यवतमाळपासून काही अंतरावर असलेल्या एका गावात रेशीम
शेती शाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे आणि
त्यासाठी पुरेशी प्रसिध्दी व्हावी म्हणून त्या शाळेला भेट देण्याच्या
अनुषंगाने त्या गावाला जाण्याचा योग आला. गावात प्रवेश करताच माजी सरपंचाचे
घर लागते. तेथे थोडावेळ थांबून पुढे जाण्याचा बेत होता. मात्र माजी
सरपंचाच्या घरात लावण्यात आलेले विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार
स्वीकारतानाचे फोटो पाहून उत्सुकता म्हणून चौकशीस प्रारंभ केला आणि केवळ
६१८ लोकवस्ती असलेल्या या गावाच्या कथेने तेथेच खिळवून ठेवले. एखाद्या
शासकीय योजनेने संपूर्ण गावाचे भाग्य बदलू शकते ही कल्पनातील गोष्ट या
ठिकाणी प्रत्यक्षात अनुभवास आली. माजी सरपंच सांगत होते आणि आम्ही केवळ ऐकत
होतो.... गावाच्या परिश्रमाचे.... मेहनतीचे आणि नियोजनपूर्वक कामाचे
कौतुक....
यवतमाळपासून केवळ १० किलोमीटर अंतरावर असलेले रातचांदणा
हे गाव अचानक प्रकाशात आले आहे ते पंतप्रधान पॅकेजच्या यशस्वी अंमलबजावणीने
व त्यातून गावकऱ्यांनी साधलेल्या प्रगतीने. दुर्देवाने शेतकऱ्यांच्या
आत्महत्येचा शिक्का लागलेल्या या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी परिश्रमाने ही
नकोशी ओळख पुसून टाकली आहे. त्याचा सशक्त पुरावा म्हणून या गावाकडे पाहिले
जाते. नापिकी आणि कर्जबाजारीपणाची झळ या गावालाही पोहोचली होती. गावातील
बहुतांश शेतकरी कापूस उत्पादक असून नापिकीचा सामना करीत होते. अठराविश्व
दारिद्र्य असलेल्या गावात आज विकासाची गंगा वाहते आहे. घराघरात सुखसमृध्दी
आणि आर्थिक सुबत्ता आली आहे. गावातील बहुतेकांनी नियोजनपूर्वक मेहनतीने
दारिद्र्यावर मात केली आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
देण्यासाठी राज्य शासनाने पॅकेज दिले होते. त्यापाठोपाठ पंतप्रधानांनी
स्वत: विदर्भात येऊन पॅकेजची घोषणा केली होती. जोडधंद्याला या पॅकेजमध्ये
स्थान देण्यात आले होते. शेतकऱ्यांना शेती व्यतिरिक्त उत्पन्नाची साधने
निर्माण झाल्यास त्यांना आत्महत्याच करावी लागणार नाही. या उद्देशाने विविध
प्रकारचे जोडधंदे पॅकेजमधून सुरू करण्यात आले. याच पंतप्रधान पॅकेजमधून
रातचांदणा या गावाला २००७-०८ साली २० दुधाळ गाई देण्यात आल्या होत्या.
गावकऱ्यांनी या गाईंचा व्यावसायिक दृष्टीने नियोजनपूर्वक उपयोग केल्याने या
गावात आज दुधाची गंगा वाहते आहे.
पॅकेजमधील गाईंच्या माध्यमातून
स्वीकारलेला दुग्धव्यवसाय आज या गावाचा मुख्य व्यवसाय झाला आहे. आजमितीस
गावातील जवळजवळ प्रत्येकाकडेच दुग्धव्यवसाय असून त्यातून शेतीला चांगली जोड
गावकऱ्यांनी दिली आहे. गावकऱ्यांमधील एकी आणि दुग्धव्यवसायाप्रती असलेली
आत्मीयता हे सुध्दा या गावाच्या प्रगतीचे रहस्य आहे. पॅकेजमधील गाईंची
संख्या वाढत जाऊन ती आज ६०० इतकी झाली आहे. विदेशी जातीच्या गाईंपासून
चांगले दूध मिळते, त्यातून चांगले आर्थिक उत्पन्नही मिळते ही बाब
गावकऱ्यांच्या लक्षात आल्याने ज्यांच्याकडे गाई नव्हत्या त्यांनी दुधाळ
गाईंची खरेदी करून या व्यवसायाला चालना दिली. आज गावात देशी-विदेशी
जातीच्या बाराशेवर गाई असून १३०० ते १५०० लीटर दुध दरदिवशी गावात निघते.
प्रत्येकाकडे दुधाचा व्यवसाय असल्याने गाव धनसंपन्न झाले आहे. दर दिवशी
गावात किमान २५ हजार रूपये दुधाच्या माध्यमातून येतात.
केवळ
दुग्धव्यवसाय हीच आता गावाची ओळख राहिली नसून दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून
गावाने विविध क्षेत्रातही भरारी घेतली आहे. एखाद्या गावाला विकासाची
दृष्टी मिळाली की ते विविध क्षेत्रात सतत पुढे अग्रेसर होत जाते, असे
म्हटले जाते. तसेच या गावाचे झाले आहे. २००७ मध्येच गावाचे गाव संपूर्ण
हागणदारी मुक्त करून निर्मलग्राम होण्याचा संकल्प केला. नुसता संकल्पच केला
नाही तर केवळ एकाच वर्षात गावाने ही किमयाही साधली आहे. राष्ट्रपतींच्या
हस्ते गावाला पुरस्काराने गौरविण्यात आले आले. स्वच्छता अभियानाच्या
माध्यमातून गावात स्वच्छता आणि समृध्दीही नांदत आहे. गावात प्रवेश करताच ते
जाणवते. गावगाड्याच्या भानगडी विसरून गावकऱ्यांनी एकीतून साधलेले हे यश
असल्याचे माजी सरपंच अरविंद बेंडे आनंदाने सांगतात.
आता या गावाने
रेशीम शेतीची कास धरली आहे. स्वत: अरविंद बेंडे यांच्या रेशीम शेतीसह अन्य
काही गावकऱ्यांनी ही शेती आत्मसात केली आहे. त्यासाठी रेशीम विभागाचे
वेळोवेळी गावकऱ्यांना लाभलेले मार्गदर्शन कारणीभूत ठरले आहे. केवळ ही शेती
स्विकारून गावकरी थांबले नाहीत तर त्यात चांगले यशही मिळविले आहे. आजमितीस
बेंडे यांच्यासह रतन धानगुने, गणेस हेमने, रमेश हेमने, प्रभाकर दोणाडे,
मधुकर दोणाडे यांच्यासह अन्य काही शेतकरी रेशीम शेतीतून समृध्दी साधत आहे.
गावातील हा बदल गेल्या पाच वर्षात होत गेला आहे. ‘गाव तसे लहान पण लय भारी’
ही विदर्भात प्रसिध्द असलेली म्हण आता या गावाच्या बाबतीत तंतोतंत लागू
पडताना दिसते.
शासन शेतकरी तथा सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक
प्रकारच्या लोकोपयोगी योजना राबवितात. त्या योजनांचा सदुपयोग कसा घ्यायचा
हे शेवट लाभार्थ्यांनाच ठरवावे लागते. सदुपयोगातून गावाची, गावातील
नागरिकांची कशी प्रगती होत जाते, हे मात्र या गावाने आपल्या आश्चर्यकारक
बदलातून सिध्द केले आहे.
मंगेश वरकड, माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय,यवतमाळ
No comments:
Post a Comment