Thursday, May 31, 2012

ऐतिहासिक ठेवा

रत्नागिरी जिल्ह्याची भटकंती इतिहासप्रेमींसाठी पर्वणीच असते. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमधून हिंडतांना इतिहासातील अनेक प्रसंग डोळ्यासमोर तरळतात...छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व आणि स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या मावळ्यांचा पराक्रम आठवतो...त्याचबरोबर अनेक गडकिल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंना भेट देतांना स्थापत्यकलेचे अद्भूत नमुने न्याहाळता येतात. दापोली परिसरात फिरतांना कोकणचे अस्सल सौंदर्यही डोळ्यास पडते. म्हणूनच पर्यटकांचा या परिसराकडे जास्त ओढा असतो.

दापोली थंड हवचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. दापोलीला आल्यावर कोकण कृषी विद्यापीठाला आवर्जुन भेट द्यावी. विद्यापीठातील अनेक नवे प्रयोग अचंबित करणारे तेवढेच शेतीत रुची असणाऱ्यांसाठी उपयुक्त आहेत. विद्यापीठातील विविध उद्यानांची रचनादेखील तेवढीच सुंदर आहे. दापोली परिसरात कृषी पर्यटन केंद्रात दिवस घालविल्यास 'कोकणी लाईफस्टाईल'ची मजा लुटता येते. इथे फळबागामधील भटकंती आणि थकल्यावर मिळणारा कोकणी पद्धतीच्या आहाराचा आनंद काही निराळाच असतो.

दापोली दाभोळ रस्त्यावर १५ किलोमीटर अंतरावर नानटे गाव आहे. गावाच्या अलिकडे डाव्या बाजूला सुप्रसिद्ध पन्हाळेकाजी लेण्यांकडे जाण्यासाठी रस्ता आहे. साधारण २० किलोमीटर अंतर डोंगराळ भागातून प्रवास केल्यावर कोटजाई आणि धाकटी नद्यांच्या संगमावर या लेण्यांच्या रुपात शिल्पकलेचा अद्भूत नमुना पहायला मिळतो. गाणपत्य आणि नाथ संप्रदायातील लेणी आणि शिल्प असलेल्या २९ गुंफा येथे आहेत. गणपतीची सुंदर मुर्ती पर्यटकांचे लक्ष आकर्षुन घेते. लेण्यात असलेल्या स्तंभावरील कोरीव कामही कलाकुसरीचा उत्तम नमुना आहे. नाथपंथीय साधकांची शिल्पेदेखील या ठिकाणी पाहायला मिळतात. परतीच्या प्रवासात केळीलमार्गे मळे गावात मुख्य मार्गाला आपण लागतो.

मळेपासून दापोलीकडे चार किलोमीटर अंतरावर चिखलगाव हे लोकमान्य टिळकांचे मुळ गाव आहे. चिखलगावला टिळकांच्या वाड्याचेच नुतनीकरण करून त्याठिकाणी लोकमान्य टिळकांचे मंदिर उभारण्यात आले आहे. लागूनच असलेल्या जागेत त्यांच्याच स्मृतीत प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली आहे. चिखलगावचा परिचय आणखी एका कारणाने करून दिला जातो. राजा आणि रेणु दांडेकर या दाम्पत्याने ग्रामीण भागातील गरजूंसाठी मोठा शैक्षणिक प्रकल्प येथे उभा केला आहे. एखादे मोठे कार्य अडथळ्याची शर्यत पार करून कसे उभे राहते याचे उत्तम उदाहरण या शैक्षणिक परिसरात अनुभवता येते.

दापोलीहून गुहागरकडे जाताना साधारण ३० किलोमीटर अंतरावर देवी चंडीकेचे जागृत देवस्थान आहे. हिरव्यागार परिसरात डोंगरातील दगडांमध्ये कोरीव काम करून मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराच्या दारातच भव्य प्रवेशद्वार आणि दिपमाळ आहे. नंदादिपाच्या प्रकाशात गुहेत जाऊन देवीचे दर्शन घ्यावे लागते. मंद प्रकाशात दिसणारी देवीची मुर्ती नजरेत साठवून घ्यावीशी वाटते. नंदादिपांनी प्रकाशीत गुहेतील वाटही तेवढीच सुंदर दिसते. गुहेत प्रदक्षिणा मार्ग तयार करण्यात आला आहे.मंदिराशेजारी असलेल्या आणखी एका गुहेतून पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर आलेला दिसतो. भाविक या ठिकाणी स्नानदेखील करतात. हा प्रवाहकुंड पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते.

श्री चंडिकेचे दर्शन घेतल्यावर दाभोळच्या खाडीला लागून असलेल्या अंडा मशिदीचे सौंदर्य न्याहाळता येते. अप्रतिम कोरीव काम आणि कलाकुसरीचा नमुना या मशिदीच्या प्रत्येक भागात पाहायला मिळतो. विजापूरच्या शाही जामा मशिदीची प्रतिकृती असलेल्या या भव्य वास्तूत स्थापत्य कलावैभवाची झलक पहायला मिळते. विजापूरची राजकन्या मॉसाहेब आयेशाबिबी हीने १६५९ मध्ये खराब हवामानामुळे मक्का प्रवास न करता आल्याने धार्मिक कार्य करण्याच्या हेतून चार वर्षात या मशिदीचे काम करून घेतले.त्याकाळात ही वास्तू उभारण्यासाठी १५ लाख रुपये खर्च आल्याची माहिती याठिकाणी मिळते.

दाभोळच्या खाडीतून गुहागरकडे जाण्यासाठी फेरीबोटीची व्यवस्था आहे. पाच मिनिटातच वाहनासह गुहागर तालुक्यात प्रवेश करता येतो. खाडीच्या पलिकडे धोपावे गावातून वेलदूरमार्गे गुहागरला जाताना अंजनवेल येथील गोपाळगडला भेट देता येते. अजूनही या गडाची तटबंदी मजबूत आहे. सात एकर परिसरात किल्ला पसरला आहे. वेलदूरहून बोटीने जाऊनही किल्ला बघता येतो. किल्ल्यापासून एक किलोमीटर अंतरावर अंजनवेलचे दिपगृहेदेखील आहे. परतीच्या प्रवासात विस्तीर्ण परिसरात असलेला प्रसिद्ध रत्नागिरी गॅस ऊर्जा प्रकल्प दिसतो. गुहागरला परतल्यावर नारळाची दाट रांग आपल्या स्वागतासाठी तयार असते. निसर्ग सौंदर्याचे आगर असलेल्या या गावातील मुक्काम खरोखर आनंददायी असतो. खरं तर निसर्गाचे सान्निध्यच मुळात आनंद देणारे असते. व्यवहाराचा विचारही मनात न आणता हृदयाचे कप्पे उघडून मोकळा श्वास घेण्याची तयारी आपली असेल तरच हं!

  • डॉ.किरण मोघे
  • Wednesday, May 30, 2012

    मानव विकास मिशनमुळे मिळाला आधार

    हाताला काम असेल तर पोटाला भाकर मिळेल, अशा मानसिकतेत असलेल्यार बेरोजगारांना मानव विकास मिशनच्याा माध्यामातून व्य वसाय कौशल्यत प्रशिक्षण देण्यारत येत आहे. परभणी जिल्ह्याणतील सुमारे २ हजार तरुणांना स्व‍यंरोजगार प्रशिक्षण मिळाले आहे.

    अन्ना, वस्त्रप, निवारा या मानवाच्याष मुलभूत गरजा आहेत. आरोग्यज, शिक्षण, मनोरंजन यांनाही मुलभूत गरजांइतकेच महत्व् म आहे. मानव विकास निर्देशांकानुसार राज्या त परभणी जिल्हच.याचा क्रमांक बराच खाली आहे. औद्योगिक विकासात इतर जिल्ह्या च्या तुलनेत मागे असल्यााने रोजगाराच्या. संधी कमी प्रमाणात उपलब्धआ आहेत. परभणी जिल्ह्याातील मानव विकास निर्देशांकाची स्थिती सुधारावी, यासाठी जिल्ह्याकतील सर्वच्याप सर्व म्हतणजे नऊ तालुक्यांाचा मानव विकास मिशनमध्येा समावेश करण्याात आला आहे. या मिशननुसार ग्रामीण भागातील तरुण , सुशिक्षीत बेरोजगार, महिला यांना स्थाणनिक पातळीवर उपलब्ध. होऊ शकणा-या रोजगारानुसार प्रशिक्षण देण्या्त आले. त्याानुसार वाहन चालविणे, इलेक्ट्री शियन, वेल्डार, इलेक्ट्रॉ निक्सइ, बांधकाम, संगणक, टेलरकाम इत्या दी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्याइत आले. लाभार्थी निवडताना पारदर्शकता बाळगण्या्त आली. वृत्त पत्राद्वारे तसेच विविध माध्ययमांद्वारे जनजागृती करण्यायत आली.
    गावागावात जाऊन लाभार्थ्यांीची निवड करण्यामत आली.

    आर्थिकदृष्ट्या कमजोर लाभार्थी प्रशिक्षणासाठी इतरत्र जाऊ शकत नव्हवते, त्यांेना स्थायनिक पातळीवरच प्रशिक्षण देण्यादत आले. त्‍यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था‍ची मदत घेण्याात आली.

    परभणी जिल्ह्याततील ग्रामीण भागातील सुमारे २ हजार तरुणांच्या कौशल्याेत मानव विकास मिशनमुळे वाढ होण्याजस मदत झाली.

    पत्रावळीच्या उद्योगाद्वारे हिराजीबाबा महिला बचतगटाचे अर्थार्जन

    स्थानिक स्तरावर उपलब्ध साधन सामग्रीचा पुरेपूर उपयोग करून भूमीपुत्रांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा नेहमीच प्रयत्न असतो. याचाच धागा पकडून जास्तीत जास्त प्रतिसाद देण्याची दूरदृष्टी महिला बचतगटाला लागली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील (अकलापाडा) पिंपळखुटा येथील हिराजीबाबा महिला बचत गटाने हे प्रत्यक्ष कृतीने दाखविले आहे.

    महिला बचतगटाच्या माध्यमातून अनोखे नियोजन आणि वाया चाललेल्या नैसर्गिक साधनांचा वापर करून येथील महिला बचतगटाने वाया जाणाऱ्या वडाच्या पानापासून पत्रावळी बनवून अर्थार्जनाचे साधन निर्माण केले आहे.

    पिंपळखुटा हा आदिवासी भाग. फारशा सुविधा नाहीत. परंतु उपलब्ध सुविधांचा वापर करुन गावातील हिराजीबाबा महिला बचतगटातील सदस्यांनी एकत्र येऊन वडाच्या वाया जाणाऱ्या पानांपासून पत्रावळ्या बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा संकल्प केला. श्रम हेच भांडवल समजून महिलांनी कामास सुरूवात केली. गट विकास अधिकारी शंकरराव वळवी, ग्रामसेवक आर.डी.पवार, सितारामभाऊ राऊत, बायफ मित्र संस्था यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन मिळाले. संस्थेने पत्रावळ्याची संपूर्ण माहिती संकलित करुन महिला बचतगटाच्या सर्व महिलांना याची माहिती दिली. सर्व महिला कामाला लागल्या. वडाची पाने काढून पत्रावळ्या तयार करण्यापर्यंतची कामे एकजुटीने करु लागल्या. अक्कलकुवा तालुक्यात सर्व दुकानदारांशी संपर्क साधून पत्रावळ्यांचा पुरवठा सुरू झाला.

    त्यांनी ८० रुपये शेकडा प्रमाणे विक्री केली. विक्रीत हळू हळू वाढ झाली. प्रतिदिनी स्थानिक मागणी वाढत असल्याने दरही चांगला मिळू लागला. लग्न सराईत तर या महिलांनी चांगली आर्थिक प्राप्ती केली. बचतगटाच्या महिला आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून फावल्या वेळात पत्रावळ्या तयार करीत आहेत आणि त्यातून चांगली आर्थिक प्राप्त होत आहे. याच अनुभवातून अशा इतर व्यवसायांचा अभ्यासही या महिलांनी सुरू केला आहे. या महिलांनी गावात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणही केले आहे.

    पुनीबाई टेड्या नाईक अध्यक्ष असलेल्या या गटात सौ.माकतीबाई नोबल्या राऊत या उपाध्यक्ष तर सौ.निर्मलाबाई सिताराम राऊत या सचिव म्हणून काम पाहतात. सौ.कमलाबाई राऊत, सौ.खाटकीबाई वसावे, सौ.हाअटीबाई राऊत, सौ.मिठुबाई राऊत, सौ.बोटाबाई राऊत, सौ.दोहरीबाई राऊत, सौ.शिवलीबाई राऊत, सौ.गिताबाई पाडवी, सौ.खारकीबाई राऊत, विमलाबाई सोन्या तडवी या सदस्यांची त्यांना उत्तम साथ लाभते. सर्वांनी एकत्र येऊन केलेल्या प्रयत्नांमुळे कोणतेही भांडवल नसताना लहान व्यवसायाच्या माध्यमातून पुरेसा रोजगार निर्माण करण्याबरोबरच ग्रामीण कारागिरांच्या कला कौशल्याला वाव देण्याचे महत्वपूर्ण काम या महिलांनी केले आहे.

  • मेघश्याम महाले, माहिती सहायक, नंदुरबार
  • शेवगा शेतीचा 'मराळे' पॅटर्न

    नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील शहा गावातील बाळासाहेब मराळे या शेतकऱ्याने गेल्या तेरा वर्षापासून शेवगा या पिकाच्या उत्पादनाचा ध्यास घेतला आहे. पुरेशा पाण्याअभावी शेतीत मर्यादा आल्या असताना मोठ्या हिकमतीने त्यांनी शेवगा पिकाचा पर्याय शोधला. अहोरात्र परिश्रमाने, चिकाटीने, त्यांची शेवगा शेती बहरली आहे. एवढेच नव्हे तर राज्याचा सीमा ओलांडून परराज्य आणि देशाबाहेरही त्यांच्या शेवगा शेतीचा प्रचार झाला आहे. त्यांनी शोधलेल्या रोहित-१ या नवीन शेवगा वाणाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनाही चांगले अर्थार्जन होऊ लागले आहे.

    नाशिक येथे आय.टी.आय.ची पदवी घेतल्यानंतर बाळासाहेब मराळे यांना पुणे येथे नोकरी करताना अनेकदा कंपन्यांकडून मिळणाऱ्या ब्रेकचा अनुभव घ्यावा लागला. ते १९९७ वर्ष होते. सहा महिने झाले की ब्रेक देणाऱ्या कंपन्यांना ते वैतागून गेले होते. अशातच घरच्या शेतीची नाळ काही सुटलेली नव्हती. त्यात काय करता येईल याचा विचार सुरू असायचा. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा पुण्याच्या गुलटेकडी बाजारपेठेत विविध शेतीमाल पाहत असताना ट्रकच्या ट्रक भरुन शेवगा आलेला दिसला. पाठपुरावा केला असता तामिळनाडू व गुजरातेतून तो महाराष्ट्रात विक्रीसाठी येतो असे समजले. महाराष्ट्रात त्या काळी फारसा शेवगा दिसायचा नाही. यावरुन शेवग्याच्या बाजारपेठेची क्षमता मराळे यांच्या लक्षात आली. पुढे मग या पिकाचे बियाणे मिळविण्याचा छंद लागला.

    दुसरी बाजू अशी होती की सिन्नर तालुक्यातील त्यांच्या शहा गावचा परिसर वर्षानुवर्षे अवर्षणग्रस्त भाग. उन्हाळ्यातील दोन तीन महिने तर पाण्याचे दुर्भिक्षच. त्यांच्या वाट्याला दहा एकराची जमीन आली होती. मात्र ते खडकाळ माळरान असल्यामुळे तेथे पाणी मुरायचे नाही. बाजरी किंवा तत्सम पिकाची शेती करताना वर्षाला अत्यंत तुटपुंजे उत्पन्न हाती पडायचे. त्यातून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणे अवघड होते. त्यामुळे पारंपरिक पीक पद्धतीत बदल करण्याचे मराळे यांचे प्रयत्न सुरू होते. शेवगा पिकासाठी त्यांनी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना भेट दिली. राज्याबाहेर चेन्नई, केरळपर्यंत ते पोहोचले. चेन्नई परिसरात भर उन्हाळ्यात हलक्या जमिनीमध्ये ३० ते ४० एकर क्षेत्रात शेवग्याची समाधानकारक वाढ असलेली झाडे त्यांनी पाहिली. आपल्याकडेही अशा परिस्थितीत शेवगा चांगला येईल, असा विश्वास त्यातून निर्माण झाला. या पिकाची अधिक माहिती घेण्यासाठी ते कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, गुजरात आदी राज्यात जाऊन आले.

    मराळे यांनी या पिकाचा बारकाईने अभ्यास सुरू केला. बाजारपेठेचे सर्वेक्षण करुन दर लक्षात घेतले. सर्व बाबी विचारात घेऊन त्यांनी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणाऱ्या भागाला कमी क्षेत्रात, कमी पाण्यात शेवगा पिकाचा पर्याय देण्याचे नक्की केले. ते वर्ष होते १९९९.

    शेवगा शेतीला घरातून विरोध झाला. मात्र या पर्यायावर मराळे ठाम होते. सुरुवातीस एक एकर क्षेत्र या पिकासाठी निवडले. विविध राज्यातून तसेच स्थानिक भागामधून शेवग्याचे विविध अठरा वाण आणून त्यांची लागवड केली. पहिल्या सहा महिन्यात एक एकर क्षेत्रातून पंचवीस हजारांचे उत्पन्न मिळाले. त्यातून उत्साह वाढला. पहिले उत्पादन स्थानिक बाजारपेठेतच विकले. पुढच्या वर्षी मुंबई बाजारपेठेकडून असलेली मागणी त्यांच्या लक्षात आली. तेथे कोणत्या गुणवत्तेच्या शेंगांना अधिक दर मिळतो, तसेच निर्यातीसाठी कोणत्या प्रकारचा दर्जा लागतो हे देखील व्यापाऱ्यांकडून समजले. आकर्षक गर्द पोपटी हिरवा रंग, गोड गर, अधिक टिकवण क्षमता, मध्यम आकार असलेल्या शेंगांना निर्यातीसाठी अधिक मागणी असते हे समजले. त्यानुसार त्यांनी उत्पादनामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी मेहनत घेतली. आता विविध प्रयोग करीत त्यांचा या पिकातील अनुभव दांडगा झाला आहे. व्यापाऱ्यांमार्फत त्यांचा शेवगा आखाती तसेच युरोपीय देशात निर्यात केला जातोय. अर्थात हा झाला मराळे यांच्या शेतीतील एक टप्पा.

    शेवगा वाणाचा झाला प्रसार

    दुसरा महत्वाचा टप्पा म्हणजे त्यांच्या शेवगा शेतीचा प्रचार केवळ राज्यातील विविध जिल्ह्यात नव्हे तर परराज्य व ती ही सीमा ओलांडून परदेशापर्यंत पोहोचला आहे. गेल्या तेरा वर्षाच्या कालावधीत सुमारे १६ हजार शेतकऱ्यांनी त्यांच्या शेवगा शेतीला भेट दिली आहे. असंख्य शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून शेवगा वाण घेऊन आपल्या शेतात त्याची लागवड केली आहे. शेवगा शेती बरोबरच त्यांनी फक्त शेवगा रोपांची स्वतंत्र नर्सरी सुरू केली आहे. त्यातून उच्च दर्जाच्या रोपांची निर्मिती करुन ती शेतकऱ्यांना पुरवली जातात. त्यातील उत्पादनातूनही त्यांना चांगले अर्थार्जन होत आहे. त्यांच्या शेवगा शेतीतील तेरा वर्षाच्या अनुभवाचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा झालाच पण परराज्यातील शेतकरीही त्यांच्या अनुभवाचा लाभ घेत आहेत. हेच मराळे यांच्या शेवगा शेतीचे यश म्हणावे लागेल. आपल्या तंत्राचा इतर शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून त्यांनी 'आधुनिक शेवगा लागवड' व 'शेवगा लागवड तंत्र आणि मंत्र' ही दोन पुस्तके लिहिली आहेत. सद्यस्थितीत दोन्ही पुस्तकांच्या आवृत्या संपल्या असून तिसऱ्या आवृत्तीचे काम चालू आहे. या शिवाय २००२ मध्ये त्यांनी शेवगा शेतीची माहिती देणारी www.drumsticksindia.com ही वेबसाईट सुरू केली आहे.

    एका वेगळ्या वाणाचा इतिहास

    श्री.मराळे यांच्या शेतीतील जे वाण आज अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाहायला मिळते त्याचे नामकरण त्यांनी रोहित-१ असे केले आहे. या वाणाचा इतिहास शोधायचा तर पूर्वी विविध वाणांचे बियाणे आणून ते शेतात वाढवण्याचा छंदच त्यांना लागला होता. एकदा आपला माल ते मुंबईत विक्रीसाठी घेऊन गेले होते. त्यावेळी त्यातील वेगळ्या गुणवत्तेच्या शेंगा एका व्यापाऱ्याने निदर्शनास आणून दिल्या आणि त्या निर्यातीसाठी योग्य असल्याचे सांगितले. मराळे यांनी त्यानंतर तशा शेंगा देणारे झाड शोधले. अन्य वाणांच्या तुलनेत या वाणाचे गुणधर्म व वैशिष्ट्ये वेगळी होती. त्यानंतर २००१ ते २००४ दरम्यान या झाडाचे सतत निरीक्षण व अभ्यास सुरू केला. त्याची वृद्धी केली. स्वतंत्र प्लॉट केला. स्थानिक बाजारपेठेत तसेच परदेशी बाजारपेठेत त्याला चांगला दरही मिळू लागला. हे वाण कोणत्या राज्यातले व कोणत्या भागातले आहे हे सांगणे कठीण आहे. मात्र मी ते चांगले वाढवले. या वाणाचे नामकरण केल्यास त्या नावाने चांगला दर मिळू शकेल, असे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी व सामाजिक काम करणाऱ्यांच्या आग्रहावरुन त्यांनी २००५ मध्ये त्याचे रोहित-१ असे नामकरण केले आहे.

    आता तीन एकरावर केवळ हेच वाण वाढवले आहे. गेल्या सहा वर्षात या वाणाची सहा राज्यात लागवड झाली असून पूर्वीच्या शेवगा जातीपेक्षा शेतकऱ्यांना या वाणापासून १० ते ३० टक्के जास्त उत्पन्न मिळाले आहे. या शिवाय श्रीलंका, इस्त्राईल, ऑस्ट्रेलिया, तैवान, चीन, जपान या देशातील शेतकऱ्यांनी व कृषी तज्ज्ञांनी मराळे यांच्या शेवगा शेतीला भेट देऊन आपआपल्या देशामध्ये रोहित-१ या वाणाची लागवड केली आहे.

    श्री.मराळे यांनी तेरा वर्षात शेवगा शेतीतील केलेल्या विविध प्रयोगाची व संशोधनाची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. श्री.मराळे म्हणाले, शेवग्यापासून चांगला आर्थिक फायदा होण्यासाठी ४ ते ५ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ७ ते १० एकर क्षेत्रावर लागवड करुन ग्रुप पद्धतीने विक्री व्यवस्था तयार केली तर शेवगा शेंगांची स्थानिक बाजारपेठेपासून त्या त्या जिल्ह्यातील भाजी मार्केटमध्ये विक्री करता येऊ शकेल. तसेच पुणे, मुंबई, हैद्राबाद, बेंगलोर, नागपूर, इंदोर, अहमदाबाद ह्या शेवगा शेंगा विक्रीच्या मोठ्या बाजारपेठा आहेत. तेथे विक्री करूनही अधिक लाभ मिळविता येऊ शकेल.

    एकूणच शेवगा शेतीतील मराळे यांनी केलेल्या या प्रयोगामुळे अनेक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांमुळे कृषी क्षेत्राला नवसंजीवनी मिळू शकेल, यात शंका नाही.

  • देवेंद्र पाटील, जिल्हा माहिती अधिकारी, नाशिक
  • Monday, May 28, 2012

    'सांस्कृतिक महाराष्ट्र' : अर्धशतकाचा लेखाजोखा

    मराठी भाषकांचे स्वतंत्र राज्य महाराष्ट्राच्या रूपाने साकार झाले, त्याला आता पन्नास वर्षे पूर्ण झाली. या वाटचालीत कठोर आत्मपरीक्षणाच्या जशा काही गोष्टी आहेत, तशा काही अत्यंत अभिमानाच्याही आहेत. 'महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ' ही त्यापैकी एक. महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या काळातच स्थापन झालेली संपूर्ण देशातील ही पहिली साहित्य व संस्कृतीविषयक शासकीय संस्था. याचे श्रेय अर्थातच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्याकडे जाते. त्यांची दूरदृष्टी आणि द्रष्टया नेतृत्वामुळेच पहिले अध्यक्ष म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारख्या ऋषीतुल्य व्यक्तित्वाचा लाभ या संस्थेला झाला.

    साहित्य व संस्कृती मंडळाने राज्याच्या सुवर्णमहोत्सवाचे निमित्त साधून 'सांस्कृतिक महाराष्ट्र : १९६० ते २०१०' या दोन खंडातील ग्रंथरूपाने गेल्या पन्नास वर्षातील प्रगतीचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मंडळाचे विद्यमान अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी संपादित केलेला हा ग्रंथप्रकल्प स्व. यशवंतराव चव्हाण आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या स्मृतीला अर्पण केला आहे.

    सुमारे एक हजार पृष्ठांच्या या ग्रंथप्रपंचात सर्व क्षेत्रातील वाटचालीचा आढावा घेण्यात आला आहे. पहिल्या खंडात कला, भाषा आणि साहित्य, माध्यमे, विज्ञान, अर्थकारण, राजकारण प्रशासन आणि स्थापत्य या क्षेत्रातील लेख आहेत, तर दुसऱ्या खंडात जलसंस्कृती-जलव्यवस्थापन, पर्यावरण, तत्व-न्याय, शिक्षण, इतिहास, श्रमसंस्कृती आणि जीवन या विषयावरील लेख आहेत. या सर्व विभागांचे सूक्ष्म व वस्तुनिष्ठ परीक्षण करण्यासाठी योग्य असे उपविभाग केले आहेत. आहे. उदा. कला विभागात रंगभूमी, मराठी चित्रपट, संगीत, चित्रकला-शिल्पकला, आणि लोककला व लोकसाहित्य अशी विभागणी केली आहे.

    हे सरकारी प्रकाशन असले तरी वस्तुनिष्ठ परीक्षण करण्याचे स्वातंत्र्य मंडळाने लेखकांना दिले असल्याने, हा ग्रंथ सर्व अभ्यासक आणि चिकित्सकांना मोलाचा संदर्भसाधन ठरला आहे. अर्थात काही लेखकांनी वापरलेली आकडेवारी व माहिती ही प्राथमिक स्त्रोत म्हणून जशी उपयुक्त आहे, तशीच काही विषयांच्या संदर्भात लेखकांच्या स्वतंत्र दृष्टिकोणामुळे साधकबाधक चर्चेलाही वाव मिळाला आहे. या बृहद्ग्रंथाची नेमकी उपयुक्तता कोणती आणि साक्षेपी जागा कोणत्या याची समीक्षा होण्याची गरज आहे. त्यातूनच मंडळाचा व संपादकांचा उद्देश पूर्ण होण्याची शक्यता आहे.


    डॉ. प्रमोद मुनघाटे

    Sunday, May 27, 2012

    दोस्ती का सफर आगे बढे...

    शासकीय बैठका.. पुरस्कार वितरण..असे अनेकविध उपक्रमांनी सह्याद्री अतिथीगृह व्यस्त असते. मात्र बुधवारच्या (दि.२३ मे २०१२) सायंकाळी या अतिथीगृहाने एक वेगळेच भारावलेले वातावरण अनुभवले.. निमित्तही तसेच होते.. भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये अमन आणि भाईचारा वाढीस लागावा या उद्देशाने मुंबईच्या भेटीवर पाकिस्तानमधील पत्रकारांचे शिष्टमंडळ आलेले आहे...या पत्रकारबांधवांसोबत चर्चा आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आयोजित केला होता. पाकिस्तानी शिष्टमंडळातील पत्रकारांसमवेत मुंबईतील दैनिकं व विविध वृत्तवाहिन्यांच्या संपादकांनाही विशेष निमंत्रण देण्यात आले होते. या मान्यवरांच्या उपस्थितीने सह्याद्री अतिथीगृहातील कालचा हा छोटेखानी सोहळा मात्र अनेकांच्या मनात घर करून गेला..आणि सह्याद्री अतिथीगृहावरील कालची सायंकाळ माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली...

    ठीक आठच्या सुमारास पाकिस्तानातील पत्रकारांचे शिष्टमंडळ सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाले..त्यांच्यासमवेत मुंबई प्रेस क्लबचे सदस्य देखील होते. मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील, मुंबई उपनगराचे पालकमंत्री नसीम खान, राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री फौजिया खान यांनी या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले.. आणि सह्याद्रीतल्या कॅबिनेट हॉलमध्ये कार्यक्रमाला सुरवात झाली.. मुख्यमंत्र्यांनी मान्यवरांच्या आसनाजवळ जाऊन प्रत्येकाचे स्वागत केले..
    दो मुल्क जो पडोसी होते है
    उनके सभी रिश्ते
    सरहदोको लिपटके खिलते है।

    या काव्यपंक्तीने सुत्रसंचालनाची सुरुवात करीत संचालक श्रद्धा बेलसरे यांनी कार्यक्रमाचा `समा` बांधण्यास सुरुवात केली. शिष्टमंडळातील पत्रकारांचा परिचय श्रीमती बेलसरे यांनी करून दिल्यानंतर मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी पत्रकारांशी हितगुज करायला सुरुवात केली. महाराष्ट्राची महती सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र हे जगातील मोठ्या राज्यांपैकी एक आहे. मुंबईसारख्या शहरामुळे महाराष्ट्राची जागतिक ओळख निर्माण झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या केंद्राबरोबरच बॉलीवुडची क्रेझ यामुळे मुंबई जागतिक आर्थिक नकाशावर आहे. अशा प्रकराच्या अभ्यास दौऱ्यांमुळे दोन्ही देशातील कटुता नाहीशी होऊन सौहार्दाचे वातावरण निर्माण होण्यास मदतच मिळते, असे मुख्यमंत्र्यांनी आर्वजून सांगितले. यावेळी त्यांनी पाकिस्तान भेटीच्या आठवणीही सांगितल्या.

    मुख्यमंत्र्यांनी साधलेल्या संवादामुळे सोहळ्याला औपचारीकपणाची झालर न येता स्नेहमेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनीही सुसंवादाचा पुल भक्कम होण्याचे सांगत भारत-पाकिस्तान मधील पत्रकारांच्या मैत्रीचा दुवा साधण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न झालेत याची माहिती सांगितली. मिडीयातून पाकिस्तानच्या संस्कृतिविषयी लिखाण अधिक प्रमाणावर झाले पाहिजे, असे मतही श्री. केतकर यांनी यावेळी मांडले.

    पाकिस्तान पत्रकार शिष्टमंडळातील सदस्य ताहीर हसन खान म्हणाले की, दोन दिवसांपासून आम्ही मुंबईत आलो आहोत परंतू आम्हाला कुठेही असं जाणवलं नाही की आम्ही परक्या ठिकाणी आलो आहोत..अगदी घरी आल्यासारखंच वाटतयं..दोन्ही बाजुकडच्या पत्रकारांनी आधी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. भारत आणि पाकिस्तानमधील दरी कमी करण्यासाठी मिडीयाने पुढाकार घेऊन `दोस्ती का सफर आगे बढता रहे` अशी भावनाही ताहीर हसन यांनी व्यक्त केली. या दोन्ही देशांत बंधुता वाढीस लागावी अशी भूमिका असल्याचे सांगून या शिष्टमंडळातील सदस्य महेशकुमार यांनी कराचीमधील आपल्या आठवणी सांगितल्या. मुंबईच्या दौऱ्यावर चालला आहात तर बॉलिवुडच्या स्टार्सच्या ऑटोग्राफ जरुर आणा अशी मागणी माझ्या मुलांनी केल्यांचे महेशकुमार यांनी सांगताच हास्याची लकेर उमटली.

    शिष्टमंडळातील ज्येष्ठ सदस्य करामत अली यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंध दृढ होण्याकरीता माध्यमांनी आपल्या मानसिकतेत बदल घडवून आणला पाहिजे. चीन बरोबर देखील भारताचे युद्ध होऊनही आज भारताचे चीनबरोबर मैत्रीपूर्ण आणि व्यापारी संबंध निर्माण झाले आहेत, असे सांगितले. पाकिस्तान मिडीयातील नवी पिढी अधिक समजूतदारपणे पत्रकारीता करीत आहे आणि मुख्य म्हणजे भारताकडे पाहण्याचा त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन असल्याचे श्री. अली यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित संपादक व पत्रकारांनी या चर्चेत सहभाग घेत सौहार्दतेचा हा संवाद सेतू अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

    पाकिस्तान पत्रकारांच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. कराची येथून आणलेले `अजरक` हे महावस्त्र पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून दिले. चर्चा रंगत गेली..विचारांचे आदानप्रदान सुरू असतानाच सुत्रसंचालक श्रीमती बेलसरे यांनी दरवाजातून भोजनाचा खंमग सुवास दरवळत आहे..आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे सांगताच मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी हसून दाद देत सर्व जण भोजन कक्षाकडे वळले..

    अजय जाधव, सहायक संचालक, मुख्यालय, मुंबई

    Tuesday, May 22, 2012

    नांदी उपक्रमशील प्रशासनाची

    मनात आणलं तर एखादा सनदी अधिकारी आपल्या कल्पकतेतून सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची योजना लोकप्रिय व यशस्वी करु शकतो, याचा प्रत्यय नुकताच आला. निमित्त होते, महसूल व जमाबंदी आयुक्त आणि जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्यासाठी आयोजित दोन दिवशीय कार्यशाळेचे!

    बरोबर एक वर्षापूर्वी अशा स्वरुपाची कार्यशाळा येथेच घेण्यात आली. विद्यमान महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण योजनांचे एकत्रिकरण करुन सुवर्ण जयंती राजस्व अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांनी लातूर जिल्ह्यात पाणंद रस्ते व तलावातील गाळ काढण्याचा अभिनव उपक्रम राबविला होता. नांदेड जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी जिल्हा संगणकीकरण योजना व कॉपीमुक्त जिल्हा हा उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या सर्व योजनांची सांगड घालून राजस्व अभियान राबविण्यात आले. गेल्या वर्षभरात याचा आढावा नुकत्याच झालेल्या परिषदेत घेण्यात आला. 32 उपक्रमापैकी 24 शिफारशी स्वीकारुन त्या अंमलात आणल्या. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शी व गतीमान करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या जिल्ह्यात हाती घेण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजनांवर या परिषदेत चर्चा करण्यात आली. दोन दिवसात 16 सादरीकरण करण्यात आले.

    नांदेडच्या जिल्हधिकाऱ्यांनी संगणकीकृत सात-बाराचा प्रयोग कशा पध्दतीने यशस्वी केला, याचे सादरीकरण केले. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी अर्धन्यायीक कामकाजाचे संकेतस्थळ विकसित केले तर अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोतवाली बुकाचे स्कॅनींग करुन दस्तऐवज जतन करण्याची कल्पना मांडली. अकृषिक परवाना दहा दिवसात देता येईल, असे नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. ई-ट्रेन्डरींग, गौण खनिज वाहतूक परवाना, फेरफार, जन्ममृत्यू नोंद, सहजरित्या उपलब्ध करुन देता येईल. जमाबंदीच्या माध्यमातून गावातील जमिनीचे क्षेत्र व आकारणीचा ताळमेळ, ई-टपाल सेवा, आधार कार्डाचा वापर करुन विशेष सहाय योजनेचा लाभ मिळवून देणे, अशा नाविन्यपूर्ण योजनांचे सादरीकरण या कार्यशाळेत करण्यात आले. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन लोकांना चांगल्या सुविधा देऊ शकतो, हे स्पष्ट झाले.

    महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. या विभागाचा थेट सर्वसामान्य लोकांशी संबंध येतो. जलद, सहज व बिनचूक माहिती देणे, हे शासनाचे कर्तव्य आहे, अशी भूमिका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडली. ते स्वत: दोन दिवस उपस्थित होते. या कार्यशाळेच्या समारोपाला मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री आले. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. लोकांची कामे विनाविलंब होणे हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिषदांमधून विचारांची देवाण-घेवाण होते. पटपडताळणी सारखा अभिनव उपक्रम संपूर्ण राज्यात राबविला गेला. हजारो किलोमीटरचे पाणंद रस्ते मोकळे केले, एका छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठीची समाधान योजना यशस्वी झाली. ई-चावडी, शुन्य प्रलंबितता, चावडी वाचन, खंडकरी शेतकऱ्यांना जमीन वाटप, ई-पुनर्मोजणी आदी उपक्रमांवर चर्चा झाली. भविष्यात हातातील दप्तराच्या ऐजवी लॅपटॉ, स्क्रीनवरील टचबटनद्वारे आपल्या कागदपत्रांची माहिती, घरबसल्या मालमत्तेची खरेदी-विक्री, गावाचा, घराचा, शेतीचा नकाशा घरबसल्या इंटरनेटद्वारे प्रत्येकाला पाहायला मिळेल,असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. सनदी अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे मोजमाप आणि त्यांच्यातील कल्पकता या निमित्ताने जवळून पाहता आले, हे भाग्यच म्हणावं लागेल!

  • मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी, पुणे
  • देवचंद शिवणकर : काकडी पिकामुळे लखपती


    ‘इच्छा असली तेथे मार्ग निघतोच’. इतरांना दोष देऊन व स्वत:च्या कामावरुन पळपुटेपणा करणाऱ्यांना भाग्यही साथ देत नाही. याचा प्रत्यय मला आला आहे, असे मनोगत गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील चिखलीचे हरहुन्नरी युवक शेतकरी देवचंद गोविंदा शिवणकर यांनी व्यक्त केले. मेहनतीच्या जोरावर काकडीचे भरघोस पीक घेतल्याने शिवणकर आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाले आहेत.

    देवचंद शिवणकर हे आदिवासी कास्तकार. त्यांनी राष्ट्रीय कृषी फलोत्पादन अभियानांतर्गत आपल्या शेतात हजार चौरस फूटाचे ग्रीनशेड-नेट हाऊस बांधण्यासाठी कनेरी येथील आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थेकडे अडीच लाख रूपये कर्जाची मागणी केली. ह्या हजार चौरस फुटाचे ग्रीनशेड-नेट उभारण्यासाठी त्यांनी प्रथमत: तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधला. ह्या तालुका कृषी कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार व त्यांनी प्रकल्प बांधणी केलेल्या तांत्रिक मदतीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर काकडीचे उत्पादन घेण्याचे निर्धारित केले.

    वास्तविक काकडीच्या पिकाकरिता शासनाकडून कुठलेही अनुदान मिळत नाही. पण देवचंद ने प्रारंभी काकडीच घ्यायची ठरविली. त्यांना कृषी विभागाने ५० टक्के अनुदानावर शेतात शेड-नेट हाऊस उभे करुन दिले. मात्र अन्य मदत मिळू शकली नाही. देवचंद यांनी हार न मानता आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि विश्वासावर कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार आपल्या शेताच्या लहानशा तुकड्यात पंचेवीस डेसीमील जागेवर काकडीचे उत्पादन घेणे सुरू केले. बघता-बघता काकडीचे वेल बहरले. पाहता पाहता ह्या हजार चौरस फूट ग्रीनशेड-नेट मध्ये लावलेल्या काकडीच्या वेलाला सगळीकडे काकड्याच काकड्या दिसायला लागल्या. या छोट्याशाच जागेमध्ये सव्वा ते दीड लाख रुपयांचे काकडीचे उत्पादन देवचंद शिवणकर यांच्या हाती येणे अपेक्षित आहे.

    सध्या काकडीचा भाव १६ ते १८ रुपये प्रति किलो आहे. किरकोळ व्यापाऱ्यांच्या माध्यमातून माल न पाठवता त्यांनी ही काकडी थेट गोंदियाच्या बाजारात विक्रीला पाठविली. चार महिन्यापर्यंत काकडीचे नियमित उत्पादन हाती येईल. त्यामुळे सतत पैशाची आवक हाती येत राहणार आहे. ह्या ग्रीनशेड-नेट मुळे काकडी तजेलदार व ताजी राहत आहे. काकडीच्या पिकानंतर श्री.शिवणकर यांनी आता सिमला मिरचीचे पीक घेण्याची तयारी सुरू केली आहे.

    काकडीच्या उत्पादनामुळे त्यांचा उत्साह वाढला असून पारंपरिक धान उत्पादनासोबतच काकडी, सिमला मिरची, टरबूज, केळी, ऊस आदी नगदी उत्पन्न देणारी पिकेही आता क्रमाक्रमाने घेण्याचे देवचंद शिवणकर यांनी ठरविले आहे.

    Sunday, May 20, 2012

    धडक सिंचन विहिरीने साधली स्वप्नपूर्ती

    महाराष्ट्र शासनाची धडक जलपूर्ती सिंचन विहीर योजना ही महत्वाकांक्षी योजना विदर्भातील अनेक शेतकऱ्यांना फायद्याची ठरत आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील अजनी येथील अशोक शेषराव लोखंडे या युवा शेतकऱ्याने तर या योजनेच्या विहिरीचे खोदकाम सुरू असतानाच उपशाच्या पाण्यावर कांदा व इतर भाजीपाला घेऊन आर्थिक सुबत्तेच्या दिशेने पाऊल टाकले आहे. ही विहीर त्याच्यासाठी जीवनदायीनी ठरू लागली आहे.

    विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने धडक जलपूर्ती सिंचन विहीर योजना हाती घेतली. या योजनेतून शेतकऱ्यांनी समृद्धीचा मार्ग शोधला. जिद्द, परिश्रम, काळ्या आईवरचे प्रेम, समर्पणाची भावना व आभाळाएवढी निडर छाती असली व त्याला कल्पकतेची जोड दिली तर काळी आई तिच्या लेकरांना उपाशी राहू देत नाही. शेतकऱ्यांना समृद्धीची वाट गवसावी या उदात्त दृष्टीकोनातून जन्मलेली धडक जलपूर्ती सिंचन विहीर योजना ही शेतकऱ्यांसाठी स्वप्नपूर्तीची योजना सिद्ध होत आहे. हे अजनी येथील अशोक लोखंडे या जिद्दी शेतकऱ्याने स्वत:च्या परिश्रम व कल्पनेतून दाखवून दिले.

    अशोककडे सिलिंगमध्ये प्राप्त झालेली चार एकर शेतजमीन आहे. त्याचे वडील शेषराव ही जमीन कसायचे. अशातच अशोक दोन वर्षाचा असताना वडील मरण पावले. अठरा विश्वे दारिद्र्याचा वारसा अशोक, त्याची आई व बहिणीच्या वाट्यास आला. वयाच्या विसाव्या वर्षापासून अशोकही आईसोबत शेतात राबू लागला. जोडव्यवसाय म्हणून त्याने शेळ्या घेतल्या. अशातच त्याला जलपूर्ती सिंचन विहीर मंजूर झाली. स्वप्नपूर्तीसाठीची एक गोड बातमी त्याच्या कानावर पडल्यामुळे नव्या जोमाने उभे राहण्याचा त्याने ठाम निर्णय घेतला. विहीरीचे खोदकाम सुरू झाले अन् सोळा फुटावर पाणी लागले. बाजूलाच नाला असल्यामुळे पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात वाढू लागले. पाणी भरपूर असल्यामुळे वाया जाणाऱ्या पाण्याचे त्याने नियोजन केले व त्यातच त्याने उन्हाळ्यात कांद्याचे पीक घेतले. पाऊण एकरात ६० क्विंटल कांदा झाला. डिझेल इंजिन स्वत: विकत घेऊन शेतजमीन ओलिताखाली आणली. मग त्याने तिथेच वांगे व इतर भाजीपाला पिकविला. एका खाजगी टँकरलाही त्याने विहिरीतून पाणीपुरवठा केला. यामुळे त्याला विहीर बांधायच्या पूर्वीच आर्थिक स्थैर्याची चाहूल लागली.

    सततच्या नापिकीने कंटाळलेल्या अशोकला या सिंचन विहिरीमुळे नवी उभारी मिळाली. त्यामुळे त्याने एक एकरात मान्सूनपूर्व कपाशी लावली. रस्त्यावरील त्याच्या शेतातील डोलणारे कपाशीचे पीक साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. उत्साह वाढल्यामुळे रब्बी व उन्हाळी पिकांकरिता दिवसरात्र राबण्यासाठी अशोक व त्यांचे कुटूंब सज्ज झाले आहे. त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली आहे.

  • अनिल आलुरकर, जिल्हा माहिती अधिकारी, यवतमाळ
  • Friday, May 18, 2012

    माणसुकीचा 'झरा'

    ढेंगणमाळ… ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक आदिवासी पाडा… नावाप्रमाणेच अगदी उजाड माळरान… निर्जन… रात्री तर अगदी भकास जाणवणारं. असं हे पाडं. मात्र या पाड्याला मंगळवारी रात्री अगदी गर्दीचं स्वरूप आलं होतं. निमित्त होतं पाणीपुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या पाणीटंचाईग्रस्त भागांच्या भेटीचं.

    गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील जनतेला दुष्काळग्रस्त स्थितीला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे या भेटीचं आणि तेही चक्क रात्रीच्या भेटीच्या स्थानिक ग्रामस्थांबरोबर प्रसारमाध्यमांनाही नवल होतं. म्हणूनच दि. १५ मेच्या रात्री शहापूर तालुक्यातील ढेंगण माळ, वाशाळा, पाटोळ, सुसरवाडी या पाड्यांवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनीही गर्दी केली होती. निरभ्र आकाश आणि टिपूर चांदणं यांच्या साथीनं आदिवासी पाड्यांवरचा गर्द अंधारही तेजाळला होता.

    मंत्री महोदय स्वतः आपल्या व्यथा ऐकायला आले आहेत म्हटल्यावर मात्र आदिवासी बांधवांचा बांध फुटला. मग काय तक्रारींचा पाढा आणि समस्या… गाऱ्हाणी… एका पाठोपाठ एक सुरू… पाटोळ, वाशाळा, सुसरवाडी आणि शेवटी ढेंगणमाळ… गाड्यांचा ताफा वेगाने जात होता. मधेच गाडी थांबत होती. गावकऱ्यांची विचारपूस होत होती. शेवटी ढेंगणमाळावर या गाड्या स्थिरावल्या आणि आदिवासी बांधवांच्या शब्दांनी वेग घेतला.

    पाणी पुरवठ्यातील अनियमितता, पाणी पुरवठा योजनांमधील भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांकडून मिळणारी वागणूक, टँकर फेऱ्यांची वानवा, कोरड्या पडलेल्या विहिरी… मनात साचलेल्या किती किती भावना आज ओठावर येत होत्या. पण, त्यांनी काही सांगण्या आधीच मंत्रीमहोदयांनी या आदिवासी बांधवांची मनं आणि चेहरे वाचले होते. म्हणूनच तुम्ही माझे मालक, मी तुमचा सालगडी आहे, याची जाणीव त्यांनी आदिवासी बांधवांना करून दिली. कुणी कितीही नाराजी व्यक्त केली तरी वडीलकीच्या नात्याने ती पाठीशी घालत, त्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा मार्ग मंत्रीमहोदयांनी अवलंबला. यावेळी ते कुठलेही मंत्री नव्हते, तर त्यांची भूमिका होती या आदिवासींच्याच एक भावाची.

    आदिवासी पाड्यांवरच्या त्यांच्या अंगणात, ओसरीवर आणि प्रसंगी कुठलीही भीडभाड न ठेवता, राजकीय शिष्टाचारांचा आव न आणता चक्क रस्त्यावर बसून या प्रश्नाबाबत गंभीर आहोत, हे स्पष्ट केले. पण, या भेटीत मंत्रीमहोदयांनी आदिवासी बांधवांशी नव्यानं नातं जोडण्याचा केलेला हा प्रयत्न तितकाच महत्तवाचा वाटतो. आदिवासींच्या व्यथा त्यांनी तितक्याच आपुलकीने ऐकल्या, पाहिल्या आणि समजून घेतल्या. रात्री ८ पासून सुरू झालेला हा प्रवास मध्यरात्रीपर्यंत चालला. हे चार तास आदिवासी ताई बहिणींच्या पदरात निश्चितच समाधान टाकणारे होते. या दौऱ्यात मंत्रीमहोदयांचा आदिवासींबाबतचा प्रकर्षाने जाणवलेला लळा-जिव्हाळा परतताना आदिवासींच्या चेहऱ्यावरील समाधानातून दिसत होता. निसर्गाचा झरा आटला असला तरी माणसुकीचा झरा सतत खळखळतोय, हेच यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

    संप्रदा बीडकर, माहिती अधिकारी, उपमाहिती कार्यालय, डहाणु

    Thursday, May 17, 2012

    मुकाबला टंचाईशी

    राज्यातील टंचाई परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. टंचाईग्रस्त १५ तालुक्यांना प्रत्येकी १० कोटी रुपये देण्याबरोबरच, टँकर्सव्दारे पाणीपुरवठा, चारा डेपो, याबाबत ठोस निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

    राज्यातील जलाशयातील पाणी साठी सध्या १९ टक्के एवढाच शिल्लक आहे. यावरुन टंचाईची तीव्रता लक्षात येईल, गेल्या वर्षी हाच साठा ३२ टक्के एवढा होता. मराठवाडा विभागात सर्वात कमी म्हणजे केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील इतर विभागांचा विचार केला तर कोकणात ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागात २५ टक्के, अमरावती १८ टक्के, नाशिक १४ टक्के, पुणे १५ टक्के इतका तर धरणांमध्ये ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

    १५ तालुक्यांना प्रत्येकी १० कोटी

    राज्यातील संगमनेर, जत, पलुस, खटाव, माण, मंगळवेढा, पारनेर, भूम, पुरंदर, आटपाडी, कवठे महांकाळ, खानापूर, मिरज, तासगाव सांगोले या तालुक्यातील टंचाईचा सामना करण्यासाठी प्रत्येकी १० कोटी रुपये देण्याच शासनाने जाहीर केले आहेत.

    राज्यातील सुमारे ११० तालुके टंचाईग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. टंचाईग्रस्त १५ जिल्ह्यातील १ हजार ११२ गावे आणि ५ हजार १८४ वाड्या यांना १ हजार ३५५ टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यात १ हजार ६४५ गावे आणि ५ हजार ५९३ वाड्यांना १ हजार ८७७ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत होता.

    या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने तातडीच्या पाणीपुरवठा योजना व खंडीत वीजेमुळे बंद असलेल्या पाणी पुरवठा योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ३३ पाणीपुरवठा योजना व ५१ विशेष दुरुस्ती योजना युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आल्या. यामुळे ५०९ गावांना पाणीपुरवठा सुरळीत सुरु आहे.

    राज्यातील १५ दुष्काळग्रस्त तालुके जिथे २ मीटरपेक्षा जास्त पाणीपातळीत घट झाली आहे त्या तालुक्यात सिमेंट नाला बंडीग व छोटे बंधारे घेण्यात आले.

    टंचाईग्रस्त गावांमध्ये १५७ चारा डेपो उघडण्यात आले आहेत.

    सांगली जिल्ह्यात ५६, सातारा जिल्ह्यात ३०, सोलापूर जिल्ह्यात ३८, अहमदनगर जिल्ह्यात ३३ अशा ४ जिल्ह्यात चारा डेपोव्दारे ६४ हजार ८९१ मेट्रीक टन चारा उचलण्यात आला आहे, या चाऱ्यासाठी शासनाने १२ कोटी ३१ लाख ६४ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.

    दररोज १ हजार मेट्रीक टन चारा आता पुरविण्यात येत आहे.

    पिण्याचे पाणी टँकरव्दारे सुलभ रितीने व्हावा यासाठी १० टक्के अतिरिक्त टँकर राखून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. टँकरव्दारे पाणी भरण्यासाठी लागणाऱ्या डिझेलवरील खर्चाची मर्यादा ३०० रुपये करण्यात आली आहे. टंचाईचा युद्धपातळीवर काम करीत आहे. हे या निर्णयावरुन लक्षात येईल.

    साधली पिण्याची पाण्याची स्वंयपूर्णता

    प्रत्येकाला शुध्द पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी शासनाच्या वतीने प्रत्येक खेडयापाडयात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत निर्माण केले जातात. गडचिरोली जिल्हयात अतिदुर्गम भागात पिण्याच्या पाण्यासाठी कूपनलिका , विहीर, आणि लघु नळ पाणी पुरवठा योजना व्दारे पाणी पुरविले जाते आहे.

    ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून विविध योजनेतून पाण्याची उपलब्धता करुन देण्यास प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. गडचिरोली तालुक्यातील येवली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रामपूर गावात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सौर उर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केल्यामुळे हे गाव पाण्यासाठी स्वंयपूर्ण झाले आहे.

    सौर उर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ पाणी पुरवठा योजनेमूळे कायमचा पाण्याचा प्रश्न मिटला असून पाण्यासाठीची भटकंतीही बंद झाली आहे. या गावात एकूण ४०२ एवढी लोकसंख्या असून एकूण ८० घरे आहेत. पूर्वी या गावात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना खूप पायपीट करावी लागे. परंतु या नाविन्यपूर्ण योजनेमूळे गाव पिण्याच्या पाण्यासाठी आता परिपूर्ण झाले आहे. घरोघरी नळाव्दारे पिण्याचे पाणी मिळत असल्यामुळे महिला आनंदात आहेत..

    ही योजना सुरु केल्यामुळे नळाचे पाणी सौर उर्जेव्दारे उपसा करुन ते टाकीत जमा करण्यात येते. आणि टाकीतील पाणी नळाव्दारे प्रत्येकाच्या घरी पुरविले जाते. ही योजना सौर उर्जेवर आधारित असल्यामुळे ग्रामपंचायतीला विद्युत बिल भरण्याची गरज भासत नाही. तसेच विद्युत विना ही योजना बंद होईल ही भीती देखिल राहीलेली नाही या पंपाव्दारे हाताने हँडलचा वापर करुन देखील पाणी काढण्याची सुविधा आहे. ही लघु नळ पाणी पुरवठा योजना निरंतर चालणारी असल्याने ग्रामीण भागातील जनतेसाठी लाभदायी ठरली आहे.

  • रामचंद्र गोटा, जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली
  • Tuesday, May 15, 2012

    रोजंदार कामगार झाला नर्सरी मालक


    कष्ट आणि जिद्द यातून यश मिळवता येते. पुसदजवळच्या वरुड येथील माधव पडघणे या रोजंदारी कामगाराने नर्सरीचे स्वप्न बघितले आणि प्रयत्नातून पूर्णही केले. रोजंदारी कामगार आज निसर्ग नर्सरीचा मालक झाला आहे.

    माधव पडघणे पाच वर्षांपूर्वी वरुडच्या नर्सरीत रोपट्यांना पाणी देण्याचे काम करीत होते. रोपट्यांवर प्रेम करता करता आपल्या अवलोकनातून ते रोपट्यावर डोळे बांधून कलमं तयार करण्याचे तंत्र शिकले. एवढ्यावरच न थांबता नर्सरी तयार करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. त्यादृष्टीने थोडीफार बचत करीत व मक्त्याने शेती करून त्यांनी पैसा जमविला आणि दीड एकर शेती विकत घेतली. या शेतीत फुलशेती फुलवून माधव यांनी आधी आर्थिक बाजू भक्कम केली. गुलाब, निशीगंध, ग्लॅरेडिया, वॉटर लिली, झेंडू आदी फुलांची लागवड करून ती शहरातील बाजारपेठेत पुरविली. यातून त्यांनी नर्सरीसाठी नागपूर रोडवर जागा विकत घेतली. आज याच ठिकाणी पडघणे यांची निसर्ग नर्सरी बहरली आहे.

    पंतप्रधान पॅकेजमधून मदत मिळवून उभारलेल्या या नर्सरीचे उद्घाटन उपविभागीय कृषी अधिकारी विजय लोखंडे व तालुका कृषी अधिकारी राजकुमार रणवीर यांच्या उपस्थितीत झाले. नर्सरीत निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी आवश्यक असलेली दुर्मिळ वनस्पतींची रोपे माधव पडघणे यांनी आवर्जून तयार केली. यात वड, पिंपळ, आवळा, सिताफळ, सिसम यांचा समावेश आहे. याशिवाय, जादा प्रमाणात ऑक्सिजन देणारी तुळशीची हजार रोपे त्यांनी निसर्गप्रेमींना अत्यल्प दरात पुरविली आहेत. दुर्मिळ वनस्पती उपलब्ध करून देण्याचा माधव पडघणे यांचा संकल्प आहे.

    पडघणे यांना रोपट्यांचे डोळे बांधून कलम तयार करण्याचे कौशल्य अवगत आहेच. त्यामुळे त्यांनी लखनौ पेरूची लागवड केली असून, त्यापासून असंख्य कलमा तयार केल्या आहेत. हा पेरू अवघ्या सहा महिन्यात फळांनी लगडतो. या पेरूला बाजारात विशेष मागणी आहे. नर्सरीसोबतच फुलशेती करून माधव आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित आहेत. फुलांच्या विक्रीतून माधव यांना जवळपास चारशे रूपये दररोज मिळकत प्राप्त होते. नर्सरीतून गेल्या वर्षी त्यांना सुमारे दीड ते दोन लाखांचे उत्पन्न मिळाले.

    पडघणे यांचे सर्व कुटुंब शेतीत व नर्सरीत राबत असून ही नर्सरी आदर्श बनविण्याचे त्यांचे स्वप्न आहे. पडघने यांनी केलेला हा प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या नर्सरीत येत असून, त्यांच्या श्रमाची फलनिष्पत्ती पाहून अचंबित होतात. आगामी काळात नर्सरीत विविध जातींच्या फुलांचा समावेश करण्याचा पडघणे यांचा मानस आहे.

  • अनिल आलुरकर, जिल्हा माहिती अधिकारी, यवतमाळ
  • जळगावात शेततळे योजनेतून ४० हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाची सुविधा

    राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सन २००८-२००९ मध्ये संपूर्ण राज्यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेततळे निर्मिती योजना सुरु केली आणि राज्यातील ८५ टक्के कोरडवाहू क्षेत्रासाठी ती एक वरदान ठरली आहे. राज्यातील अनेक जिल्हयांमध्ये शेततळे निर्मिती योजनेची यशस्वी अंमलबजावणी सुरु असून हजारो हेक्टर कोरडवाहू जमीन सिंचनाखाली आलेली आहे. त्याप्रमाणेच मागील तीन वर्षापासून जळगाव जिल्हा कृषी विभागामार्फत २ हजार ६०४ शेततळी शेतक-यांच्या शेतात निर्माण करुन ४० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात कृषी विभागाला यश मिळाले असून सदरच्या योजनेची जिल्हयात यशस्वीपणे अंमलबजावणी होत असल्याचे ते दयोतकच आहे.

    जळगाव जिल्हयात कृषी विभागाकडून सन २००८-२००९ मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना व सन २००९-२०१० मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत शेततळयांची निर्मिती योजना राबविली जात आहे. या अंतर्गत जिल्हयात सुमारे २ हजार ६०४ शेततळयांची निर्मिती झाली असून आणखी ४ हजार शेततळी निर्माण केली जाणार आहेत. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतक-यांना १०० टक्के अनुदान शासनाकडून दिले जात असून शेततळयातील प्लॅस्टीकच्या आच्छादनासाठी ही ७५ टक्के अनुदान देण्यात येते. त्यामुळे दोन वर्षाच्या कालावधीत जिल्हयातील शेतक-यांनी सदरच्या योजनेला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शेतक-यांच्या उत्पादनात चांगली वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तसेच जिल्हयात निर्माण झालेल्या शेततळयाकरिता १२ कोटी रुपयांचे अनुदान कृषी विभागाकडून लाभार्थी शेतक-यांना वाटप करण्यात आले असून सन २०१२-१३ मध्ये शेततळयाकरिता १६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

    जळगाव जिल्हयाचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६६३.०१ मिलीमीटर एवढे असून जिल्हयात पावसाचे असमान वितरण आहे. जिल्हयाच्या रावेर यावल व चोपडा तालुक्यात अधिक पर्जन्‍यमान होते तर अंमळनेर, जामनेर, एरंडोल, पारोळा व बोदवड या पाच तालुक्यात पाऊस कमी प्रमाणात पडतो. त्यामुळे या भागास सिंचनाच्या कमी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच जिल्हयातील सुमारे ८३ टक्के क्षेत्र कोरडवाहू असून फक्त १७ टक्के क्षेत्र हे सिंचनाखाली आहे.

    म्हणजेच जिल्हयातील ८३ टक्के शेत जमिनीला पावसाच्या पाण्या व्यतिरिक्त सिंचनाची दुसरी सोय उपलब्ध नाही. त्यामुळे या भागातील शेतीतून कमी उत्पादन मिळते. तसेच जमिनीची उत्पादकताही कमी असल्याने शेतक-यांचे एकूण उत्पन्न ही कमीच असल्याने येथील शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेला होता. परंतु सन २००८-०९ मध्ये शासनाने सुरु केलेल्या शेततळी योजनेत या जिल्हयातील शेतक-यांनी मोठया प्रमाणावर सहभाग घेऊन आपली जमीन सिंचनाखाली आणलेली आहे. त्यामुळे त्यांच्या शेतीत एकापेक्षा अधिक पिके घेत येत असल्याने त्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे अशा शेतक-यांची आर्थिक परिस्थितीही सुधारली असून येथील शेतकरी आत्महत्येसारख्या समस्येपासून कोसो पावले दूर आहे.

    शेततळी उद्दिष्टय:

    राज्य शासनाने राज्यात तीन लाखापेक्षा अधिक शेततळी निर्माण करण्याची योजना आखली असून जळगाव जिल्हयात राष्ट्रीय कृषी विकास योजना व महाराष्ट्र ग्रामीण हमी रोजगार योजनेंतर्गत सन २०१२-१३ मध्ये चार हजार शेततळी निर्माण केली जाणार असून त्याकरिता १६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच जिल्हयाला सन २००९-१० मध्ये ९०० शेततळयांचे उद्दिष्टय देण्यात आलेले होते. परंतु शेतक-यांच्या प्रचंड प्रतिसादामुळे जिल्हयात प्रत्यक्ष ९२० शेततळी निर्माण करण्यात आली. त्यामुळे शेततळी निर्मितीच्या उद्दिष्टयपूर्तीकरिता उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्हा प्रथम आला आहे.

    ४० हजार हेक्टर क्षेत्रास सिंचन-

    जिल्हयात २ हजार ६०४ शेततळी निर्माण झाली असून प्रति शेततळी १० हजार लीटर पाणी साठवण क्षमतेचे अनुमान केल्यास २६०४ शेततळयांच्या माध्यमातून ४० हजार हेक्टर कोरडवाहू जमीन सिंचनाखाली आलेली आहे. जिल्हयाच्या प्रत्येक तालुक्याच्या कार्यक्षेत्रात मोठया प्रमाणावर शेततळयांची निर्मिती झालेली असल्याने जिल्हयात एक प्रकारे शेततळयांचे जाळेच निर्माण झालेले आहे.

    या शेततळयातील पाण्याचा सिंचनासाठी वापर केल्याने खरीप पेरणीचे ३० हजार हेक्टर क्षेत्र व रब्बी हंगामाचे १० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले असून कापूस, गहू, हरभरा, बाजरी, ज्वारी आदि पिकांना त्या पाण्याचा लाभ झाल्याने सदरच्या पिकाच्या एकूण उत्पादनात ही वाढ झाली आहे.


  • रजेसिंग वसावे, जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव
  • कुक्‍कटपालनाला नवसंजीवनी

    भारतातील जवळपास ६० टक्‍के नागरिकांचा उदरनिर्वाह शेती व्‍यवसायावर आहे. त्‍यातच ही शेती प्रामुख्‍याने निसर्गावर अवलंबून असल्‍याने बळीराजाला जोडधंद्याशिवाय पर्याय नाही.त्‍यामुळे केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतक-याने शेतीपूरक व्‍यवसायांकडे लक्ष द्यावे, यासाठी शासनाने विविध विभागाच्‍या माध्‍यमातून योजना राबविल्‍या आहेत. विशेष म्‍हणजे या जोडधंद्याकडे तरुण शेतकरी वळत आहे.

    परभणी जिल्‍ह्यातील जमीन सुपिक आहे. तसेच इतर जिल्‍ह्यांच्‍या तुलनेत परभणीत मुबलक प्रमाणात पाणी उपलब्‍ध आहे. शेतकरीही शेतात दिवसरात्र काबाडकष्‍ट करीत आहे. मात्र निसर्ग साथ देत नसल्‍याने पाहिजे त्‍या प्रमाणात शेतक-याला शेतीतून उपन्‍न मिळेनासे झाले आहे. त्‍यामुळे शेतक-यांचा आर्थिक स्‍तर सुधारण्‍यासाठी शासन जोड धंद्यासाठी विविध योजना राबवित आहे. परभणी जिल्‍ह्यातील होतकरु तरुण शेतकरी शेतीला जोडधंदा म्‍हणून कुक्कटपालन व्‍यवसायाकडे वळू लागला आहे. सुरुवातीला शेतक-यांना कोंबडीची पिल्‍ले दुस-या जिल्‍ह्यातून आणावी लागत असल्‍याने वेळेवर कोंबड्याची पिल्‍ले मिळत नव्‍हती. यामुळे जिल्‍ह्यातील कुक्‍कुटपालन व्‍यवसाय डबघाईला आला होता. जिल्‍हा परिषद पशुसंवर्धन विभागाने याची दखल घेऊन शासनाकडून १३ लक्ष रुपयांत जिल्‍ह्यासाठी अंडे उबविण्‍याची नऊ यंत्रे उपलब्‍ध करुन घेतली. या नऊ यंत्राद्वारे २१ दिवसांत तब्‍बल तीन हजार ६०० पिल्‍ले तयार होणार आहेत. त्‍यामुळे या वर्षापासून जिल्‍ह्यात कोंबडीच्‍या पिल्‍ल्‍यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असल्‍याने जिल्‍हा कोंबडी उत्‍पादनात स्‍वंयपूर्ण होणार आहे.

    विशेष म्‍हणजे शेतक-यांना ही पिले अल्‍पदरात मिळणार आहेत. जिल्‍ह्याला उपलब्‍ध झालेली ही यंत्रे लवकरच नऊ तालुक्‍यातील पशुसंवर्धन विभागात उपलब्‍ध होणार आहेत. त्‍यामुळे संपूर्ण जिल्‍ह्यात आता कुक्‍कुटपालनाचा जोडधंदा तेजीत पहावयास मिळणार आहे. जगाचा पोशिंदा असलेल्‍या शेतक-याचे जीवनमान उंचाविण्‍यासाठी शासनाने शेती संलग्‍न व्‍यवसायांकडे लक्ष केंद्रित केले आहे. केवळ आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहण्‍यापेक्षा जोडधंद्याच्‍या माध्‍यमातून शेतक-यांनी आपली प्रगती करावी, यासाठी शासन प्रयत्‍नशील आहे. त्‍यामुळेच परभणी जिल्‍हा परिषद पशुसंवर्धन विभागाने जिल्‍ह्यात कुक्‍कुटपालनाला तसेच शेतक-यांना दिलेला दिलासा वाखाणण्‍याजोगा आहे.

  • राजेश येसनकर, माहिती सहायक, जिल्हा माहिती कार्यालय, परभणी
  • Monday, May 14, 2012

    बटाट्याचे एकरी १३० क्विंटल उत्पादन


    वाशिम जिल्ह्यातील शेजूबाजार पासून जवळच असलेल्या तपोवन गावातील शेतकरी बंडूजी किसन येवले यांनी आपल्या शेतामध्ये बटाट्याचे एकरी १३० क्विंटल उत्पादन घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

    या पिकास मुंबई-पुण्यामध्ये बटाटा असे नाव आहे. मात्र विदर्भात आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये हे पीक आलू याच नावाने लोकप्रिय आहे.

    श्री. येवले यांच्याकडे एकूण १५ एकर शेती असून त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन सर्व शेती सिंचनाखाली आणली आहे. विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी असल्याने त्यांनी आपल्या शेतामध्ये कांदा, हरभरा, लसूण आदी पिके घेतली आहेत. बटाटा पिकाचे उत्पादन चांगले मिळू शकते याविषयी त्यांनी बरेच ऐकले होते. त्याविषयी त्यांच्या मनात उत्सुकता होती. यासाठी त्यांनी बटाटा या पिकाविषयी सर्व माहिती गोळा केली. आपल्या शेतात हे पीक घेणे शक्य आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी बटाट्याचे उत्पादन घेण्याचे ठरविले.

    तपोवन परिसरात बटाट्याचे पीक नवीन असल्याने हे पीक घेणे सोयीस्कर ठरणार नाही असे अनेकांनी त्यांना सांगितले. परंतु ते आपल्या निर्णयावर ठाम होते. सुरूवातीस जमिनीचे माती परीक्षण करून शेत तयार केले. लागवडीपूर्वी जमिनीत सुपर फॉस्फेट व थिमेट पाच किलो प्रमाणे पसरवले. त्यानंतर सात क्विंटल बियाणे खरेदी करुन नोव्हेंबर २०११ च्या पहिल्या आठवड्यात त्याची लागण केली.

    पिकाला स्प्रिंक्लर व सरी काढून गरजेनुसार पाणी दिले. पीक मोठे झाल्यावर मालधरणीसाठी वरदान आणि कॅल्शियम यांची प्रती एक पोते या प्रमाणात खताची मात्रा दिली. त्याचबरोबर पिकावर बुरशीनाशक औषधांचे फवारे मारले. चांगले उत्पादन व्हावे म्हणून त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यामुळेच त्यांना एका एकरामध्ये १३० क्विंटलचे उत्पादन झाले.

    बियाणे खरेदी, लागवड खर्च, शेत तयार करण्याचा खर्च, खत, औषध फवारणी तसेच काढणीपर्यंत एकूण १२ हजार रुपये खर्च झाला. इतर पिकांच्या तुलनेत बटाटा हे पीक कमी खर्चाचे व कमी मेहनतीचे पीक असल्याचे येवले यांना प्रत्ययास आले. खर्च वजा जाता त्यांना जवळपास ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

    येवले यांचा बटाटा पिकाचा यशस्वी प्रयोग पाहून परिसरातील इतर शेतकरीही आता बटाटा लागवडीकडे वळले आहेत.

    अंगणवाडी केंद्रातील बालके झाली कुपोषण मुक्त

    संपूर्ण भारतातील कुपोषणाचे प्रमाण भयावह आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एका संस्थेमार्फत देशातील कुपोषणग्रस्त बालके असलेल्या जिल्ह्यांच्या केलेल्या पाहणीमध्ये महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यातील स्थिती गंभीर दर्शविण्यात आली होती. यामुळे पंतप्रधानांनी चिंता व्यक्त करीत देशातील १०० जिल्ह्यांमध्ये विशेष सकस आहार योजना राबविण्याचे ठरविले. यामुळे अकोला जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रातील बालकांना कुपोषणापासून मुक्ती मिळाली असून त्याचा बालकांमध्ये सकारात्मक प्रभाव दिसून येत आहे.

    कुपोषणाचे मुख्य कारण कुपोषित माता हे आहे. यामुळे कुपोषित माता व स्तनदा माता यांना सकस आहार पुरविण्यावर शासनाने विशेष लक्ष पुरविले. त्यामुळे राज्यातील अंगणवाडी केंद्राला सकस आहारासोबत आयुर्वेदिक बिस्किटे पुरविण्यात आली. या बिस्किटांच्या खरेदीसाठी जिल्हा परिषदेच्या शेष फंडाचा वापर करण्यात आला.

    यानुसार अकोला जिल्हापरिषदेच्या महिला व बालविकास विभागाने जिल्ह्यातील १३७३ अंगणवाड्यांना ही बिस्किटे पुरविली. त्यातील २०९ गावच्या ३३३ अंगणवाडी केंद्रातील बालके कुपोषण मुक्त झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास कार्यालयाने दिली आहे. यामध्ये अकोला ग्रामीण एक मधील २६ गावांतील ३८ अंगणवाडी केंद्र, अकोला ग्रामीण दोन मधील १२ गावातील ५३, बार्शीटाकळी मधील ३० गावच्या ४२, अकोट मधील ३९ गावातील ४३, तेल्हारा तालुक्यातील १४ गावातील १८, बाळापूर मधील २४ गावातील ४७, पातूर मधील १२ गावातील २८ तर, मुर्तीजापूर तालुक्यातील ५२ गावातील ६६ केंद्रातील सहा महिन्यापर्यंतची बालके कुपोषणमुक्त झाली आहेत.

    जिल्ह्यातील बालकांमधील कुपोषण पळवून लावण्यासाठी आदिवासी भागातील कुपोषणग्रस्त गावात एकात्मिक बालविकास कार्यालयासह बालमृत्यूचे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्र्यांवर सोपविण्यात आली होती. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील कुपोषित माता, स्तनदा माता व ० ते ६ महिने वयोगटातील बालकांसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास समितीने शेष फंडातून नोव्हेंबर २०११ च्या सभेत कुपोषण मुक्तीसाठी २९ लाख रुपयांचे नियोजन केले. त्यातच शासनाने गोवर्धन आयुफार्म प्रा.लि. कंपनीची आयुर्वेदिक बिस्किटे जिल्ह्यातील १३७३ अंगणवाडी केंद्रांना पुरविली. त्याचा आधार होऊन २०९ गावातील ३३३ अंगणवाडी केंद्रातील बालकांना कुपोषणापासून मुक्ती मिळाली असून हे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याची आणि जिल्ह्यात बालकांमध्ये कुपोषणमुक्तीचा सकारात्मक प्रभाव दिसत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

    पर्याय सौर उर्जेचा

    आज सर्वत्र विदयुत भारनियमनचा त्रास जाणवत आहे. यावर उपाय म्हणजे सौर उर्जेचा वापर करणे होय. सौर उर्जेचा वापर करुन गावात पथदीप चालविले जातात. सौर उर्जेचा वापर पंप चालविणेसाठी करता येतो. परंतु ज्या गावात विदयुत पुरवठा नाही अशा गावात सौर उर्जा पंपाचा वापर करुन नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करता येते.

    पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांची मर्यादित साधनसंपत्ती विचारात घेता, भविष्यात पारंपारिक उर्जा स्त्रोताची क्षमता निश्चित अपुरी पडणार आहे. याचा विचार करुन अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापरावर भर देणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करुनच शासनाने विंधन विहिरीवर वीज उर्जेऐवजी सौर ऊर्जा संयत्र बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

    विंधन विहिरीवर आधारित पाणी पुरवठा योजना विकसित करण्यासाठी विद्युत पंप व विजेची आवश्यकता असते परंतु ज्या गावात, वाडीत वस्तीत वीज पुरवठा उपलब्ध होऊ शकत नाही अशा ठिकाणी पाणी पुरवठयासाठी योजना कार्यान्वित करता येत नाही. परंतु त्या ठिकाणी सौर उर्जा पंप बसविल्यास जनतेला नळ पाणी पुरवठा योजनांचा लाभ देणे शक्य होते. म्हणून राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम अंतर्गत सौर उर्जा पंपाचा वापर करुन विंधन विहिरीवर आधारित लघु नळ पाणी पुरवठा योजना ऑगस्ट २०१० पासून राज्य शासनाने सुरु केली आहे.

    या योजनेनुसार मालेगाव तालुक्यातील दरेगाव येथील कोकणदरा या शंभर टक्के आदिवासी वस्तीत सौर ऊर्जा दुहेरी पंपावर आधारीत लघु नळ पाणी पुरवठा योजना नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कार्यान्वित केली आहे. कोकणदरा या वस्तीची लोकसंख्या १७५ आहे. जिल्हा परिषदेमार्फत मिळालेला सौर पथदीप हाच येथील लोकांचा विजेचा सहारा आहे. लोकांना पाण्यासाठी हातपंपावर अवलंबून रहावे लागते. . हातपंपावर व्दारे पाणी घेण्यासाठी महिला व मुलांना फार शारिरीक त्रास होतो. यासाठी जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर मोरे यांनी सौर ऊर्जा पंपाचा वापर करुन लघु नळ पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेतील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून दरेगाव ग्रामपंचायतीस ही योजना मंजूर करुन कार्यान्वित केली.

    या योजनेसाठी ५.१० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार सौर ऊर्जा पंपाच्या सहाय्याने विंधन विहिरीतील पाणी ५ हजार लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत साठविले जाते. या टाकीत जमा झालेले पाणी येथील वस्‍तीत स्टॅन्ड पोस्टच्या सहाय्याने लोकांना वितरित केले जात आहे. सूर्यप्रकाश किंवा अन्य कारणाने सौरपंप सुरु न झाल्यास विंधन विहिरीवरच हातपंपारव्दारे पाणी मिळू शकते. म्हणून यास सौरऊर्जा दुहेरी पंप असे म्हणतात.

    सौर ऊर्जा पंपाच्या सहाय्याने लघु नळ पाणी पुरवठा योजना कोकणगाव वस्तीत सुरु झाल्याने तेथील नागरिकांनी जिल्हा परिषदेचे व शासनाचे आभार मानले. हातपंपाव्दारे पाणी घेण्याच्या त्रासापासून मुक्तता झाल्याबददल गावक-यांनी समाधान व्यक्त केले.


  • रविंद्र ठाकूर, माहिती अधिकारी, नाशिक
  • Saturday, May 12, 2012

    के. वेंकटरमण

    भारतात अनेक महान शास्त्रज्ञ होऊन गेले. सी. व्ही. रामन आपल्या `रामन इफेक्ट'च्या शोधाद्वारे भौतिकशास्त्रात जागतिक पातळीवर पोचले. वनस्पतींनाही संवेदना असतात हे जगदीश चंद्र बोस यांनी जगाला दाखवून दिले. विश्वेश्वरय्या यांनी धरणे आणि पूरनियंत्रणाच्या क्षेत्रांत नाव कमावले, तर श्रीनिवास रामानुजन यांनी आपल्या उण्यापुर्‍या ३२ वर्षांच्या आयुष्यात गणितातील अशक्य वाटणारी प्रमेय सोडवून जगाला आश्चर्यचकित केले. या सगळ्यांच्या रांगेत अजून एक महत्त्वाचे नाव जोडले जाते आणि ते म्हणजे के. व्यंकटरमण यांचे. मुंबई विद्यापीठाच्या `यू.डी.सी.टी' (युनिव्हरसिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी) या संस्थेला जागतिक दर्जाची संस्था बनविण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. तसेच पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एन.सी.एल.) या प्रतिथयश संस्थेचे पहिले भारतीय संचालक होण्याचा बहुमानही त्यांना मिळाला.

    के. व्यंकटरमण हे एक महान रसायन शास्त्रज्ञ होते. त्यांचा `बेकर-वेंकटरमण ट्रान्सफॉर्मेशन' हा शोध जागतिक पातळीवर अत्यंत प्रसिद्ध आहे.
    के. वेंकटरमण यांचे पूर्ण नाव कृष्णास्वामी वेंकटरमण. त्यांचे सहकारी त्यांनी `केव्ही' या नावाने हाक मारीत. केव्हींचा जन्म ७ जून १९०१ साली मद्रास (चेन्नई) येथे झाला. त्यांचे वडील सिव्हील इंजिनिअर होते, तसेच ते एक महान संस्कृत पंडितही होते. केव्हींना दोन भाऊ होते. केव्हींप्रमाणेच तेही अत्यंत हुशार होते, एक इंग्रजीचे प्रोफेसर होते, तर दुसरे डॉक्टर.

    केव्हींचे शालेय शिक्षण चेन्नई येथे झाले. तेथूनच १९२३ साली त्यांनी रसायनशास्त्रात एम.ए.ची पदवी संपादन केली. त्यांचे रसायनशास्त्रातील दोन शिक्षक बी. बी. डे आणि टी. आर. शेषाद्री हे केव्हींचे आदर्श होते. मद्रास सरकारच्या शिष्यवृत्तीवर पुढील शिक्षणासाठी केव्ही मँचेस्टरला रवाना झाले. तिथे त्यांनी एम.एस्सी. (टेक), पी. एचडी. आणि डी. एस्सी. या उƒतम पदव्या संपादन केल्या.

    तेथून परतल्यावर १९२७ साली त्यांना इंडियन इन्स्टीटय़ूट ऑफ बंगलुरू येथे संशोधक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तेथेच ते व्याख्याताही झाले. १९२९ फ्लॅवॉन नावाच्या एका रासायनिक मिश्रणाच्या पृथक्करणाची प्रक्रिया त्यांनी शोधून काढली. या शोधामुळे त्यांचे नाव जगभरातल्या रसायनशास्त्राच्या प्रथितयश शास्त्रज्ञांच्या यादीत घेतले जाऊ लागले.

    या शोधामुळे आणखी एक मोठी संधी केव्हींकडे चालून आली. ती म्हणजे १९३४ साली त्यांना मुंबई विद्यापीठाच्या `युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी' (यु.डी.सी.टी.) या प्रख्यात संस्थेच्या प्राध्यापक पदाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती त्यांना करण्यात आली. त्यांनी ती आनंदाने स्वीकारली. यु.डी.सी.टी.ही रसायनशास्त्रातील जागतिक पातळीवरील एक महत्त्वाची संस्था. त्यामुळे या संस्थेत प्राध्यापक होणे हा त्यांच्या कामाचा आणि हुशारीचा सन्मान होता. केवळ चार वर्षांत ते यु.डी.सी.टी.चे प्रमुख झाले. पुढे १९ वर्षे ते यु.डी.सी.टी.चे डीन राहिले. या काळात त्यांनी यु.डी.सी.टी.मध्ये सर्वांगाने अनेक सुधारणा घडवून आणल्या. तेथे त्यांनी रसायन तंत्रज्ञानाचे अनेक नवनवीन अभ्यासक्रम सुरू केले. जागतिक दर्जाच्या अनेक शास्त्रज्ञांची व्याख्याने त्यांनी यु.डी.सी.टी.मध्ये आयोजित केली. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना रसायनशास्त्रात जागतिक पातळीवर काय चालू आहे, हे समजून घेण्यास खूप मदत झाली. मुख्य म्हणजे त्यांचे कार्य केवळ संशोधन पातळीवर राहिले नाही, तर त्यांनी अनेक कारखानदारांच्या रसायन उद्योगात भेडसावणार्‍या अनेक जटील समस्या सोडविल्या, त्यामुळे भारतात रसायन उद्योग नावारूपास येण्यात मदत झाली.

    पुढे १९५७ साली आणखी एक मोठी संधी त्यांच्याकडे चालून आली. पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एन.सी.एल.)चे पहिले भारतीय संचालक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. नंतरच्या नऊ वर्षांत त्यांनी एन.सी.एल.ला आणखी उंचीवर नेऊन ठेवले.

    खरे तर केव्ही १९६६ साली एन.सी.एल.मधून निवृत्त झाले. या काळात त्यांचा दम्याचा विकारही त्यांना त्रासदायक ठरत होता. पण त्याही परिस्थितीत त्यांनी एन.सी.एल.च्या संशोधन कार्यात सक्रियपणे भाग घेणे सोडले नाही. अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत, म्हणजे १२ मे १९८१पर्यंत त्यांनी रसायनशास्त्राच्या संशोधनात स्वत:ला वाहून घेतलेले होते.

    केव्ही हे भारतातील रसायनशास्त्रातील अग्रगण्य नाव होते. पण संशोधनच नव्हे, तर शिक्षण आणि व्यवस्थापन क्षेत्रातही त्यांना उत्तम गती होती. त्यामुळे त्यांचा शिष्य-परिवार मोठा होता. त्यांना आपल्या संशोधन करीत असलेल्या विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करण्यात, त्यांना मार्गदर्शन करण्यात आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यात खूप रस होता. तसेच एन.सी.एल.ची व्यवस्थापकीय घडीही त्यांना नीट बसविता आली होती. आजही एन.सी.एल.ही जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य संस्था म्हणून नावलौकिक मिळवून आहे.

    आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी २५० प्रबंध लिहिले आणि ८५ विद्यार्थ्यांना पी.एचडी. ही पदवी मिळविण्यासाठी मार्गदर्शन केले. या विद्यार्थ्यांपैकी अनेक जण पुढे उत्तम संशोधक म्हणून नावारूपास आले.

    त्यांच्या कामाची अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थानी दखल घेतली. ते भारतातील तसेच रशिया, पोलंड यांसारख्या अनेक देशांतील राष्ट्रीय विज्ञान संस्थांचे सन्माननीय सदस्य होते. अनेक विज्ञान-नियतकालिकांचे संपादकपद त्यांनी सांभाळले होते.

    केंद्र सरकारने १९६१ साली `पद्मभूषण' देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
    केव्हींनी रचलेल्या रसायनशास्त्रातील भरीव कार्याच्या पायावर आज भारतातील संशोधन क्षेत्र आणि उद्योगधंदे भक्कमपणे उभे आहेत.


  • शुभांगी मांडे
  • बोर्डीची पर्यावरण गाथा

    पूर्वी सामाजिक वनीकरणाची जाहिरात दूरदर्शनवर प्रसारित होत असे. जळणाला लाकूड, गुरांना चारा, गाठीला पैका घरच्या घरी, सामाजिक वनीकरण येता दारी, असे म्हणत त्यातील वनलक्ष्मीचे कौतुक केले जात असे. ही जाहिरात आठवण्यामागचे कारण म्हणजे राज्य शासनाची पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना. वैश्विक तापमानवाढीचे दुष्परिणाम रोखण्यासाठी पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने पर्यावरण रक्षणासाठी ही योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेत ठाणे जिल्ह्यातील डहाणु तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायतीने पुरस्कार पटकाविला आहे

    बोर्डी गावाचा परिसर मूलतःच अत्यंत निसर्गरम्य. पश्चिमेस अथांग अरबी सागर आणि पूर्वेस सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत. मधोमध चिकू आणि नारळीच्या फळबागा आहेत. ऐतिहासिक, शैक्षणिक, कृषीविषयक मोठा वारसा बोर्डीला आहे. निसर्गाने दिलेलं हे देणं सांभाळून ठेवण्याची आणि त्याची निगा राखण्याची, त्यात भर टाकण्याची सद्सद्विवेकबुद्धीही बोर्डीवासियांकडे उपजत आहे. म्हणूनच बोर्डीचं सौंदर्य आजही अबाधित आहे.

    गाव करील ते राव करील काय, याची प्रचिती देत बोर्डी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ यांनी स्वयंस्फूर्तीने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

    १९६० साली बोर्डी ग्रामपंचायतीची स्थापना झाली. बोर्डीची लोकसंख्या ६९०० इतकी आहे. पर्यावरणाचे संवर्धन आणि जतन ही काळाची गरज ओळखून पर्यावरण संतुलित ग्राम योजनेअंतर्गत ग्रामपंचायत हद्दीत पहिल्या वर्षी २००९-१० साली ७००० वृक्षलागवड करण्यात आली. त्यापैकी जवळपास ५२५० इतक्या म्हणजे ७५ टक्के झाडांचे संवर्धन करण्यात ग्रामपंचायतीला यश आले.

    दुसऱ्या वर्षी ग्रामपंचायतीमार्फत ४२५० वृक्षलागवड करण्यात आली. दोन्ही वर्षांची मिळून जवळपास ९५०० इतक्या वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात यश आले आहे.

    या सगळ्या वृक्षांची नोंद केली आहे. सर्व वृक्षांना क्रमांक देऊन टॅगिंग करण्यात आले आहे. त्यांना संरक्षक पिंजरे लावण्यात आले आहेत. त्याशिवाय, वृक्ष लागवड केलेल्या जागांचा हात नकाशाही बनविण्यात आला आहे.

    कुटुंबापासून गावाचा विकास साधण्यास सुरुवात करताना या योजनेत लोकसहभाग वाढावा, म्हणून घरात एक मूल जन्मले की १० झाडे लावणे, नवीन घराच्या बांधकामाला परवानगी घेतल्यानंतर घरासभोवती ५० झाडे लावणे व ती १०० टक्के जगविणे, असा निर्धार करण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. तसेच गावात प्लास्टिक बंदी, कुऱ्हाड बंदी करण्यात आली आहे.

    पर्यावरणाच्या असंतुलनामुळे आज जगापुढे विविध समस्या उभ्या राहिल्या आहेत. याबाबत सामाजिक पातळीवर मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण होणे गरजेचे आहे. याची जाणीव ठेवून गावात प्लास्टिक बंदीचा ठराव घेऊन तो अंमलात आणला आहे. प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांकडून आर्थिक दंड वसूल करण्यात येतो. यासंदर्भात जागृती करण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. तसेच, आठवडा बाजारात जनजागृती मोहीम राबविण्यात आली. इतक्यावरच न थांबता दोन-तीन आठवड्यांतून प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी नीट होतेय का, याची खातरजमाही करून घेतली जाते.

    विविध उत्सव आणि सणांदरम्यान पूजा साहित्य आणि मूर्ती विसर्जनामुळे जलप्रदूषण होते. त्यामुळे इको फ्रेंडली सण-उत्सव साजरे करून, पर्यावरणाची कमीत कमी हानी करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीने पावले उचलली. मूर्तींचे विसर्जन पूर्वी समुद्रात केले जायचे. पण, पर्यावरण जतन करण्याच्या दृष्टीने सर्वांनी शाडूच्या मूर्ती वापराव्यात यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. तसेच, मूर्ती विसर्जनासाठी विशेष टाक्यांची सोय करण्यात आली.

    याबरोबरच वैयक्तिक शौचालय सुविधा, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन या घटकांनाही प्राधान्य देण्यात आले. गावात १२४४ कुटुंबसंख्या आहे. पैकी १०६६ कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालये आहेत. ही टक्केवारी ८६ टक्के आहे. वैयक्तिक शौचालय नसणाऱ्या १७८ कुटुंबांसाठी ६२ शौचालये बांधण्यात आली आहेत.

    ऊर्जा स्त्रोतांची मर्यादा लक्षात घेऊन, ऊर्जा बचत आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर या दृष्टीने ग्रामपंचायतीने प्रयत्न सुरू केले आहेत. ऊर्जा बचतीसाठी गावात २६४ सीएफएल पथदिवे लावण्यात आले आहेत. तसेच, १५ सौर पथदिव्यांचाही वापर करण्यात येत आहे. त्यामुळे पूर्वी अंधारात सर्पदंशाने होणाऱ्या अपघातांच्या संख्येतही घट झाली आहे.

    गावात घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. कचरा संकलनासाठी घंटागाडीचा वापर करण्यात येतो. त्या माध्यमातून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करण्यात येतो. घनकचऱ्याचे कंपोष्ट खड्‌ड्यात व्यवस्थापन केले जाते. यासाठी कचरा संकलन करणाऱ्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तसेच, सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डेही तयार करण्यात आले आहेत. गावात २८९ वैयक्तिक शोषखड्डे आहेत.

    बोर्डी ग्रामपंचायत एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या ग्रामपंचायतीने आतापर्यंत अनेक बक्षिसे मिळविली आहेत. १९९३ मध्ये ग्रामअभियानात महाराष्ट्रात सर्वप्रथम येण्याचा मान या ग्रामपंचायतीने मिळविला आहे. तसेच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मार्फत देण्यात येणारा कै. आबासाहेब खेडेकर पुरस्कार, उत्कृष्ट वनीकरणासाठी देण्यात येणारा वनश्री पुरस्कार, आदर्श गाव पुरस्कार, संपूर्ण स्वच्छता अभियान अंतर्गत निर्मल ग्राम पुरस्कार असे अनेक पुरस्कार ग्रामपंचायतीच्या शिरपेचात खोवलेले आहेत.

    पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत २०१०-११ मधील उल्लेखनीय कार्याबद्दल दि. २ डिसेंबर २०११ रोजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते बोर्डीच्या सरपंच श्रीमती बबिता शिरीष वरठा आणि ग्रामविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी पर्यावरण विकासरत्न पुरस्कार स्वीकारला. वृक्षारोपणाची सुबुद्धी, जीवनाची समृद्धी, असे घोषवाक्य बजावत ग्रामपंचायत बोर्डीने वृक्षारोपणाचा निर्धार करत, सुखी जीवनाचा मूलाधार अवलंबिला आहे.

    कोणताही उपक्रम लोकसहभागाशिवाय यशस्वी होत नाही. ग्रामीण भागात काम करणारे विविध पातळ्यांवरील पदाधिकारी, कार्यकर्ते, शासकीय यंत्रणा, अशासकीय संस्था आणि उत्स्फूर्तपणे सहभागी होणारे ग्रामस्थ यांच्या योगदानातूनच शासकीय योजना आणि उपक्रमांना आकार येत असतो. या माध्यमातून समृद्ध ग्राम, संपन्न ग्रामस्थ ही घोषणा प्रत्यक्षात येऊन पर्यावरण संतुलित महाराष्ट्राचे स्वप्न साकार होत आहे. बोर्डीसारख्या महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायती हे स्वप्न सत्यात आणत आहेत.

  • संप्रदा बीडकर, माहिती अधिकारी, उपमाहिती कार्यालय, डहाणू
  • अत्याधुनिक स्वयंचलित वेधशाळा

    तापमानाच्या अचुकतेमुळे पुढील भविष्यातील नैसर्गिक परिस्थितीचा अंदाज ठरविणे शक्य होते. यामध्ये प्रामुख्याने दैनंदिन तापमान, आद्रता, सूर्यप्रकाश, पाऊस हवामान यांचा समावेश आहे. यामुळे नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीबाबत अंदाज बांधता येऊ शकतो. त्यामुळे शेतकरी, जनतेबरोबर आपत्तीव्यवस्थापन करणारी यंत्रणा ही सावधानता बाळगून योग्य त्या उपाययोजना करू शकते. बहुसंख्य शेतकरी हवामानाच्या अंदाजावर पिकांचे नियोजन करतात.

    धुळे येथील कृषी महाविद्यालयाच्या हवामानशास्त्र विभागाच्या वेधशाळेत अत्याधुनिक साधनांच्या सहाय्याने दैनंदिन नोंदी घेतल्या जातात. देशात १२७ ठिकाणी अत्याधुनिक स्वयंचलित वेधशाळा आहेत. त्यात धुळे वेधशाळेचाही समावेश असल्याची माहिती कृषीविद्या (ग्रोनॉमी) विभागाचे डॉ. पी. एम. चौधरी, डॉ. नंदकुमार दळवी यांनी दिली.

    सन १९६० मध्ये कृषी महाविद्यालयाची स्थापना झाली. तेव्हापासून येथे अस्तित्वात आलेली वेधशाळा गत तीन-चार वर्षापासून स्वयंचलित हवामान स्थानकांच्या सहाय्याने पुणे येथील शासकीय वेधशाळेशी तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट) दिल्ली व हैद्राबाद येथील कार्यालयांशी जोडण्यात आली आहे. तेव्हांपासून धुळे जिल्हा हवामानशास्त्र विभागाच्या नकाशावर आला आहे. त्यामुळे येथील हवामानविषयक सर्व बाबींच्या नोंदी कृषी विद्या विभागाकडे दैनंदिन उपलब्ध होते. कृषी महाविद्यालयातील हवामानशास्त्र विभाग हा एक प्रमुख घटक आहे.

    भारतीय हवामानशास्त्र विभागाने ठरवून दिलेल्या मानकानुसार धुळे येथील वेधशाळा ही बी दर्जाची वेधशाळा ठरते असे डॉ. पी. एम. चौधरी म्हणाले. पूर्वी मर्यादित साधने होती. परंतु जसजशी साधने विकसित झाली तशी ती येथेही बसविण्यात आली. त्यात चार प्रकारचे तापमान मोजणारे स्टीव्हन्सन स्क्रीन बॉक्स, वा-यांचे दिशादर्शक विंडव्हेन्ड, पर्जन्य मोजणारे साधारण रेन गेज, सेल्फ रेकॉर्डिंग रेनगेज, जमिनीचे तापमान मोजणारे तापमापक, हवेच्या वेगाची माहिती देणारे मीन व्हेलॉसिटी मीटर, पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग मोजणारे ओपन पॅन अशा विविध साधनांचा समावेश आहे.

    कृषी महाविद्यालयाच्या शेतीच्या परिसरात अत्याधुनिक स्वयंचलित वेधशाळेची उभारणी करण्यात आली आहे. वेधशाळेत असलेल्या स्टीव्हन्सन स्क्रीन बॉक्स लाकडाच्या चार पायांच्या मचाणावरील पेटीत लावले असून त्यात वेगवेगळे थर्मामीटर लावण्यात आले असून त्याव्दारे चार प्रकारचे तापमान मिळते. स्टीव्हन्सन स्क्रीन बॉक्समध्ये बसविलेल्या चार थर्मामीटरव्दारे वेगवेगळया कमाल, किमान, ओले (वेटेबल) व कोरडे (ड्रायबल) या प्रकारांचा प्रामुख्याने समावेश आहे. दुपारी दोन वाजेनंतर पारा वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे कमाल तापमान दुपारी २ वाजून ३१ मिनीटांनी घेतले जाते. त्यावेळी तापमान परमोच्च स्थानी पोहचलेले असते. कमाल तापमान घेतल्यानंतर थर्मामीटर पुन्हा सेट (नॉर्मल) करुन ठेवण्यात येते त्यानंतर सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास किमान तापमान घेण्यात येते. या वेळा तसेच कार्यपध्दती भारतीय हवामानशास्त्र विभागाने ठरवून दिलेल्या आहेत.

    तसेच हवामानशास्त्रची माहिती भारतीय हवामान शास्त्र विभाग, पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असते. वेधशाळेत असलेल्या दोन स्वयंचलित हवामान स्थानकांवरुनही आपण माहिती घेऊ शकतो. त्या स्थानकांवर संगणकाव्दारे तापमानविषयक माहिती संकलित होऊन ती पुणे, दिल्ली, हैद्राबाद येथे उपग्रहामार्फत पाठविली जाते. कृषी सहाय्यक डी. एस. पाटील यांनी सांगितले की, पुणे वेधशाळेस हातांनी लिहूनही (मॅन्युअल) माहिती पाठविली जाते.

    धुळे स्वयंचलित वेधशाळेकडे शास्त्रज्ञ, आकाशवाणी केंद्र, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, शेतकरी, सामान्य नागरिकही हवामान, पाऊस, आर्दता तापमानाची दैनदिंन माहितीसाठी संपर्क साधत असल्याचे कृषी विद्या विभागाचे अधिका-यांनी सांगितले. त्यामुळे धुळे येथील कृषि महाविद्यालयातील हवामानशास्त्राची स्वयंचलित अत्याधुनिक वेधशाळा वरदान ठरली आहे.

  • जगन्नाथ पाटील, प्र. जिल्हा माहिती अधिकारी, धुळे

  • निर्मिती स्वयंसहाय्यता बचतगटाची आर्थिक भरारी

    बचतगटातील महिलांनी एकत्र येऊन व्यवसाय करणे ही बाब आता नवी राहिलेली नाही. बचतगटाच्या माध्यमातून एकत्र येऊन महिला आपल्या व्यवसायात जम बसवू लागल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांनी देखील हे दाखवून दिले आहे.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यापासून नेरूर हे गाव १० कि.मी. अंतरावर वसलेले आहे. कोकणातील इतर गावांप्रमाणेच या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून शेतीमध्ये तांदूळ, भूईमूग, कुळीथ, उडीद, सूर्यफूल, कलिंगड, नाचणी यासारखी पिके घेतली जातात. गावामध्ये दुग्धव्यवसाय व गांडूळ खत निर्मिती व विक्री यासारखे लहान मोठे व्यवसाय देखील केले जातात. ६००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या गावाचा विस्तारही खूप मोठा आहे.

    गावामध्ये इतर सोयी सुविधा असल्या तरी बचतगट मोठ्या प्रमाणावर कार्यरत नव्हते. त्यामुळे दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन बचतगट स्थापन करण्याचे ठरविले. या स्वयंसहाय्यता गटाला निर्मिती स्वयंसहाय्यता बचतगट असे नाव देण्यात आले. त्यांनतर गटाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून दिनांक २४ मार्च २०१२ रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या नेरूर शाखेत खाते उघडण्यात आले. या गटामध्ये १२ सदस्य आहेत.

    या गटाला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर गटाचे प्रथम मूल्यांकन करून २० हजार रूपये इतका फिरता निधी देण्यात आला. या फिरत्या निधीचा वापर गटातील सदस्यांनी कुक्कूटपालन, भाजी विक्री, नारळ विक्री यासारख्या छोट्या व्यवसायासाठी तसेच शौचालय व गोबरगॅस बांधकामासाठी केला. या गटाला वेळोवेळी गोमुख संस्था, कुडाळ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे.

    फिरत्या निधीचा वापर केल्यानंतर या गटातील सदस्यांनी काथ्या व्यवसाय करण्याचा निश्चय केला व त्याचे एक महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. या गटाचे दुसरे मूल्यांकन होऊन काथ्या व्यवसायासाठी २.५० लाख रूपये मंजूर करण्यात आले. याचा उपयोग गटाने काथ्यापासून दोऱ्या, पायपुसणी, गाद्या या सर्व प्रकारच्या शोभेच्या आणि कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्यासाठी केला. यासाठी लागणारा चांगल्या प्रतीचा काथा केरळमधून खरेदी करण्यात आला. या काथ्यापासून तयार झालेल्या वस्तुंना स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे गटाला हा व्यवसाय फायदेशीर ठरत आहे. या व्यवसायातून गटाला बँकेचा हप्ता भरून व इतर खर्च वजा करून १७०० ते १९०० रूपये पर्यंत मासिक फायदा होत आहे.

    या गटातील महिला या गावातील ग्रामसभेत स्वच्छता मोहिमेत भाग घेतात, तसेच इतर सामाजिक कार्यक्रमातही सहभागी होतात. अलिकडेच ऑगस्ट २००७-०८ मध्ये दिल्ली येथे प्रादेशिक सरस प्रदर्शनामध्ये हा गट सहभागी झाला होता. निर्मिती स्वयंसहाय्यता गटातील सदस्य स्वतःबरोबरच गावातील इतर महिलांचाही गटाच्या माध्यमातून कसा विकास होईल, याकडेही लक्ष देत आहेत. एकूणच बचतगटांच्या माध्यमातून एकत्र आल्याने क्षमतांचा विकास होऊन महिला आर्थिक भरारी घेऊ लागल्या आहेत, हे निश्चित.

    सहकारातून जलव्यवस्थापन

    सांगरुळ ....कोल्हापूरच्या पश्चिमेला २० कि.मी.वरचं गाव.... संपूर्ण परिसर हिरवागार... सर्वत्र मोठ्या डोलानं डौलणारा ताड माड ऊस आणि नजरेत भरणारी ऊसाची श्रीमंती. हे सारे चित्र आजच्या काळात अनुभवायला मिळते आहे. पण या परिसरात लहानपणापासून वावरल्याने पूर्वीचा काळ आठवल्याशिवाय रहात नाही. ६० -७० वर्षांपूर्वी आज दिमाखानं मिरवणारा हा ऊसपट्टा म्हणजे केवळ ऊजाड, उघडा.... बोडका माळ होता.

    नोव्हेंबर ते जूनपर्यंत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न येतोच कुठे ? ३-४ कि.मी. पर्यंत बाया-बाप्‍यांची पाण्यासाठी वणवण चालायची. गावाशेजारुनच कुंभी नदी वाहते पण तीही नोव्हेंबरनंतर रुसलेलीच. नदीपात्रात खोलवर खड्डे काढून त्यात पाझरणारे पाणी पिण्यासाठी वापरले जायचे. एक दिवस गावातील कै. बळीराम खाडे, कै. डी. ए. सावंत, कै. डी. आर. नाळेमास्तर कै. स. ब. खाडे यांनी नदीवर बांध घालायचे ठरविले आणि श्रमदानातून साकारला देशातील सहकारी तत्वावरील पहिला बंधारा.

    पावसाचे पळणारे पाणी प्रथम अडविले आणि अडविलेले पाणी मग शिवारातून खेळवले. म्हणूनच हा भाग ' शुगर बेल्ट ' अर्थात ' ऊसपट्टा ' म्हणून ओळखला जातो. सहकाराचा महामंत्र देणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राने सहकारातून जल व्यवस्थापनाचा आदर्श स्वातंत्र्यपूर्व काळात सांगरुळ बंधाऱ्याच्या माध्यमातून द्यावा हे निश्चित आदर्श आणि भूषणावह आहे. संपूर्ण देशाला कोल्हापूर टाईप बंधारा या नावाने जलव्यवस्थापनेची देणगी देण्याऱ्या संकल्पनेचा उद्गम कोल्हापुरातील राजाराम बंधारा व सहकारी तत्वावरील सांगरुळ बंधाऱ्यांपासून झाल्याचे मानन्यात येते.

    परिवर्तन हे अपघाताने किंवा योगायोगाने घडत नाही. त्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यावा लागतो. समाजाने त्याला होकार भरावा लागतो आणि नियोजनपूर्वक परिश्रमांची जोड द्यावी लागते. त्यातून 'आदर्शा'ची निर्मिती होते. कुंभी नदीवर बंधारा बांधण्यासाठी हाच पुढाकार कै. बळीराम नाना खाडे यांनी त्यावेळी घेतला. त्याला कै. डी. ए. सावंत, कै. डी. आर. नाळेमास्तर, कै. स. ब. खाडे या त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि गावाला साद घातली. संपूर्ण गाव त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत हातात पाटी, कुदळ, फावडे घेऊन बंधारा बांधण्यासाठी सज्ज झाला. श्रमदानातून माती गोळा करणे, बैलगाडीतून ती वाहून आणणे, रेड्याच्या पाठीवरुन दगड वाहून आणणे, लाकडी फळ्या तयार करणे अशी कामे सुरु झाली. काही दिवसातच कुंभी नदीवर श्रमदानातून बंधारा घातला गेला. यामुळे नाव्हेंबर ते मे अखेरचा शेती व पिण्याचा पाणी प्रश्न सोडविला गेला. पावसाळ्यात हा बांध वाहून जाई त्यामुळे दरवर्षी हा उपक्रम चाले. स्वातंत्र्यपूर्व काळातील सहकारी तत्वावरील हा पहिला बंधारा ठरला आहे.

    पुढे काही वर्षांनी १९५० साली कामाची देखभाल व धरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुंभी धरण या नोंदणीकृत सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली. सतत वाहून जाणाऱ्या बंधाऱ्याचा त्रास कमी व्हावा यासाठी संस्थेने पक्के धरण बांधण्याचे ठरविले. सुरुवातीला १०० रु.चे शेअर्स विकून संस्थेने पैसा उभा केला. २३ मार्च १९५२ साली मुंबई राज्याचे चीफ इंजिनिअर श्री. चाफेकर यांच्या हस्ते कुंभी नदी सांगरुळ धरण सहकारी सोसायटीतर्फे बांधण्यात येणाऱ्या धरणाच्या कामाची सुरुवात करण्यात आली होती. याचा उल्लेख पायाभरणीसाठी तयार करण्यात आलेल्या चांदीच्या थापीवर आढळून येतो. ही थापी आजही संस्थेने जपून ठेवली आहे. धरणासाठी सुमारे ३ लाख ४७ हजार ३१७ रुपयांचा खर्च केला गेला. यामध्ये ५० टक्के भाग भांडवल सांगरूळ आणि उर्वरित ५० टक्के भागभांडवल शेजारील गावांचे होते. सहकारी तत्त्वावरील या पहिल्या धरणाला त्यावेळी पंजाब, हरियाणा, दिल्ली येथील शिष्टमंडळांनी भेटी देवून पाहणी केली आहे. तत्त्कालीन मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी या धरणाला भेट देवून या उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत, अशी आठवण आवर्जून ग्रामस्थ देतात. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणारे शाळेच्या बालचमूतील कृष्णात बापू मेटे (वय-७०) हेही या प्रसंगाबद्दल भरभरुन माहिती देतात.

    धरणात पहिल्यांदा जेव्हा पाणीसाठा झाला ते पाणी गाडी-बैलं जूंपून वाजत-गाजत मिरवणुकीनं आणून ज्योतिर्लिंगाला अभिषेक घालण्यात आला. पाण्यासाठी वणवण थांबली तसेच या धरणावरील रत्यामुळे कोल्हापूरच्या-दिशेने वाहतुकीची दळणवळणाची सुविधाही निर्माण झाली. ही आठवण सांगताना सुभाष ज्ञानदेव तळेकर यांच्या डोळ्यात आजही चमक दिसत होती. त्याकाळी धरणातील पाणी उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी पट्टेवाला रखवालदार ठेवण्यात आला होता.विशेष म्हणजे सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वी धरणातील पाणी उपशावर बंदी होती. विचारपूर्वक व काटेकोरपणे पाणी वापरले जायचे त्यामुळे पाणी कमी लागायचे, पाणी म्हणजे जीवन या जीवनाचे मोल समजून खऱ्या अर्थाने ते जपून वापरले जायचे. आज या संस्थेचे ३००० सभासद आहेत. ४०० शेतकरी पंपधारक आहेत. ऊस, सूर्यफूल, भात, भुईमूग, सोयाबीन अशी नगदी पिके घेतली जातात. सांगरुळसह परिसरातील कोपार्डे, आडूर, कळंबे, भामटे, चिंचवडे, मरळी, सावर्डे, मल्हारपेठ या गावांना कृषीसाठी पाणीपुरवठा केला जातो. निवडणूकही सामंजस्याने होते. सध्या वसंत पांडुरंग पाटील अध्यक्ष तर सुनिल कापडे हे उपाध्यक्ष आहेत. पाणी आकारणी प्रतिअश्वशक्ती केवळ ८० रुपये आहे. त्यामुळे सर्वसामान्य, गरीब शेतकऱ्यालाही हा दर परवडणारा आहे. तोही या धरणाचा लाभधारक आहे.

    तिसरे महायुध्द झालेच तर ते पाण्यासाठी होईल असे भविष्यातील विदारक चित्र मांडले जात असताना सहकारातून जलव्यवस्थापन कसे केले जाते यांचा आदर्श निर्माण करण्याऱ्या ग्रामीण भागातील या सहकार पंढरीची माती कपाळी लावून येथील शिकवण प्रत्येकाने आचरणात आणल्यास सहकारातून शांततामय मार्गाने समृध्दी साधता येते हा विश्वास प्रत्येकाला आपल्या भविष्याबद्दल दिलास देणारा आहे हे नक्की.

  • वसंत शिर्के, उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर

  • PPPMS


    Friday, May 11, 2012

    पवनचक्क्यांतून वीज निर्मिती

    सांगली जिल्ह्यातील गावांमध्ये भारनियमन असले तरी दुसऱ्या बाजुला याच जिल्ह्यातून वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यापासून विजेची कमाई २६७ कोटी ६० लाख रुपये झाली आहे. गेल्यावर्षापेक्षा या वर्षाच्या उत्पन्नात सुमारे ५५ कोटींची वाढ झाली आहे. येत्या वर्षभरात आणखी शंभरवर पवनचक्क्या उभारणीच्या प्रक्रियेत असल्याने यंदाच्या वर्षात वाऱ्याच्या कमाईत भरीव वाढीची शक्यता आहे. जिल्ह्याचे अर्थकारण बदलून टाकणारा हा नवा व्यवसाय आहे.

    जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव या दुष्काळी पट्टयात आणि शिराळा तालुक्यात सुझलॉन, इनरकॉन आणि वेस्टॉज या कंपन्यांनी सुमारे ४०८ पवनचक्क्या उभारल्या आहेत. या पवनचक्कीतून गतवर्षी सुमारे ४३१ मे. वॅट विजेची निर्मिती केली आहे. ही वीज महावितरणने खरेदी केली असून त्यापोटी तीन कंपन्यांना २६७ कोटी रुपये अदा केले आहेत. या उभारलेल्या पवनचक्कीतून वीज निर्मिती सुरु झाली आहे.

    गेल्या दहा वर्षापासून जिल्ह्यात पवनचक्क्या उभारणीच्या कामाला वेग आला. पहिल्यांदा कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे तिसंगीसह घाटमाथ्यावर पवनचक्क्या उभारल्या. आता जत तालुक्यात मोठ्या संख्येने पवनचक्क्या उभारल्या जात आहेत. पवनचक्क्यांनी तयार केलेली वीज कंपनीकडून साडे तीन रुपये प्रति युनिट दराने स्वीकारली जाते. वीज नियामक आयोगाने दरवर्षी १५ पैसे प्रतियुनिट इतकी दरवाढ दिली आहे.

    सन २००८-०९ मध्ये वरील तीन कंपन्यांनी अनुक्रमे ७९.९,४२३.१९,११३.७८ दशलक्ष युनिट तयार केली होती. त्यावर्षी पवनचक्क्यांच्या माध्यमातून तयार झालेली एकूण वीज ६१७ दशलक्ष युनिट इतकी होती. गतवर्षी त्यात ५५ दशलक्ष युनिट इतकी वाढ झाली आहे. सद्या जत तालुक्यात गणेशा, ग्लोबल विंड, विन विंड, किनरसिस, सीएस विंड या कंपन्यांच्या सुमारे शंभरावर पवनचक्क्या उभारणीच्या प्रतीक्षेत असल्याने पुढील वर्षभरात भरीव वाढ अपेक्षित आहे.जत तालुक्यात सध्या २३ पवनचक्क्या येत्या काही महिन्यात कार्यान्वित होतील.

    'मेढा' या राज्य सरकारच्या प्राधिकरणाकडून झालेल्या सर्वेक्षणानुसार जत तालुक्यात सातशे मेगावॅट वीजनिर्मितीची क्षमता आहे. कमीत कमी सहाशे के. व्ही. ते अडीच मेगा वॅट क्षमतेच्या पवनचक्क्या उभारल्या जात आहेत. सुझलॉनतर्फे २ मेगावॅट तर ग्लोबल विंडतर्फे अडीच मेगावॅट क्षमतेच्या पवनचक्क्या उभारण्यात येत आहेत. एक मेगावॅट पवनचक्की उभारणीची जागा खरेदीपासून कार्यान्वित होईपर्यतचा सध्याचा खर्च साडेसात कोटी रुपये गृहीत धरला जातो. हा खर्च गृहीत धरता येत्या चार-पाच वर्षात सुमारे पंधराशे कोटी रुपयांची गुंतवणूक जत तालुक्यात पवनचक्क्यांच्या माध्यमातून होणार आहे.

    गेल्या तीन वर्षात विजेपासून या कंपन्यांना अडीचशे ते तीनशे कोटीच्या आसपास रक्कम मिळालेली आहे. इनरकॉन कंपनीच्या १११ पवनचक्क्या आहेत. त्यांची वीज निर्मिती७१ मे. वॅट असून त्यांनी १०० मे. वॅट वीज निर्मिती केली आहे. तर सुझलॉन कंपनीच्या सर्वात जास्त २४७ पवनचक्क्या असून त्यांची क्षमता २७८ मे. वॅट इतकी आहे. त्यांनी ४४० मे. वॅट वीज निर्मिती केलेली आहे. वेस्टॉज कंपनीच्या ५० पवनचक्कया असून त्याची क्षमता ५० मे. वॅट असून त्यांनी १३१ मे. वॅट वीज निर्मिती केलेली आहे. पवनचक्क्यांमधून निर्माण झालेल्या या वीज निर्मितीतून इनरकॉन २८ कोटी, सुझलॉन १९० कोटी, वेस्टॉज ५० कोटी याप्रमाणे त्यांना पैसे मिळालेले आहेत.

    पवनचक्की प्रकल्पामुळे चारचाकी वाहने, ट्रॅक्टर, डोझर, जेसीबी, पाण्याचे टँकर यांना चांगला व्यवसाय मिळाला आहे. सेंट्रिग कामगार, गवंडी त्यांच्या हाताखालचे मजूर यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे. छोट्या-मोठ्या कंत्राटदारांनाही कामे उपलब्ध झाली आहेत. पवनचक्क्या उभारण्याच्या कामांमुळे शेतकऱ्याला जमिनीच्या मोबदल्यापोटी मोठ्या प्रमाणावर पैसे मिळू लागले आहेत. ग्रामपंचायतींनाही पवनचक्क्यावर बसविलेल्या करामुळे ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात भर पडत आहे. त्यामुळे ग्रामपंचायती आर्थिकदृष्टया सक्षम होण्यास मदत होत आहे.

  • दिलीप घाटगे, माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, सांगली
  • कष्टाची द्राक्षे युरोपच्या बाजारपेठेत.

    जिद्दीला कष्टाची जोड दिली की प्रत्येक गोष्ट साध्य होते. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा येथील तारामती विठ्ठल थोरात यांचही आयुष्य याच सिद्धांतावर सुरू आहे. जवळपास ५० वर्षे काळ्या आईशी ईमान राखून तिची सेवा त्या करत आहेत. त्याचं फळही त्यांना मिळत आहे. दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. तिथे शेतीची काय अवस्था असेल, याची कल्पना मनाला वेदना देणारी असते. पण, याच दुष्काळी भागात तारामती यांनी पिकवलेली रसाळ आणि गोड द्राक्षे आज युरोपच्या बाजारपेठेत विराजमान झाली आहेत.

    तारामती यांचा त्यांच्या बालपणीच विवाह झाला. पती विठ्ठल थोरात यांच्याकडे वडिलोपार्जित १-२ एकर शेती होती. विटा येथून काही अंतरावर असणाऱ्या भांबर्डे या खेड्यामध्ये ही शेती होती. ही शेती कसायचा निर्धार त्यांनी केला. त्यावेळी शेतात जाण्यासाठी पुरेशी साधनेही नव्हती. बऱ्याचदा खूप अंतर चालून जावे लागत असे. पण, परिस्थितीशी झुंजत तारामती यांचे हात धरणी आईची सेवा करण्यासाठी राबायला लागले. धरणीमातेनेही त्यांच्या पदरात चांगल्या पिकाचं दान दिलं. ऊस, ज्वारी, लसूण, कांदा अशी अनेक पिके त्या त्यांची मुले, सुनील आणि चंद्रसेन यांच्या साथीने घेतात. पण, त्यांना आर्थिक यशाचा मार्ग दिला द्राक्षांच्या पिकाने.

    सहा वर्षांपूर्वी तारामती यांनी तासेगणेश नावाच्या जातीच्या द्राक्षांची लागवड केली. त्याला शेणखत आणि इतर खते वेळच्या वेळी दिली. तसेच, पिकाला कीड लागू नये म्हणून वेळच्या वेळी रोगप्रतिबंधक औषधांची फवारणीही केली. त्यांच्या या मेहनतीची कल्पना द्राक्षवेलीला लगडलेल्या टपोऱ्या द्राक्षघडांकडे पाहिल्यावर येते. म्हणूनच त्यांच्या या पिकाला युरोपच्या बाजारात चांगली मागणी आहे. गेली चार वर्षे थोरात कुटुंबिय युरोपला द्राक्षमाल निर्यात करत आहे. यावर्षी आतापर्यंत नऊ टन द्राक्ष निर्यात झाल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. शिवाय, अजूनही जवळपास पाच टन उत्पादन अपेक्षित आहे. महाग्रेप्स कंपनीचे दलाल येऊन द्राक्षांची छाटणी, पॅकिंग आणि इतर सर्व जबाबदारी घेतात.

    सुरुवातीला एक-दोन एकर इतकी मर्यादित असणारी थोरात कुटुंबियाची शेती आज जवळपास ११ एकर इतकी वाढली आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून विविध प्राणीही थोरात कुटुंबिय पाळतात. यामध्ये म्हशी आणि कुक्कुटपालन यांचा समावेश आहे. शेतीवर आणि या प्राणीमात्रांवर तारामती किती जीवापाड प्रेम करतात, हे त्यांच्या शेतातून फिरताना जाणवते. पती आणि मुलांच्या सहकार्यामुळेच हा पसारा वाढविणे शक्य झाल्याचे तारामती यांनी यावेळी सांगितले.

    जिद्द, चिकाटी आणि प्राप्त प्रतिकूल परिस्थितीतून नंदनवन फुलविण्याचे कौशल्य तारामती थोरात यांच्याकडे उपजतच आहे. अत्यंत साधी राहणी, कडक शिस्त, स्वावलंबन, काबाडकष्टाची तयारी, बोलका स्वभाव, समोरच्या माणसाबद्दल असणारी आस्था, त्यातून निर्माण होणारी आत्मीयता यांच्याकडे पुरेपुर आहे. पती विठ्ठल थोरात यांच्या साथीने तारामती यांनी स्वतःच्या जीवनाचा मळा फुलविला आहे. म्हणूनच त्यांच्या गोड आणि रसाळ द्राक्षांच्या रूपाने त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळाले आहे, असे म्हणायला हरकत नाही.

  • संप्रदा बीडकर, माहिती अधिकारी, उपमाहिती कार्यालय, डहाणू
  • प्रक्रिया उद्योगातून वाढविली शेतीची प्रतिष्ठा

    योग्य नियोजन आणि सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून देखील कधीकधी शेती उत्पादनाला बाजारपेठ व योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह कमी होतो. मात्र, त्यावर तोडगा काढून उत्पादनावर प्रक्रिया केल्यास शेतीतून मोठा फायदा होऊ शकतो, हे सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील खवणी येथील प्रवीण भोसले या तरूण शेतकऱ्याने सिद्ध करून दाखविले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाली आहे.

    कला शाखेची पदवी घेत असतानाच वयाच्या विसाव्या वर्षी प्रवीण यांनी वडिलोपार्जित शेती व्यवसायात लक्ष द्यायला सुरुवात केली. योग्य नियोजन करून शेती केली तर ती फायद्याची ठरू शकते, हे लक्षात आल्यामुळे नोकरी-उद्योगाच्या मागे न लागता त्यांनी वडील विलास भोसले यांच्यासमवेत शेतीत लक्ष द्यायला सुरूवात केली. त्यांनी आंबा, आवळा, चिकू, लिंबू, डाळींब, सीताफळ अशा फळझाडांची लागवड केली. त्यानंतर जांभूळ, पेरू, मोसंबी व अंजीर या फळांचीही प्रत्येकी एक एकर याप्रमाणे लागवड केली.

    आवळ्याचे उत्पादन सुरू झाले. मात्र बाजारपेठेची हमी नसल्यामुळे पुढे प्रश्न आला. तेव्हा कृषीभूषण वि.ग.राऊळ यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन त्यांनी आवळा लोणचे, आवळा कॅन्डी, आवळा पावडर हे फळप्रक्रिया उद्योग सुरू केले. शिवाय सारे उत्पादन पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने करण्यावर भर दिला. २००५ मध्ये पुणे येथे भरलेल्या सेंद्रीय कृषीमाल प्रदर्शनास भेट देऊन तत्कालीन कृषीमंत्री गोविंदराव आदिक यांनी कौतुक केले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे देखील भोसले यांच्या शेतीला आवर्जून भेट देतात.

    उत्पादित झालेल्या आवळ्यापैकी पाच टन आवळे बाजारात विक्रीसाठी पाठविले जातात. तर पाच टन आवळ्यावर प्रक्रिया केली जाते. १५ वर्षाच्या आवळ्याच्या झाडापासून प्रत्येकी १८० ते २०० किलो, केशर आंब्यापासून ५०० ते ७५० फळे मिळतात. तर, १० वर्षाच्या लिंबूच्या झाडापासून वर्षभर प्रत्येक झाडापासून तीन क्विंटल लिंबू मिळतात. तण व कीड नियंत्रणासाठी ते एकात्मिक कीड व्यवस्थापन व नियंत्रणाचा वापर करतात. तर खते व गोमूत्र हे ठिबकद्वारे पिकांना देतात. येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला पूर्ण मार्गदर्शन करण्याचेही काम प्रवीण करतात.

    एकीकडे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच, प्रवीण भोसले या तरूण शेतकऱ्याने आपल्या कृतीतून युवकांना शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला आहे.

    बाल बँक

    कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात बादेवाडी नावाचे छोटेसे गाव... मसाई पठाराच्या कुशीत वसलेले.... पन्हाळगडाच्या पश्चिमेला निसर्गरम्य परिसरात आहे.... गावची लोकसंख्या मर्यादित... गावकरी नावीन्याचा ध्यास घेणारे... इथल्या प्राथमिक शाळेतील शिक्षकही मुलांसाठी धडपडणारे... या शिक्षकांच्या संकल्पनेतून 'बाल बँक' उदयास आली आणि अल्पावधीतच लखपती झाली. या 'बाल बँकेला भेट देण्याची आयतीच संधी मिळाली. हा प्रवास अतिशय उत्साहवर्धक व प्रेरणादायी आहे.

    शिक्षकांना ग्रामस्थांमध्ये आदराचे स्थान आहे. बऱ्याच गावात गावच्या विकासासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले जाते. परंतु आता वेगळी परिस्थिती अनुभवयास मिळते. पण बादेवाडी गावातील शिक्षक आणि ग्रामस्थ यांच्यात उत्तम समन्वय आहे. गावकऱ्यांना विश्वासात घेऊन इथल्या शिक्षकांनी 'बाल बँक' सुरु केली आणि दुर्गम भागात राहूनही नवा आदर्श निर्माण केला.

    गावात रोजगाराची कमतरता असल्याने या परिसरातील लोक कोल्हापूर आणि इचलकरंजी परिसरात नोकरी करतात. गावात दळणवळणाची साधने कमी. बँक, दुकाने इतर सुविधाही नाहीत. अशा दुर्गम भागात नवीन उपक्रमाचा ध्यास शाळेचे मुख्याध्यापक नितीन मानकर आणि गुलाब बीसेन यांनी घेतला. शाळेतील मुलांच्या विकासासाठी विविध प्रयोग राबवित असताना त्यांना 'बाल बँके'ची संकल्पना सुचली आणि प्रत्यक्षात आणली.

    पालक मुलांना खाऊसाठी पैसे देतात त्या पैशाची बचत करण्यासाठी मुलांना प्रवृत्त केले आणि दर सोमवारी 'बाल बँक' दिन सुरु केला. आठवडाभर साठलेले पैसे मुलांनी द्यायला सुरुवात केली. २००८-२००९ या आर्थिक वर्षात ५,०००/- रुपये जमले. मुख्याध्यापक हे पैसे जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवत होते. २००९-२०१० या आर्थिक वर्षात १० हजार रुपये जमले. २०१०-११ या वर्षात ३७ हजार १५१ रुपये जमले आणि २०११-१२ या वर्षात १ लाख १६ हजार ४८६ रुपये जमा झाले. यात संग्राम गवड या सहावीच्या विद्यार्थ्याचे २९ हजार ५०० रुपये आहेत. या वर्षीचे पैसे युनियन बँकेत जमा केले आहेत. गावच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांच्या नावावर हे पैसे आहेत. दरवर्षी मे महिन्यात निकाला दिवशी या पैशाचे वितरण पालकांच्या उपस्थित केले जाते.

    या उपक्रमामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच मुलांनाही बचतीची सवय लागली आहे. मुले पालकांनी दिलेले पैसे इतरत्र खर्च न करता 'बाल बँकेत' जमा करतात. यासाठी एका मुलाची सचिव म्हणून निवड केली आहे. हा सचिव पैसे गोळा करण्यास दुपारच्या सुट्टीत शिक्षकांना मदत करतो. यामुळे मुलामध्ये निर्णय क्षमता, पैशाचे व्यवस्थापन आदी गुण विकसित होत आहेत.

    श्री. मानकर आणि श्री. बिसेन गुरुजींनी लावलेल्या या रोपट्याचे रुपांतर आता मोठ्या वृक्षात होऊ लागले आहे. सध्या मुख्याध्यापिका संजीवनी काशिद, शिक्षिका सरिता खरपुडे, स्नेहल जगदाळे आणि बिसेन गुरुजींनी उपक्रम उत्तम चालविला आहे. मानकर गुरुजींची संकल्पना तेवढ्याच ताकदीने सध्याच्या मुख्याध्यापिका श्रीमती काशीद यांनी रुजविली आहे.

    शी-म्हणजे शीलवान, क्ष-म्हणजे क्षमाशील आणि क- म्हणजे कर्तव्यदक्ष असा शिक्षक शब्दाचा अर्थ लावला तर या शब्दांना सार्थ ठरवत हे शिक्षक आपले काम आदर्शवत करत आहेत. त्यांना हवी आहे कौतुकाची थाप. आता पालक मुलांना पैसे जास्त प्रमाणावर देऊ लागलेत. पैसे बँकेत जमा होतात याची खात्री असल्याने पालकांचा विश्वास आहे. याच बरोबर शाळेत इतरही उपक्रम आहेत. मंगळवारी- बालसभा, बुधवारी- वाचन दिन, गुरुवारी- कार्यानुभव असे विशेष उपक्रम राबवितात. मुलांची गळती कमी होण्यासाठी प्रयत्न केले जातात. वर्गाच्या सेक्रेटरीवर ही जबाबदारी आहे. ज्या वर्गात १०० टक्के उपस्थिती आहे त्या सेक्रेटरीच्या शर्टला दिवसभर बॅच लावला जातो. त्यामुळे विद्यार्थीच उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न करतात. मुलांना शालोपयोगी वस्तू गावात मिळतीलच असे नाही हे लक्षात घेऊन शिक्षकांनी अवर शॉप योजना सुरु केली आहे. यामध्ये पेन, पेन्सिल, रबर, रिफील, वही अशा वस्तू विक्रीस ठेवल्या आहेत. यासाठी एका विद्यार्थ्यांची नेमणूक केली असून दुपारच्या सुटृटीत हा विद्यार्थी मुलांना लागणाऱ्या वस्तू देतो.

    शाळेतील प्रत्येक विद्यार्थी व्यासपीठावरुन कोणत्या ना कोणत्या विषयावर बोलू शकतो. हे धारिष्ट्य मुलांमध्ये शिक्षकांनी आणले आहे. सहावी नंतर या मुलांना तीन ते चार मैल चालत जाऊन शिक्षण घ्यावे लागते तर दहावीनंतर सात ते आठ किलोमीटर चालत जाऊन शिक्षण या मुलांना घ्यावे लागते इतक्या दुर्गम भागात हे शिक्षक आनंदाने काम करत आहेत. हाच खरा आदर्श आहे.

  • सागरकुमार कांबळे, माहिती सहाय्यक, विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर