध उत्पादनास सुरुवात केली. आज गावातील ८० टक्के नागरिकांकडे दुग्ध व्यवसाय आहे.
अवघे ६१८ लोकवस्तीच्या या गावाने दुध उत्पादनातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गावकऱ्यांनी पॅकेजच्या मदतीने सुरु केलेल्या या उपक्रमाला वाढविण्यासाठी गावातील महिलांचा सहभाग आवश्यक होता. त्यासाठी संत तुकडोजी महिला दुग्ध उत्पादक व्यावसायिक सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली. यामुळे महिलांना प्रोत्साहन मिळाल्याने त्याही या उपक्रमात हिरीरीने सहभागी झाल्या. याच संस्थेच्यावतीने दररोज गावातील दुधाचे संकलन करुन ते यवतमाळ येथे शासकीय दुध डेअरीकडे पाठविण्यात येते. केवळ २० गाईंच्या भरवशावर गावाने उत्तुंग भरारी घेतल्याने राज्याचे तत्कालिन कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गावाला भेट देवून दुध डेअरीचे उद्घाटन केले होते. विदर्भातील एखाद्या गावाने दुग्ध व्यवसायात भरीव कामगिरी करावी, ही बाब अत्यंत अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रीया देवून श्री. थोरात यांनी गावकऱ्यांची पाठ थोपटली होती.
दुग्धव्यवसायातून गावात दररोज २४ हजार रुपये येतात. पूर्वी आर्थिक विवंचनेत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या हातात आता रोख रक्कम येत असल्याने गावाची आर्थिक चिंता मिटली आहे. तत्कालिन सरपंच अरविंद बेंडे यांच्या प्रयत्नाने गावाने विकासाकडे कुच केली आहे. २००७ सालीच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकर परदेशी यांच्या प्रेरणेने सरपंच बेंडे यांनी गाव हागणदारीमुक्त केले. दिल्ली येथे राष्ट्रपतींच्याहस्ते गावाला निर्मलग्राम पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तत्कालीन राज्यपाल श्री. जमीर यांनीही रातचांदणा या गावाला भेट देवून दुग्धव्यवसायाचे कौतुक केले होते. दुग्ध व्यवसाय तसेच दुधाळु जनावरांचा गावाला लागलेला लळा पाहता शासनाच्या योजनेतून गावातील दुध डेअरीला पुरक साहित्य शंभर टक्के अनुदानावर देण्यात आले आहे. त्यामुळे गावाकडे दुध साठवणूकीची सुविधाही निर्माण झाल्याने दुध उत्पादन वाढीस त्याचा फायदा होत असल्याचे अरविंद बेंडे यांनी सांगितले. गावकऱ्यांनी नियोजनपूर्वक आणि कोणत्याही प्रकारचे मतभेद न बाळगता गावाच्या विकासासाठी सामुहीकपणे केलेल्या प्रयत्नाने हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment