परभणी जिल्ह्यातील जमीन सुपिक आहे. तसेच इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणीत मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. शेतकरीही शेतात दिवसरात्र काबाडकष्ट करीत आहे. मात्र निसर्ग साथ देत नसल्याने पाहिजे त्या प्रमाणात शेतक-याला शेतीतून उपन्न मिळेनासे झाले आहे. त्यामुळे शेतक-यांचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी शासन जोड धंद्यासाठी विविध योजना राबवित आहे. परभणी जिल्ह्यातील होतकरु तरुण शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कटपालन व्यवसायाकडे वळू लागला आहे. सुरुवातीला शेतक-यांना कोंबडीची पिल्ले दुस-या जिल्ह्यातून आणावी लागत असल्याने वेळेवर कोंबड्याची पिल्ले मिळत नव्हती. यामुळे जिल्ह्यातील कुक्कुटपालन व्यवसाय डबघाईला आला होता. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने याची दखल घेऊन शासनाकडून १३ लक्ष रुपयांत जिल्ह्यासाठी अंडे उबविण्याची नऊ यंत्रे उपलब्ध करुन घेतली. या नऊ यंत्राद्वारे २१ दिवसांत तब्बल तीन हजार ६०० पिल्ले तयार होणार आहेत. त्यामुळे या वर्षापासून जिल्ह्यात कोंबडीच्या पिल्ल्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असल्याने जिल्हा कोंबडी उत्पादनात स्वंयपूर्ण होणार आहे.
विशेष म्हणजे शेतक-यांना ही पिले अल्पदरात मिळणार आहेत. जिल्ह्याला उपलब्ध झालेली ही यंत्रे लवकरच नऊ तालुक्यातील पशुसंवर्धन विभागात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आता कुक्कुटपालनाचा जोडधंदा तेजीत पहावयास मिळणार आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतक-याचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनाने शेती संलग्न व्यवसायांकडे लक्ष केंद्रित केले आहे. केवळ आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहण्यापेक्षा जोडधंद्याच्या माध्यमातून शेतक-यांनी आपली प्रगती करावी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळेच परभणी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात कुक्कुटपालनाला तसेच शेतक-यांना दिलेला दिलासा वाखाणण्याजोगा आहे.
No comments:
Post a Comment