Monday, May 28, 2012

'सांस्कृतिक महाराष्ट्र' : अर्धशतकाचा लेखाजोखा

मराठी भाषकांचे स्वतंत्र राज्य महाराष्ट्राच्या रूपाने साकार झाले, त्याला आता पन्नास वर्षे पूर्ण झाली. या वाटचालीत कठोर आत्मपरीक्षणाच्या जशा काही गोष्टी आहेत, तशा काही अत्यंत अभिमानाच्याही आहेत. 'महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ' ही त्यापैकी एक. महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या काळातच स्थापन झालेली संपूर्ण देशातील ही पहिली साहित्य व संस्कृतीविषयक शासकीय संस्था. याचे श्रेय अर्थातच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्याकडे जाते. त्यांची दूरदृष्टी आणि द्रष्टया नेतृत्वामुळेच पहिले अध्यक्ष म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारख्या ऋषीतुल्य व्यक्तित्वाचा लाभ या संस्थेला झाला.

साहित्य व संस्कृती मंडळाने राज्याच्या सुवर्णमहोत्सवाचे निमित्त साधून 'सांस्कृतिक महाराष्ट्र : १९६० ते २०१०' या दोन खंडातील ग्रंथरूपाने गेल्या पन्नास वर्षातील प्रगतीचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मंडळाचे विद्यमान अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी संपादित केलेला हा ग्रंथप्रकल्प स्व. यशवंतराव चव्हाण आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या स्मृतीला अर्पण केला आहे.

सुमारे एक हजार पृष्ठांच्या या ग्रंथप्रपंचात सर्व क्षेत्रातील वाटचालीचा आढावा घेण्यात आला आहे. पहिल्या खंडात कला, भाषा आणि साहित्य, माध्यमे, विज्ञान, अर्थकारण, राजकारण प्रशासन आणि स्थापत्य या क्षेत्रातील लेख आहेत, तर दुसऱ्या खंडात जलसंस्कृती-जलव्यवस्थापन, पर्यावरण, तत्व-न्याय, शिक्षण, इतिहास, श्रमसंस्कृती आणि जीवन या विषयावरील लेख आहेत. या सर्व विभागांचे सूक्ष्म व वस्तुनिष्ठ परीक्षण करण्यासाठी योग्य असे उपविभाग केले आहेत. आहे. उदा. कला विभागात रंगभूमी, मराठी चित्रपट, संगीत, चित्रकला-शिल्पकला, आणि लोककला व लोकसाहित्य अशी विभागणी केली आहे.

हे सरकारी प्रकाशन असले तरी वस्तुनिष्ठ परीक्षण करण्याचे स्वातंत्र्य मंडळाने लेखकांना दिले असल्याने, हा ग्रंथ सर्व अभ्यासक आणि चिकित्सकांना मोलाचा संदर्भसाधन ठरला आहे. अर्थात काही लेखकांनी वापरलेली आकडेवारी व माहिती ही प्राथमिक स्त्रोत म्हणून जशी उपयुक्त आहे, तशीच काही विषयांच्या संदर्भात लेखकांच्या स्वतंत्र दृष्टिकोणामुळे साधकबाधक चर्चेलाही वाव मिळाला आहे. या बृहद्ग्रंथाची नेमकी उपयुक्तता कोणती आणि साक्षेपी जागा कोणत्या याची समीक्षा होण्याची गरज आहे. त्यातूनच मंडळाचा व संपादकांचा उद्देश पूर्ण होण्याची शक्यता आहे.


डॉ. प्रमोद मुनघाटे

No comments:

Post a Comment