के. व्यंकटरमण हे एक महान रसायन शास्त्रज्ञ होते. त्यांचा `बेकर-वेंकटरमण ट्रान्सफॉर्मेशन' हा शोध जागतिक पातळीवर अत्यंत प्रसिद्ध आहे.
के. वेंकटरमण यांचे पूर्ण नाव कृष्णास्वामी वेंकटरमण. त्यांचे सहकारी त्यांनी `केव्ही' या नावाने हाक मारीत. केव्हींचा जन्म ७ जून १९०१ साली मद्रास (चेन्नई) येथे झाला. त्यांचे वडील सिव्हील इंजिनिअर होते, तसेच ते एक महान संस्कृत पंडितही होते. केव्हींना दोन भाऊ होते. केव्हींप्रमाणेच तेही अत्यंत हुशार होते, एक इंग्रजीचे प्रोफेसर होते, तर दुसरे डॉक्टर.
केव्हींचे शालेय शिक्षण चेन्नई येथे झाले. तेथूनच १९२३ साली त्यांनी रसायनशास्त्रात एम.ए.ची पदवी संपादन केली. त्यांचे रसायनशास्त्रातील दोन शिक्षक बी. बी. डे आणि टी. आर. शेषाद्री हे केव्हींचे आदर्श होते. मद्रास सरकारच्या शिष्यवृत्तीवर पुढील शिक्षणासाठी केव्ही मँचेस्टरला रवाना झाले. तिथे त्यांनी एम.एस्सी. (टेक), पी. एचडी. आणि डी. एस्सी. या उƒतम पदव्या संपादन केल्या.
तेथून परतल्यावर १९२७ साली त्यांना इंडियन इन्स्टीटय़ूट ऑफ बंगलुरू येथे संशोधक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तेथेच ते व्याख्याताही झाले. १९२९ फ्लॅवॉन नावाच्या एका रासायनिक मिश्रणाच्या पृथक्करणाची प्रक्रिया त्यांनी शोधून काढली. या शोधामुळे त्यांचे नाव जगभरातल्या रसायनशास्त्राच्या प्रथितयश शास्त्रज्ञांच्या यादीत घेतले जाऊ लागले.
या शोधामुळे आणखी एक मोठी संधी केव्हींकडे चालून आली. ती म्हणजे १९३४ साली त्यांना मुंबई विद्यापीठाच्या `युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी' (यु.डी.सी.टी.) या प्रख्यात संस्थेच्या प्राध्यापक पदाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती त्यांना करण्यात आली. त्यांनी ती आनंदाने स्वीकारली. यु.डी.सी.टी.ही रसायनशास्त्रातील जागतिक पातळीवरील एक महत्त्वाची संस्था. त्यामुळे या संस्थेत प्राध्यापक होणे हा त्यांच्या कामाचा आणि हुशारीचा सन्मान होता. केवळ चार वर्षांत ते यु.डी.सी.टी.चे प्रमुख झाले. पुढे १९ वर्षे ते यु.डी.सी.टी.चे डीन राहिले. या काळात त्यांनी यु.डी.सी.टी.मध्ये सर्वांगाने अनेक सुधारणा घडवून आणल्या. तेथे त्यांनी रसायन तंत्रज्ञानाचे अनेक नवनवीन अभ्यासक्रम सुरू केले. जागतिक दर्जाच्या अनेक शास्त्रज्ञांची व्याख्याने त्यांनी यु.डी.सी.टी.मध्ये आयोजित केली. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना रसायनशास्त्रात जागतिक पातळीवर काय चालू आहे, हे समजून घेण्यास खूप मदत झाली. मुख्य म्हणजे त्यांचे कार्य केवळ संशोधन पातळीवर राहिले नाही, तर त्यांनी अनेक कारखानदारांच्या रसायन उद्योगात भेडसावणार्या अनेक जटील समस्या सोडविल्या, त्यामुळे भारतात रसायन उद्योग नावारूपास येण्यात मदत झाली.
पुढे १९५७ साली आणखी एक मोठी संधी त्यांच्याकडे चालून आली. पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एन.सी.एल.)चे पहिले भारतीय संचालक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. नंतरच्या नऊ वर्षांत त्यांनी एन.सी.एल.ला आणखी उंचीवर नेऊन ठेवले.
खरे तर केव्ही १९६६ साली एन.सी.एल.मधून निवृत्त झाले. या काळात त्यांचा दम्याचा विकारही त्यांना त्रासदायक ठरत होता. पण त्याही परिस्थितीत त्यांनी एन.सी.एल.च्या संशोधन कार्यात सक्रियपणे भाग घेणे सोडले नाही. अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत, म्हणजे १२ मे १९८१पर्यंत त्यांनी रसायनशास्त्राच्या संशोधनात स्वत:ला वाहून घेतलेले होते.
केव्ही हे भारतातील रसायनशास्त्रातील अग्रगण्य नाव होते. पण संशोधनच नव्हे, तर शिक्षण आणि व्यवस्थापन क्षेत्रातही त्यांना उत्तम गती होती. त्यामुळे त्यांचा शिष्य-परिवार मोठा होता. त्यांना आपल्या संशोधन करीत असलेल्या विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करण्यात, त्यांना मार्गदर्शन करण्यात आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यात खूप रस होता. तसेच एन.सी.एल.ची व्यवस्थापकीय घडीही त्यांना नीट बसविता आली होती. आजही एन.सी.एल.ही जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य संस्था म्हणून नावलौकिक मिळवून आहे.
आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी २५० प्रबंध लिहिले आणि ८५ विद्यार्थ्यांना पी.एचडी. ही पदवी मिळविण्यासाठी मार्गदर्शन केले. या विद्यार्थ्यांपैकी अनेक जण पुढे उत्तम संशोधक म्हणून नावारूपास आले.
त्यांच्या कामाची अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थानी दखल घेतली. ते भारतातील तसेच रशिया, पोलंड यांसारख्या अनेक देशांतील राष्ट्रीय विज्ञान संस्थांचे सन्माननीय सदस्य होते. अनेक विज्ञान-नियतकालिकांचे संपादकपद त्यांनी सांभाळले होते.
केंद्र सरकारने १९६१ साली `पद्मभूषण' देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
केव्हींनी रचलेल्या रसायनशास्त्रातील भरीव कार्याच्या पायावर आज भारतातील संशोधन क्षेत्र आणि उद्योगधंदे भक्कमपणे उभे आहेत.
No comments:
Post a Comment