बोर्डी गावाचा परिसर मूलतःच अत्यंत निसर्गरम्य. पश्चिमेस अथांग अरबी सागर आणि पूर्वेस सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत. मधोमध चिकू आणि नारळीच्या फळबागा आहेत. ऐतिहासिक, शैक्षणिक, कृषीविषयक मोठा वारसा बोर्डीला आहे. निसर्गाने दिलेलं हे देणं सांभाळून ठेवण्याची आणि त्याची निगा राखण्याची, त्यात भर टाकण्याची सद्सद्विवेकबुद्धीही बोर्डीवासियांकडे उपजत आहे. म्हणूनच बोर्डीचं सौंदर्य आजही अबाधित आहे.
गाव करील ते राव करील काय, याची प्रचिती देत बोर्डी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ यांनी स्वयंस्फूर्तीने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
१९६० साली बोर्डी ग्रामपंचायतीची स्थापना झाली. बोर्डीची लोकसंख्या ६९०० इतकी आहे. पर्यावरणाचे संवर्धन आणि जतन ही काळाची गरज ओळखून पर्यावरण संतुलित ग्राम योजनेअंतर्गत ग्रामपंचायत हद्दीत पहिल्या वर्षी २००९-१० साली ७००० वृक्षलागवड करण्यात आली. त्यापैकी जवळपास ५२५० इतक्या म्हणजे ७५ टक्के झाडांचे संवर्धन करण्यात ग्रामपंचायतीला यश आले.
दुसऱ्या वर्षी ग्रामपंचायतीमार्फत ४२५० वृक्षलागवड करण्यात आली. दोन्ही वर्षांची मिळून जवळपास ९५०० इतक्या वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात यश आले आहे.
या सगळ्या वृक्षांची नोंद केली आहे. सर्व वृक्षांना क्रमांक देऊन टॅगिंग करण्यात आले आहे. त्यांना संरक्षक पिंजरे लावण्यात आले आहेत. त्याशिवाय, वृक्ष लागवड केलेल्या जागांचा हात नकाशाही बनविण्यात आला आहे.
कुटुंबापासून गावाचा विकास साधण्यास सुरुवात करताना या योजनेत लोकसहभाग वाढावा, म्हणून घरात एक मूल जन्मले की १० झाडे लावणे, नवीन घराच्या बांधकामाला परवानगी घेतल्यानंतर घरासभोवती ५० झाडे लावणे व ती १०० टक्के जगविणे, असा निर्धार करण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. तसेच गावात प्लास्टिक बंदी, कुऱ्हाड बंदी करण्यात आली आहे.
पर्यावरणाच्या असंतुलनामुळे आज जगापुढे विविध समस्या उभ्या राहिल्या आहेत. याबाबत सामाजिक पातळीवर मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण होणे गरजेचे आहे. याची जाणीव ठेवून गावात प्लास्टिक बंदीचा ठराव घेऊन तो अंमलात आणला आहे. प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांकडून आर्थिक दंड वसूल करण्यात येतो. यासंदर्भात जागृती करण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. तसेच, आठवडा बाजारात जनजागृती मोहीम राबविण्यात आली. इतक्यावरच न थांबता दोन-तीन आठवड्यांतून प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी नीट होतेय का, याची खातरजमाही करून घेतली जाते.
विविध उत्सव आणि सणांदरम्यान पूजा साहित्य आणि मूर्ती विसर्जनामुळे जलप्रदूषण होते. त्यामुळे इको फ्रेंडली सण-उत्सव साजरे करून, पर्यावरणाची कमीत कमी हानी करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीने पावले उचलली. मूर्तींचे विसर्जन पूर्वी समुद्रात केले जायचे. पण, पर्यावरण जतन करण्याच्या दृष्टीने सर्वांनी शाडूच्या मूर्ती वापराव्यात यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. तसेच, मूर्ती विसर्जनासाठी विशेष टाक्यांची सोय करण्यात आली.
याबरोबरच वैयक्तिक शौचालय सुविधा, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन या घटकांनाही प्राधान्य देण्यात आले. गावात १२४४ कुटुंबसंख्या आहे. पैकी १०६६ कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालये आहेत. ही टक्केवारी ८६ टक्के आहे. वैयक्तिक शौचालय नसणाऱ्या १७८ कुटुंबांसाठी ६२ शौचालये बांधण्यात आली आहेत.
ऊर्जा स्त्रोतांची मर्यादा लक्षात घेऊन, ऊर्जा बचत आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर या दृष्टीने ग्रामपंचायतीने प्रयत्न सुरू केले आहेत. ऊर्जा बचतीसाठी गावात २६४ सीएफएल पथदिवे लावण्यात आले आहेत. तसेच, १५ सौर पथदिव्यांचाही वापर करण्यात येत आहे. त्यामुळे पूर्वी अंधारात सर्पदंशाने होणाऱ्या अपघातांच्या संख्येतही घट झाली आहे.
गावात घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. कचरा संकलनासाठी घंटागाडीचा वापर करण्यात येतो. त्या माध्यमातून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करण्यात येतो. घनकचऱ्याचे कंपोष्ट खड्ड्यात व्यवस्थापन केले जाते. यासाठी कचरा संकलन करणाऱ्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तसेच, सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डेही तयार करण्यात आले आहेत. गावात २८९ वैयक्तिक शोषखड्डे आहेत.
बोर्डी ग्रामपंचायत एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या ग्रामपंचायतीने आतापर्यंत अनेक बक्षिसे मिळविली आहेत. १९९३ मध्ये ग्रामअभियानात महाराष्ट्रात सर्वप्रथम येण्याचा मान या ग्रामपंचायतीने मिळविला आहे. तसेच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मार्फत देण्यात येणारा कै. आबासाहेब खेडेकर पुरस्कार, उत्कृष्ट वनीकरणासाठी देण्यात येणारा वनश्री पुरस्कार, आदर्श गाव पुरस्कार, संपूर्ण स्वच्छता अभियान अंतर्गत निर्मल ग्राम पुरस्कार असे अनेक पुरस्कार ग्रामपंचायतीच्या शिरपेचात खोवलेले आहेत.
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत २०१०-११ मधील उल्लेखनीय कार्याबद्दल दि. २ डिसेंबर २०११ रोजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते बोर्डीच्या सरपंच श्रीमती बबिता शिरीष वरठा आणि ग्रामविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी पर्यावरण विकासरत्न पुरस्कार स्वीकारला. वृक्षारोपणाची सुबुद्धी, जीवनाची समृद्धी, असे घोषवाक्य बजावत ग्रामपंचायत बोर्डीने वृक्षारोपणाचा निर्धार करत, सुखी जीवनाचा मूलाधार अवलंबिला आहे.
कोणताही उपक्रम लोकसहभागाशिवाय यशस्वी होत नाही. ग्रामीण भागात काम करणारे विविध पातळ्यांवरील पदाधिकारी, कार्यकर्ते, शासकीय यंत्रणा, अशासकीय संस्था आणि उत्स्फूर्तपणे सहभागी होणारे ग्रामस्थ यांच्या योगदानातूनच शासकीय योजना आणि उपक्रमांना आकार येत असतो. या माध्यमातून समृद्ध ग्राम, संपन्न ग्रामस्थ ही घोषणा प्रत्यक्षात येऊन पर्यावरण संतुलित महाराष्ट्राचे स्वप्न साकार होत आहे. बोर्डीसारख्या महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायती हे स्वप्न सत्यात आणत आहेत.
No comments:
Post a Comment