बाभूळगाव तालुक्यातील खडकसावंगाच्या या शाळेमध्ये आनंददायी पद्धतीने अनुभवातून, निरनिराळे साहित्य व खेळाच्या माध्यमातून अध्ययन-अध्यापन करता यावे याकरिता गणितायन ही प्रयोगशाळा श्री.कडू यांनी कल्पकतेने तयार केली. या उपक्रमाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या जीवन शिक्षण या मासिकातून त्यांचा आमची गणित प्रयोगशाळा हा लेख प्रसिद्ध झाला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुबईद्वारे ‘वेचक-वेधक’ या राज्यस्तरीय उत्कृष्ट उपक्रमावर आधारित पुस्तकात या उपक्रमाला स्थान देण्यात आले. उपक्रम संपूर्ण राज्यातील शिक्षकांपर्यत पोहोचविण्याकरिता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद यांनी विशेष कार्यशाळेचे राज्यभर आयोजनही केले. या प्रयोगशाळेला राज्यातील अनेक शिक्षकांनी भेट दिली आहे.
गणित प्रयोगशाळेसोबतच येथे इंग्रजी प्रयोगशाळेचीही निर्मिती करुन इंग्रजी विषयाची मुलांना वाटणारी भीती दूर करण्याचा प्रयत्न चंद्रकिशोर कडू यांनी केला. स्पर्धा परीक्षेसाठी खेड्यातील विद्यार्थी तयार व्हावेत, याकरिता त्यांचा कोण बनेगा ज्ञानसम्राट? हा उपक्रम प्रशंसेस पात्र ठरला आहे. शब्दाची बाग, संस्कार घडविणारे बालवाचनालय, आनंददायी वर्ग, एज्यू इंटरटेन झोन, पर्यावरण झोन, आमची शाळा सुंदर शाळा असे निरनिराळे विद्यार्थी हिताचे उपक्रम राबवून त्यांनी शाळेला आदर्श शाळा बनविण्याचा प्रयत्न केला आहे. शाळेला शासनाचा साने गुरूजी स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार, सप्ततारांकित शाळा पुरस्कार मिळाला असून त्यामध्ये या उपक्रमांचाही हातभार आहे.
सामाजिक बांधिलकी जपत तुकडोजी महाराजांच्या पालखी पदयात्रेतून गावागावात राष्ट्रीय एकता निर्माण होण्याच्या दृष्टीने कडू प्रयत्न करीत आहेत. त्यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी ग्रामस्वच्छता अभियानात नागरिक, पदाधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहभागातून खडकसावंगा गावाला हागणदारीमुक्त केले. त्याबद्दल गावाला निर्मलग्राम पुरस्कारही प्राप्त झाला आहे. चंद्रकिशोर कडू हे राज्यस्तरापासून तालुका स्तरापर्यंत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. गणित विषय सोप्या पद्धतीने कसा शिकवावा यावर ते मार्गदर्शन करतात. आदर्श गुणवंत शाळा या उपक्रमात ते राज्यस्तरीय मार्गदर्शक असून राज्यस्तरीय गणित अभ्यास गटाचे ते सदस्य आहेत. त्यांना जिल्हा परिषदेच्या आदर्श पुरस्कारासह अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहे.
No comments:
Post a Comment