धुळे येथील कृषी महाविद्यालयाच्या हवामानशास्त्र विभागाच्या वेधशाळेत अत्याधुनिक साधनांच्या सहाय्याने दैनंदिन नोंदी घेतल्या जातात. देशात १२७ ठिकाणी अत्याधुनिक स्वयंचलित वेधशाळा आहेत. त्यात धुळे वेधशाळेचाही समावेश असल्याची माहिती कृषीविद्या (ग्रोनॉमी) विभागाचे डॉ. पी. एम. चौधरी, डॉ. नंदकुमार दळवी यांनी दिली.
सन १९६० मध्ये कृषी महाविद्यालयाची स्थापना झाली. तेव्हापासून येथे अस्तित्वात आलेली वेधशाळा गत तीन-चार वर्षापासून स्वयंचलित हवामान स्थानकांच्या सहाय्याने पुणे येथील शासकीय वेधशाळेशी तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट) दिल्ली व हैद्राबाद येथील कार्यालयांशी जोडण्यात आली आहे. तेव्हांपासून धुळे जिल्हा हवामानशास्त्र विभागाच्या नकाशावर आला आहे. त्यामुळे येथील हवामानविषयक सर्व बाबींच्या नोंदी कृषी विद्या विभागाकडे दैनंदिन उपलब्ध होते. कृषी महाविद्यालयातील हवामानशास्त्र विभाग हा एक प्रमुख घटक आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने ठरवून दिलेल्या मानकानुसार धुळे येथील वेधशाळा ही बी दर्जाची वेधशाळा ठरते असे डॉ. पी. एम. चौधरी म्हणाले. पूर्वी मर्यादित साधने होती. परंतु जसजशी साधने विकसित झाली तशी ती येथेही बसविण्यात आली. त्यात चार प्रकारचे तापमान मोजणारे स्टीव्हन्सन स्क्रीन बॉक्स, वा-यांचे दिशादर्शक विंडव्हेन्ड, पर्जन्य मोजणारे साधारण रेन गेज, सेल्फ रेकॉर्डिंग रेनगेज, जमिनीचे तापमान मोजणारे तापमापक, हवेच्या वेगाची माहिती देणारे मीन व्हेलॉसिटी मीटर, पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग मोजणारे ओपन पॅन अशा विविध साधनांचा समावेश आहे.
कृषी महाविद्यालयाच्या शेतीच्या परिसरात अत्याधुनिक स्वयंचलित वेधशाळेची उभारणी करण्यात आली आहे. वेधशाळेत असलेल्या स्टीव्हन्सन स्क्रीन बॉक्स लाकडाच्या चार पायांच्या मचाणावरील पेटीत लावले असून त्यात वेगवेगळे थर्मामीटर लावण्यात आले असून त्याव्दारे चार प्रकारचे तापमान मिळते. स्टीव्हन्सन स्क्रीन बॉक्समध्ये बसविलेल्या चार थर्मामीटरव्दारे वेगवेगळया कमाल, किमान, ओले (वेटेबल) व कोरडे (ड्रायबल) या प्रकारांचा प्रामुख्याने समावेश आहे. दुपारी दोन वाजेनंतर पारा वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे कमाल तापमान दुपारी २ वाजून ३१ मिनीटांनी घेतले जाते. त्यावेळी तापमान परमोच्च स्थानी पोहचलेले असते. कमाल तापमान घेतल्यानंतर थर्मामीटर पुन्हा सेट (नॉर्मल) करुन ठेवण्यात येते त्यानंतर सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास किमान तापमान घेण्यात येते. या वेळा तसेच कार्यपध्दती भारतीय हवामानशास्त्र विभागाने ठरवून दिलेल्या आहेत.
तसेच हवामानशास्त्रची माहिती भारतीय हवामान शास्त्र विभाग, पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असते. वेधशाळेत असलेल्या दोन स्वयंचलित हवामान स्थानकांवरुनही आपण माहिती घेऊ शकतो. त्या स्थानकांवर संगणकाव्दारे तापमानविषयक माहिती संकलित होऊन ती पुणे, दिल्ली, हैद्राबाद येथे उपग्रहामार्फत पाठविली जाते. कृषी सहाय्यक डी. एस. पाटील यांनी सांगितले की, पुणे वेधशाळेस हातांनी लिहूनही (मॅन्युअल) माहिती पाठविली जाते.
धुळे स्वयंचलित वेधशाळेकडे शास्त्रज्ञ, आकाशवाणी केंद्र, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, शेतकरी, सामान्य नागरिकही हवामान, पाऊस, आर्दता तापमानाची दैनदिंन माहितीसाठी संपर्क साधत असल्याचे कृषी विद्या विभागाचे अधिका-यांनी सांगितले. त्यामुळे धुळे येथील कृषि महाविद्यालयातील हवामानशास्त्राची स्वयंचलित अत्याधुनिक वेधशाळा वरदान ठरली आहे.
No comments:
Post a Comment