देव, धर्म, धार्मिक संस्कार, श्रद्धा यांचा पगडा भारतीय जनमानसावर सर्वात जास्त आहे. मनः शांती मिळविण्यासाठी जे जे उत्तम, उन्नत, महामंगल असते, त्याच्या नतमस्तक होणे हा मानवी स्वभाव धर्मच आहे. आदिशक्ती महालक्ष्मीची महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी स्थाने आहे. यातीलच एक महत्वाचे स्थान म्हणजे डहाणूची महालक्ष्मी. डहाणू हे ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे महत्वाचे ठिकाण. समुद्रकिनारा, जंगलपट्टी आणि अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या डहाणूपासून जवळपास २५ ते ३० कि.मी. वरील विवळवेढे हे गाव महालक्ष्मीचे स्थान आहे.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा पुजारी आदिवासी समाजातील आहे. या लोकात ही देवी कोळवणची महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गुजरातमध्ये वास्तव करण्याची इच्छा झाली. गुजरातमधील सुपीकता धार्मिकता पाहण्यासाठी घनदाट जंगल, दऱ्या, डोंगर पार करत महालक्ष्मी देवी प्रवासाला निघाली. त्यामुळे त्या भागातील राक्षस दैत्यांची झोप उडाली. महालक्ष्मीला आपल्या परिसरात पाहून राक्षसांचे डोळे क्रोधाने लाल झाले. महालक्ष्मीने अवतार घेत राक्षसदैत्यांना त्रिशूळाने ठार केले. राक्षसाबरोबर झालेल्या युद्धात देवी दमली. तिला विश्रांतीची गरज भासू लागली. विश्रांतीसाठी तिची नजर जवळ असलेल्या मुसा डोंगरावर गेली. हेच डोंगराचे शिखर आपल्याला विश्रांतीसाठी योग्य आहे, असे तिने ठरविले. महालक्ष्मी देवीचे वास्तव रानशेतच्या डोंगरावर दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीचे आहे, अशी आख्यायिका आहे.
वंशपरंपरेने डहाणूतील वाघाडी या गावातील सातवी कुटुंबाकडे मंदिर व्यवस्थापन व पूजेचा हक्क आहे. मातेचे एक मंदिर गडावर आहे. तर दुसरे मंदिर पायथ्याशी आहे. या गड पायथ्याशी महामार्गालगत असलेल्या मंदिराचा इतिहास शेकडो वर्षे जुना आहे. डोंगरावरील देवीचे मूळ वास्तव असलेले मंदिर मात्र आता सुंदररित्या बांधले गेले आहे. मंदिराचा गाभारा सजवला गेला आहे.
या मंदिराच्या जवळ असलेल्या डोंगरावर देवीचे मुख्य ठाणे दोन कड्यांच्या गुहेत आहे. ज्या भाविकांना अथवा पर्यंटकांना डोंगरावर चढून जावयाचे आहे, त्यांच्यासाठी चारेाटीपासून ६ किमी.वरील वधवा गावातून गडावर जाण्यासाठी पायऱ्यांचा रस्ता आहे. साधारणतः ९०० पायऱ्या चढून जाव्या लागतात. गडावर जाण्यासाठी दुसरा रस्ता पायथ्याशी असलेल्या महालक्ष्मी मंदिरापासून सुरु होतो. देवीच्या डोंगरावरील स्थानावर जाण्यासाठी २०० फूट भुयारातून जावे लागते. या उंच ठिकाणी पाण्याचा झरा व कुंड आहे. येथील पाणी कधीच कमी होत नाही.
या मंदिराचा गाभारा पश्चिमाभिमुख आहे. मूर्ती गाभाऱ्यांत असून देवीचा मुखवटा दर्शनी आहे. तो दोन फूट उंचीचा लांबट चेहऱ्याचा आहे. मस्तकावर चांदीचा मुकुट आणि कुंडले आहेत. मागील बाजूस भव्य पाषाण असून याच पाषाणाचा दर्शनी मुखवटा कोरुन काढला आहे. मुखवट्याला सोने चांदी अलंकारांनी सजवले असून मुखवट्यासमोर सिंह आणि जय-विजय यांच्या चांदीच्या मूर्ती आहेत. बाजूला सभा मंडप, यज्ञकुंड, दीपमाळा त्यांच्या बाजूला हनुमान मंदिर आहे. समोर देवीचा ध्वज लावण्यासाठी उंच लाकडी खांब उभा आहे.
यात्रा काळात विविध धार्मिक विधी, उत्सव येथे पार पडतात. चैत्र पौर्णिमेला पहिल्या होमाच्या दिवशी मध्यरात्री १२.०० वा पुजारी ध्वज पूजेचे साहित्य, नारळ घेवून पायथ्याच्या मंदिरापासून धावत जातो व तीन मैलाचे अंतर पार करुन रात्री तीन वाजता डोंगरावर चढतो. तेथे तुपाचा दिवा लावून ध्वज फडकवतो व सकाळी ७.०० वा. परत येतो. डोंगरावर ६०० फूट अंतरावर ध्वज लावण्यासाठी जातो.
अकबर बादशहाच्या वेळी राजा तोरडमल येथे आला होता. त्याने देवीचे दर्शन घेतले होते,अशी इतिहासांत नोंद आहे. तसेच, पंजाबचा राजा रणजित सिंह याने पंजाब सर केल्यावर देवीची महापूजा करुन मंदिरावर सोन्याचा कळस चढवल्यांची नोंद आहे.
यात्रेला मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, याशिवाय गुजरात राज्यातील असंख्य यात्रेकरु येतात. येथे येण्यासाठी एस. टी. महामंडळाच्या बसेस, रिक्षा आदी वाहनांची सुविधा आहे. पर्यटक व भाविकांच्या निवासासाठी मंदिराच्या आजुबाजूला धर्मशाळा आहेत. जत्रेला प्रचंड गर्दी असल्याने मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान येथील व्यापारी दरवर्षी नियमितपणे येत असतात. यात्रोत्सवाच्या १५ दिवसांत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते. यात्रेत कांदे, बटाटे, लसूण, मीठ, मसाल्याचे पदार्थ, काचेच्या बांगड्यांपासून जवळपास सर्वच संसारापयोगी वस्तू लोक खरेदी करतात. अतिशय शांत, डोंगरदऱ्यांनी वेढलेले, धार्मिक पावित्र्य असलेला, वनराईने नटलेला हा परिसर केवळ भाविकांचे नव्हे तर पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
No comments:
Post a Comment