मिशनच्या सुरूवातीस जिल्ह्यातील तीन तालुक्यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर मात्र पुसद, झरी जामणी, उमरखेड, आर्णी, महागाव, घाटंजी, केळापुर, मारेगाव, कळंब या नऊ तालुक्यांचा मिशनमध्ये समावेश झाला. जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक उंचाविण्यासाठी शिक्षण, आरोग्य व रोजगाराच्या अनुषंगाने विविध प्रकारचे १४ कार्यक्रम मिशन अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यात शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी पाच, आरोग्य विकासासाठी तीन तर रोजगार या घटकासाठी चार कार्यक्रमांचा समावेश आहे. गेल्या वर्षात दहा कोटीपेक्षा जास्त रक्कम यावर खर्च करण्यात आली.
शैक्षणिक उपक्रमांतर्गत १० वी, १२ वीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी परिक्षेच्या निकालानंतर उजळणी वर्ग घेण्यात आले. १० वीतील ८ हजार ३१४ तर १२ वीतील २ हजार ३७२ विद्यार्थ्यांना उजळणी वर्गाचा फायदा झाला. जवळपास १६ टक्के विद्यार्थी या उजळणी वर्गामुळे उत्तीर्ण होऊन पुढच्या वर्गात दाखल झाले. अन्य कारणांमुळे शैक्षणिक प्रगती खुंटलेल्या किंवा मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा वर्ग अतिशय उपयुक्त ठरला आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासाची चांगली सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावू शकतो. त्यामुळे जिल्ह्यात १९९ अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये सुरू करण्यात आलेल्या या अभ्यासिकेत पुस्तके, संदर्भ ग्रंथ तसेच आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध होत आहे.
भारनियमनाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत असलेला परिणाम पाहता अभ्यासिकेत सोलर दिव्यांची व्यवस्थाही करून देण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास सुकर झाला आहे. बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाणे सोईचे व्हावे म्हणून परिवहन महांडळाच्या बस विकत घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्याची सुविधाही या योजनेतून लवकरच उपलब्ध होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान या विषयाची रूची निर्माण व्हावी म्हणून प्रयोगशाळांना उपकरणे, रसायने, मॉडेल्स, तक्ते आदी पुरविण्यात आले. विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग करता यावे त्यातील बालवैज्ञानिकाला प्रोत्साहन मिळावे म्हणून हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात २२६ शाळांच्या प्रयोगशाळांना या उद्देशाने साहित्य देण्यात आले आहे. तसेच बालभवन विज्ञान केंद्रही या मिशनमधून जिल्ह्यात उभे राहात आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान या विषयाबाबत निश्चितच गोडी निर्माण होत आहे.
मिशनमधील आरोग्य व बालकल्याण या कार्यक्रमांतर्गत गर्भवती माता, स्तनदा माता तसेच ० ते ६ महिने वयोगटातील बालकांची नियमीत आरोग्य तपासणी तसेच औषधोपचार करण्यात येत आहे. ग्रामीण भागात आयोजित या शिबिराचा गरजूंना खऱ्या अर्थाने लाभ होतांना दिसतो. आताच्या मुली या उद्याच्या माता आहेत. त्यामुळे त्यांच्यात आरोग्यविषयक जागरुकता निर्माण होणे फार आवश्यक आहे. त्यासाठी मिशनमधून किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक प्रशिक्षण दिले जाते. तसेच जीवन कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यात येत आहे. केळापुर व घाटंजी या दोन तालुक्यात युनिसेफमार्फत तर उर्वरित सात तालुक्यात स्पर्श या संस्थेमार्फत १ कोटी ८२ लाख रूपये खर्च करून प्रशिक्षण देण्यात आले.
गर्भवती महिलांना विश्रांतीची आवश्यकता असतांना घरातील कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे अशा महिलांना मजुरीला जावे लागते. अनुसूचित जाती, जमाती तसेच दारिद्यरेषेखालील महिलांना मिशनमुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे. मिशनमुळे गर्भवती मातांना गर्भारपणाचा नववा महिना लागताच ८०० रूपये याप्रमाणे बुडीत मजुरी दिली जाते. गेल्या वर्षात २ हजार ७०५ महिलांना ३५ लाख रुपये बुडीत मजुरी म्हणून वितरीत करण्यात आली. महिलांना हक्काची रक्कम या योजनेतून मिळत असल्याने स्वत:च्या आरोग्यासोबतच होणाऱ्या बाळाकडे लक्ष पुरविणे अधिक सोईचे झाले आहे.
मानव विकास मिशनने रोजगार निर्मितीवरही भर दिला आहे. गाव खेड्यातील युवकांना तेथेच रोजगार उपलब्ध व्हावा, अशी भूमिका या मिशनने घेतली आहे. रेशीम कोषाला अलिकडे खुपच मागणी आहे. रेशीम शेतीच्या अनुषंगाने कीटक संगोपनगृह बांधकामासाठी एक एकर तुती लागवडीचा विचार करता खर्चाच्या पन्नास टक्के किंवा रूपये ५० हजार इतके अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांच्या जमीनीतील मातीचे योग्य परिक्षण झाल्यास त्यात कोणती पिके घेणे अधिक सोईचे होईल याचा अंदाज बांधणे सोपे होते. त्यामुळे अलिकडे माती परिक्षणावर भर देण्यात येत आहे. मिशनध्ये विनामूल्य माती परिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. फिरत्या माती परिक्षण प्रयोगशाळांमुळे शेतकरी सहजगत्या परिक्षण करून घेऊ शकते.
युवकांना स्वयंरोजगारासाठी तयार करण्याच्या अनुषंगाने औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात त्यांना प्रशिक्षित करून व्यवसायासाठी त्यांना साहित्य पुरविले जाते. जिल्ह्यात यावर्षी २ हजार ३२१ युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देऊन त्यांना २२७ लाख रूपये किंमतीचे साहित्य वाटप करण्यात आले. बचतगटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात परसबाग, कीचन गार्डन योजनाही राबविण्यात येते. या परसबागेत रोजच्या आहारातील भाज्या, पालेभाज्या व हंगामी फळे यांचे उत्पादन घेण्यासाठी बी-बियाने, रोपे, खते, किटकनाशके, औैषधे पुरविण्यात येते. २०११-१२ या वर्षात ६२५ कुटूंबांना याचा पुरवठा करण्यात आला. त्यावर ११ लाख २५ हजार इतका खर्च करण्यात आला.
No comments:
Post a Comment