शिक्षकांना ग्रामस्थांमध्ये आदराचे स्थान आहे. बऱ्याच गावात गावच्या विकासासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले जाते. परंतु आता वेगळी परिस्थिती अनुभवयास मिळते. पण बादेवाडी गावातील शिक्षक आणि ग्रामस्थ यांच्यात उत्तम समन्वय आहे. गावकऱ्यांना विश्वासात घेऊन इथल्या शिक्षकांनी 'बाल बँक' सुरु केली आणि दुर्गम भागात राहूनही नवा आदर्श निर्माण केला.
गावात रोजगाराची कमतरता असल्याने या परिसरातील लोक कोल्हापूर आणि इचलकरंजी परिसरात नोकरी करतात. गावात दळणवळणाची साधने कमी. बँक, दुकाने इतर सुविधाही नाहीत. अशा दुर्गम भागात नवीन उपक्रमाचा ध्यास शाळेचे मुख्याध्यापक नितीन मानकर आणि गुलाब बीसेन यांनी घेतला. शाळेतील मुलांच्या विकासासाठी विविध प्रयोग राबवित असताना त्यांना 'बाल बँके'ची संकल्पना सुचली आणि प्रत्यक्षात आणली.
पालक मुलांना खाऊसाठी पैसे देतात त्या पैशाची बचत करण्यासाठी मुलांना प्रवृत्त केले आणि दर सोमवारी 'बाल बँक' दिन सुरु केला. आठवडाभर साठलेले पैसे मुलांनी द्यायला सुरुवात केली. २००८-२००९ या आर्थिक वर्षात ५,०००/- रुपये जमले. मुख्याध्यापक हे पैसे जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवत होते. २००९-२०१० या आर्थिक वर्षात १० हजार रुपये जमले. २०१०-११ या वर्षात ३७ हजार १५१ रुपये जमले आणि २०११-१२ या वर्षात १ लाख १६ हजार ४८६ रुपये जमा झाले. यात संग्राम गवड या सहावीच्या विद्यार्थ्याचे २९ हजार ५०० रुपये आहेत. या वर्षीचे पैसे युनियन बँकेत जमा केले आहेत. गावच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांच्या नावावर हे पैसे आहेत. दरवर्षी मे महिन्यात निकाला दिवशी या पैशाचे वितरण पालकांच्या उपस्थित केले जाते.
या उपक्रमामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच मुलांनाही बचतीची सवय लागली आहे. मुले पालकांनी दिलेले पैसे इतरत्र खर्च न करता 'बाल बँकेत' जमा करतात. यासाठी एका मुलाची सचिव म्हणून निवड केली आहे. हा सचिव पैसे गोळा करण्यास दुपारच्या सुट्टीत शिक्षकांना मदत करतो. यामुळे मुलामध्ये निर्णय क्षमता, पैशाचे व्यवस्थापन आदी गुण विकसित होत आहेत.
श्री. मानकर आणि श्री. बिसेन गुरुजींनी लावलेल्या या रोपट्याचे रुपांतर आता मोठ्या वृक्षात होऊ लागले आहे. सध्या मुख्याध्यापिका संजीवनी काशिद, शिक्षिका सरिता खरपुडे, स्नेहल जगदाळे आणि बिसेन गुरुजींनी उपक्रम उत्तम चालविला आहे. मानकर गुरुजींची संकल्पना तेवढ्याच ताकदीने सध्याच्या मुख्याध्यापिका श्रीमती काशीद यांनी रुजविली आहे.
शी-म्हणजे शीलवान, क्ष-म्हणजे क्षमाशील आणि क- म्हणजे कर्तव्यदक्ष असा शिक्षक शब्दाचा अर्थ लावला तर या शब्दांना सार्थ ठरवत हे शिक्षक आपले काम आदर्शवत करत आहेत. त्यांना हवी आहे कौतुकाची थाप. आता पालक मुलांना पैसे जास्त प्रमाणावर देऊ लागलेत. पैसे बँकेत जमा होतात याची खात्री असल्याने पालकांचा विश्वास आहे. याच बरोबर शाळेत इतरही उपक्रम आहेत. मंगळवारी- बालसभा, बुधवारी- वाचन दिन, गुरुवारी- कार्यानुभव असे विशेष उपक्रम राबवितात. मुलांची गळती कमी होण्यासाठी प्रयत्न केले जातात. वर्गाच्या सेक्रेटरीवर ही जबाबदारी आहे. ज्या वर्गात १०० टक्के उपस्थिती आहे त्या सेक्रेटरीच्या शर्टला दिवसभर बॅच लावला जातो. त्यामुळे विद्यार्थीच उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न करतात. मुलांना शालोपयोगी वस्तू गावात मिळतीलच असे नाही हे लक्षात घेऊन शिक्षकांनी अवर शॉप योजना सुरु केली आहे. यामध्ये पेन, पेन्सिल, रबर, रिफील, वही अशा वस्तू विक्रीस ठेवल्या आहेत. यासाठी एका विद्यार्थ्यांची नेमणूक केली असून दुपारच्या सुटृटीत हा विद्यार्थी मुलांना लागणाऱ्या वस्तू देतो.
शाळेतील प्रत्येक विद्यार्थी व्यासपीठावरुन कोणत्या ना कोणत्या विषयावर बोलू शकतो. हे धारिष्ट्य मुलांमध्ये शिक्षकांनी आणले आहे. सहावी नंतर या मुलांना तीन ते चार मैल चालत जाऊन शिक्षण घ्यावे लागते तर दहावीनंतर सात ते आठ किलोमीटर चालत जाऊन शिक्षण या मुलांना घ्यावे लागते इतक्या दुर्गम भागात हे शिक्षक आनंदाने काम करत आहेत. हाच खरा आदर्श आहे.
No comments:
Post a Comment