सर्वाधिक कापूस पिकविणारा, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून परिचय असलेल्या यवतमाळ जिल्ह्याची विषयखोल्यांच्या निमित्ताने शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात साकारल्या नसतील एवढ्या विविध विषयांच्या दर्जेदार विषयखोल्यांची निर्मिती यवतमाळ जिल्ह्यात करण्यात आली आहे. यात आणखी भर म्हणजे मानव विकास मिशनमधून झरी व घाटंजी या आदिवासी बहुल तालुक्यात तब्बल ८२ विषयखोल्या निर्माण करण्यात येत असून त्यातील अनेक खोल्या पूर्ण झाल्या आहेत.
राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा खालावला असल्याची ओरड नेहमीच होत असते. सर्वत्र काहीसे निराशेचे वातावरण असताना यवतमाळ जिल्ह्याने मात्र विषयखोली निर्मितीत पुढाकार घेऊन एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी हे दोन्ही विषय रूक्ष आणि कठीण वाटतात. ग्रामीण भागात या दोन्ही विषयासाठी आवश्यक वातावरण निर्मिती होत नसल्याने विद्यार्थी या दोन्ही विषयात मागे पडतात.
शालेय जीवनाचा विद्यार्थ्यांचा पायाच मजबूत केल्यास विद्यार्थी चांगली प्रगती करु शकतील, यासाठी पर्याय म्हणून विषयखोल्या हा अतिशय चांगला पर्याय पुढे आला आहे. नेमकी ही बाब हेरून सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील संशोधन साहाय्यक मंगेश देशपांडे यांनी सन २००१ मध्ये गवळा येथे जिल्ह्यातील पहिली इंग्रजी भाषा प्रयोगशाळा निर्माण केली. त्यानंतर गवंडी, उमरखेड तालुक्यातील पोफाळी, अंबाडी, कळमुळा येथे इंग्रजी आणि गणित या विषयाच्या विषयखोल्या निर्माण केल्या. सन २००४-०५ मध्ये तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी लक्ष्मीकांत पांडे यांनी या विषयखोल्यांनी प्रभावित होऊन यवतमाळ येथील सर्वशिक्षा अभियान कार्यालयात इंग्रजी, गणित, भूगोल विषयातील वसुंधरा या विषयखोल्यांची निर्मिती केली.
इंग्रजी विषयखोलीमध्ये वातावरण निर्मिती, शब्दसंग्रह वाढविणे, भाषिक खेळ, रूक्ष असलेल्या विषयाची गोडी निर्माण करण्यासाठी विविध साधनांचा उपयोग केला जातो. गणित विषयखोलीच्या निमित्ताने शैक्षणिक साधनाच्या माध्यमातून कठीण वाटणारा हा विषय सोप्या व मुलांमध्ये विषयाबद्दलची आवड निर्माण होईल या पद्धतीने शिकविला जातो. भूगोल हा विषय शिकविताना निसर्गाच्या सानिध्यात व मोकळ्या वातावरणात जाणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन विषयखोल्या साकारताना तशी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे कठीण वाटणारे हे विषय विद्यार्थ्यांना आपलेसे वाटू लागले आहेत. विषयखोल्यांमुळे विद्यार्थ्यांचे गणित, इंग्रजी सारख्या विषयांबद्दलची असलेली भीती कमी झाली असून ते विषय विद्यार्थी सहजतेने समजून घेत असल्याचे दिसून येत आहे.
No comments:
Post a Comment