विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असणारी पाठ्यपुस्तके या विद्यापीठाने स्वतःच प्रकाशित केली आहेत. विशेष म्हणजे स्वयं अध्ययनाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन या पुस्तकातील आशयाची मांडणी आणि पुस्तकांची निर्मिती खास वेगळ्या प्रकारची आहे. आतापर्यंत २२०० हून अधिक पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे.
दृकश्राव्य केंद्र :- मुक्त शिक्षण प्रणालीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारच्या अध्ययन साधनांची उपलब्धता करून दिली आहे. विद्यापीठाच्या दृक - श्राव्य निर्मिती केंद्राने निरनिराळ्या अभ्यासक्रमांसाठी ३१९ ध्वनिफिती तर ४२८ दृश्यफितींची निर्मिती केली आहे. त्यातील काही माहितीपटांना आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत, ही बाब अभिमानास्पद आहे.
अद्ययावत ग्रंथालय :- विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात अद्ययावत, सुसज्ज अशा ग्रंथालयाची उभारणी करण्यात आली आहे. ग्रंथालयात ४४ हजार ८२५ पुस्तके, १०६ जर्नल्स, २ हजार ९४७ सीडीज, २९६ ऑडीओ कॅसेट्स, २७७ व्हिडीओ कॅसेट्स उपलब्ध असून सुमारे ४५ हजार ऑनलाईन लाभ देणारे दोन इंटरनॅशनल डाटाबेस आहेत.
व्यापक अभ्यासकेंद्रे :- केवळ १५ अभ्यासकेंद्रे आणि ३७५७ विद्यार्थी असलेल्या या विद्यापीठाने गेल्या २३ वर्षांत देदीप्यमान कामगिरी केली. २०११ पर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोप-यात ४ हजाराहून अधिक अभ्यासकेंद्रे तर विद्यार्थी संख्या ४ लाखांहून अधिक झाली आहे. आजवर ३० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याची भूमिका या विद्यापीठाने यशस्वीपणे पेलली आहे.
युवा वर्ग आणि महिलांचे प्रमाण सर्वाधिक :- या विद्यापीठात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांत २० ते ४० वयोगटातील युवा वर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे. घर, संसार, नोकरी करून शिक्षण घेणा-यांत महिलांचे प्रमाण ३५ टक्के आहे. राज्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांचे प्रमाण ५५ टक्के तर शहरी विद्यार्थ्यांचे प्रवेश घेणा-या प्रमाण ४५ टक्के आहे.
आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार :- शिक्षणापासून वंचित असणा-या समाजघटकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी सुयोग्य असे शैक्षणिक तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात केवळ विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याच्या हेतूने नाही, तर शैक्षणिक तंत्रज्ञानाचा, अध्ययन शैलीचा वापर करून टिकाऊ स्वरूपाचे शिक्षण देऊन शैक्षणिक क्रांती केली. म्हणूनच ‘कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग’ या जागतिक संघटनेचा “अवार्ड ऑफ एक्सलंस” हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार या विद्यापीठाला मिळाला.
स्पर्धा परीक्षेत कामगिरी :- या विद्यापीठातून बी.ए. हा पदवी शिक्षणक्रम पूर्ण करून जिद्दीने अभ्यास केलेल्या गतवर्षी अहमदनगरच्या (शेवगांव) येथील ईश्वर कातकडे याने २०१०-११ मध्ये एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम तर २०११-१२ मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेत रमेश घोलप हे राज्यात प्रथम आल्याने विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. याशिवाय राज्याच्या विविध भागातील पंचवीसहून अधिक विद्यार्थ्यांनी एमपीएससी आणि युपीएससी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
कृषी विज्ञान केंद्र :- कृषी तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतात नेऊन यशस्वी करण्यासाठी १९९४ मध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांनी या विद्यापीठात कृषी विज्ञान केंद्राची स्थापना केली. कष्टकरी, शेतकरी, ग्रामीण युवक-युवतींना कृषी तंत्रज्ञानाचे अद्ययावत व्यावसायिक प्रशिक्षण देणे हे सर्वात महत्वाचे कार्य या केंद्रामार्फत केले जाते. शेतक-यांच्या मुलभूत गरजांचा आणि संबंधित प्रदेशातील हवामान, पिके, साधनसामग्री या बाबींचा बारकाईने विचार करून प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांबरोबर शेतक-यांनाही शेतीच्या तंत्रज्ञानाची ओळख आणि माहिती व्हावी, शेती उद्योगाला चालना मिळावी, म्हणून शेती पूरक व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात तसेच ओसाड जमिनीवर निरनिराळे उपक्रम राबवून नंदनवन फुलविण्यात आले आहे. कृषी विज्ञान केंद्रातून सेंद्रीय खताचा वापर केल्याने द्राक्षे, पेरू, आंबा, चिकू, नारळ यांची यशस्वी लागवड केली. त्यापासून मिळणा-या फळांचा दर्जाही उच्च आहे.
विद्यार्थी सेवा :- विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी युवक महोत्सव, क्रीडा महोत्सवाचे आयोजन विद्यार्थी कल्याण आणि बहिःशाल शिक्षण सेवा केंद्रामार्फत करण्यात येते. इंद्रधनुष्य, आविष्कार यांसारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला आहे, म्हणून विद्यापीठाने विभागीय केंद्र पातळीवर युवक महोत्सव सुरु केला. या महोत्सवात विद्यार्थी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करून त्यांची क्षमता सिद्ध करतो. राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर होणा-या विविध महोत्सवात सहभाग घेऊन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अनेक पुरस्कार पटकाविले आहेत. शैक्षणिक क्षेत्रापुरती आपली मर्यादा न ठेवता विद्यापीठाने आपली कार्यक्षमता विकसित व्हावी, आणि समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीतून विकासाला मदत व्हावी म्हणून, दरवर्षी लोकसंवाद सत्राचं आयोजन केले जाते. या सत्रात विविध क्षेत्रातील नामवंत वक्ते, लेखक यांना आमंत्रित केले जाते.
विविध पुरस्कार :- साहित्य, कला, संगीत, क्रीडा, नाट्य, समाजसेवा आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. विशाखा काव्य पुरस्कार, बाबुराव बागुल गौरव पुरस्कार, रुक्मिणी पुरस्कार, श्रमसेवा पुरस्कार, ज्ञानदीप पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार असे वेगवेगळे पुरस्कार देण्यात येतात.
यशस्वी आयोजन :- विद्यार्थ्यांत खेळाची आवड रुजावी या दृष्टीने विद्यापीठाने २००७ मध्ये अश्वमेध क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून या महोत्सवाची उंची वाढविली. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना खेळाचे मैदान मिळावे म्हणून या विद्यापीठाने क्रीडा स्पर्धा सुरु केल्या आहेत. आपल्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे स्पर्धा सुरु करणारे हे पहिले मुक्त विद्यापीठ आहे. आजवर अनेक विद्यार्थ्यांनी राज्य, राष्ट्रीय पातळीवर आपल्या खेळाचे प्रदर्शन करून विद्यापीठाला पुरस्कार मिळवून दिले आहेत. शिवाय “इंद्रधनुष्य”, “सिंहावलोकन परिषद”, “भारतीय दूरशिक्षण परिषदे”ची कार्यशाळाही यशस्वीपणे घेण्यात आली.
नवीन शिक्षणक्रम :- समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोचावे यासाठी अनेक अभिनव शिक्षणक्रम सुरु करण्यात आलेत. समाजाची गरज भागविणारे रिक्षा, टॅक्सीचालक हे नेहमीच दुर्लक्षित राहिलेले असतात. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून उच्च शिक्षण देऊन समाजात सन्मान प्राप्त करून देण्यासाठी बी.ए. (रोड ट्रान्सपोर्टेशन), शिर्डी संस्थान कर्मचा-यांसाठी बी.ए. (मंदिर व्यवस्थापन), उद्योग जगताच्या आधुनिक गरजांसाठी सायबर सिक्युरिटी, सप्लाय चेन मॅनेजमेंट, प्रोडक्शन आणि ऑपरेशन मॅनेजमेंट, बी.कॉम. फायनान्स आणि बँकिंग, मुंबई डबेवाले, लष्करी जवानांसाठी पूर्वतयारी आणि बी.ए., यंत्रमाग कामगारांच्या कौशल्याला समाजमान्यता देण्यासाठी बी.ए. इन टेक्सटाईल, घरोघरी गॅस सिलिंडर वितरण करणा-या कर्मचा-यांसाठी बी.ए. ग्राहकसेवा, महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचा-यांसाठी तसेच अधिका-यांसाठी बी.ए.(पोलीस अॅडमिनीस्ट्रेशन), आणी एम.बी.ए.(पब्लिक पॉलिसी अँड मॅनेजमेंट), नेव्हल डॉकयार्ड कर्मचा-यांसाठी अभियांत्रिकी क्षेत्रातील पदविका, सलून व्यवसाय पदविका, फार्मास्युटिकल कंपन्यांना उपयुक्त असे बी.एस्सी.(इंडस्ट्रीयल ड्रग्ज सायन्स) आणि एम.पी.एस.सी. / यू.पी.एस.सी.च्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याच्या दृष्टीने बी.ए.(पब्लिक सर्व्हीसेस) व एम.ए.(पब्लिक सर्व्हिसेस) हे शिक्षणक्रम सुरु करण्यात आले. विशेष म्हणजे काही शिक्षणक्रम मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांतही उपलब्ध आहेत.
व्हीडीओ पोर्टल आणि इंटरनेट रेडिओ :- विद्यापीठाच्या विद्यार्थी केंद्रित शिक्षणप्रणालीचा एक भाग म्हणून यावर्षी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरून विद्यापीठाने तयार केलेले दृक-श्राव्य फिती तसेच श्राव्य कार्यक्रम विद्यार्थ्यांना पाहता आणि ऐकता येतील. हा उपक्रम विद्यापीठाने कॅनडातील कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग या अग्रगण्य संस्थेच्या CEMCA या आशियाई विभागाबरोबर राबविण्यात येत आहे. या उपक्रमानुसार आतापर्यंत १२९ चित्रफिती आणि ६४ श्राव्यफिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर डाव्या बाजूला Media या मेनूमध्ये Audio Video Learning Content अशी Link दिली आहे. विद्यार्थी या लिंकचा वापर करून त्यांना हवी ती चित्रफीत विद्यापीठाच्या व्हीडीओ पोर्टलवरून पाहू शकतील त्याचबरोबर विद्यापीठाच्या पोर्टलवरून Web Redio उपलब्ध श्राव्यफिती ऐकू शकतील.
देशात एकूण १४ मुक्त विद्यापीठे आहेत. एक राष्ट्रीय स्तरावर आणि १३ राज्यस्तरावर असलेल्या मुक्त विद्यापीठांपैकी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ देशातले राज्य स्तरावरील चौथे मुक्त विद्यापीठ आहे. आज सर्व क्षेत्रात प्रगती साधून बदल करून शिक्षणक्रम, अभ्यासकेंद्रे, मार्गदर्शक प्राध्यापक, विद्यार्थी या सर्व बाबींसंदर्भात विद्यापीठाने एक अनोखे स्थान मिळविले आहे. ग्लोबल लिंकेजेस करण्यासाठी विद्यापीठाने जागतिक मुक्त विद्यापीठाची गंगोत्री असलेल्या युनायटेड किंगडम येथील ओपन युनिव्हर्सिटीशी तसेच कॅनडा व श्रीलंका येथील विद्यापीठांशी संबंध दृढ केले आहेत. केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाचा ठसा उमटविण्याचा कुलगुरू डॉ. आर. कृष्णकुमार यांचा सततचा ध्यास विद्यापीठाला निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
No comments:
Post a Comment