ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून विविध योजनेतून पाण्याची उपलब्धता करुन देण्यास प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. गडचिरोली तालुक्यातील येवली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रामपूर गावात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सौर उर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केल्यामुळे हे गाव पाण्यासाठी स्वंयपूर्ण झाले आहे.
सौर उर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ पाणी पुरवठा योजनेमूळे कायमचा पाण्याचा प्रश्न मिटला असून पाण्यासाठीची भटकंतीही बंद झाली आहे. या गावात एकूण ४०२ एवढी लोकसंख्या असून एकूण ८० घरे आहेत. पूर्वी या गावात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना खूप पायपीट करावी लागे. परंतु या नाविन्यपूर्ण योजनेमूळे गाव पिण्याच्या पाण्यासाठी आता परिपूर्ण झाले आहे. घरोघरी नळाव्दारे पिण्याचे पाणी मिळत असल्यामुळे महिला आनंदात आहेत..
ही योजना सुरु केल्यामुळे नळाचे पाणी सौर उर्जेव्दारे उपसा करुन ते टाकीत जमा करण्यात येते. आणि टाकीतील पाणी नळाव्दारे प्रत्येकाच्या घरी पुरविले जाते. ही योजना सौर उर्जेवर आधारित असल्यामुळे ग्रामपंचायतीला विद्युत बिल भरण्याची गरज भासत नाही. तसेच विद्युत विना ही योजना बंद होईल ही भीती देखिल राहीलेली नाही या पंपाव्दारे हाताने हँडलचा वापर करुन देखील पाणी काढण्याची सुविधा आहे. ही लघु नळ पाणी पुरवठा योजना निरंतर चालणारी असल्याने ग्रामीण भागातील जनतेसाठी लाभदायी ठरली आहे.
No comments:
Post a Comment