विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने धडक जलपूर्ती सिंचन विहीर योजना हाती घेतली. या योजनेतून शेतकऱ्यांनी समृद्धीचा मार्ग शोधला. जिद्द, परिश्रम, काळ्या आईवरचे प्रेम, समर्पणाची भावना व आभाळाएवढी निडर छाती असली व त्याला कल्पकतेची जोड दिली तर काळी आई तिच्या लेकरांना उपाशी राहू देत नाही. शेतकऱ्यांना समृद्धीची वाट गवसावी या उदात्त दृष्टीकोनातून जन्मलेली धडक जलपूर्ती सिंचन विहीर योजना ही शेतकऱ्यांसाठी स्वप्नपूर्तीची योजना सिद्ध होत आहे. हे अजनी येथील अशोक लोखंडे या जिद्दी शेतकऱ्याने स्वत:च्या परिश्रम व कल्पनेतून दाखवून दिले.
अशोककडे सिलिंगमध्ये प्राप्त झालेली चार एकर शेतजमीन आहे. त्याचे वडील शेषराव ही जमीन कसायचे. अशातच अशोक दोन वर्षाचा असताना वडील मरण पावले. अठरा विश्वे दारिद्र्याचा वारसा अशोक, त्याची आई व बहिणीच्या वाट्यास आला. वयाच्या विसाव्या वर्षापासून अशोकही आईसोबत शेतात राबू लागला. जोडव्यवसाय म्हणून त्याने शेळ्या घेतल्या. अशातच त्याला जलपूर्ती सिंचन विहीर मंजूर झाली. स्वप्नपूर्तीसाठीची एक गोड बातमी त्याच्या कानावर पडल्यामुळे नव्या जोमाने उभे राहण्याचा त्याने ठाम निर्णय घेतला. विहीरीचे खोदकाम सुरू झाले अन् सोळा फुटावर पाणी लागले. बाजूलाच नाला असल्यामुळे पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात वाढू लागले. पाणी भरपूर असल्यामुळे वाया जाणाऱ्या पाण्याचे त्याने नियोजन केले व त्यातच त्याने उन्हाळ्यात कांद्याचे पीक घेतले. पाऊण एकरात ६० क्विंटल कांदा झाला. डिझेल इंजिन स्वत: विकत घेऊन शेतजमीन ओलिताखाली आणली. मग त्याने तिथेच वांगे व इतर भाजीपाला पिकविला. एका खाजगी टँकरलाही त्याने विहिरीतून पाणीपुरवठा केला. यामुळे त्याला विहीर बांधायच्या पूर्वीच आर्थिक स्थैर्याची चाहूल लागली.
सततच्या नापिकीने कंटाळलेल्या अशोकला या सिंचन विहिरीमुळे नवी उभारी मिळाली. त्यामुळे त्याने एक एकरात मान्सूनपूर्व कपाशी लावली. रस्त्यावरील त्याच्या शेतातील डोलणारे कपाशीचे पीक साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. उत्साह वाढल्यामुळे रब्बी व उन्हाळी पिकांकरिता दिवसरात्र राबण्यासाठी अशोक व त्यांचे कुटूंब सज्ज झाले आहे. त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली आहे.
No comments:
Post a Comment