कोकण भवन येथून गाडीने निघालो तेव्हा पाऊस सुरु होता. गाडी पेणच्या दिशेने निघाली. महाराष्ट्रात आणि देश-परदेशासह प्रसिध्द असलेले पेणचे गणपती. प्रत्यक्ष पहावं यासाठी सहकाऱ्यासह पेणकडे निघालो. गाडीच्या वेगाबरोबर पेणमध्ये काय काय पहावं, काय विचारावं याविषयी मनात विचार सुरु होता.
रायगड जिल्हयातील पेण तालुक्याच्या गावी पोहोचलो. पेणमधून पुणे-मुंबईसह दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद आणि अमेरिकेतदेखील मूर्त्या पाठविल्या जातात. परवा छायाचित्रकार श्री.सतीश कुलकर्णी यांनी कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती तयार करण्याची पध्दत पेणमध्ये सुरु झाल्याची माहिती दिली. इको फ्रेन्डली गणपती काळाची गरज झाली आहे. या पार्श्वभूमीवर माहिती घेण्याची आवश्यकता वाटल्याने आम्ही तेथे पोहोचलो होतो.
पेणमध्ये गणेश मूर्त्या बनविण्याची प्रक्रिया १०० वर्षापासून जूनी आहे. खाजगी आनंदाखातर मूर्त्या बनविण्याची पध्दत पूर्वी होती. गणेश उत्सवाला सार्वजनिक स्वरुप लोकमान्य टिळक यांनी प्राप्त करुन दिले. यानंतर पेण येथील मूर्त्यांना देखील मान्यता मिळू लागली.
भिकाजी कृष्ण देवधर यांना गणेश मूर्ती उद्योग क्षेत्राचे उद्योजक म्हणता येईल. आता अनेक लहान-मोठे उद्योजक तेथे तयार झाले आहेत. मध्य महाराष्ट्रातील पगडी बनविण्याचा कारभार बंद पडल्यानंतर देवधरांनी गणेश मूर्ती तयार करण्याची कल्पना मांडली आणि त्यात ते यशस्वी झाले. आज पेणमध्ये देवधरांची चौथी पिढी श्रीकांत देवधर यांच्या रुपाने गणेश मूर्त्यांचा गृहउद्योग करतेय. अर्थात पारंपरिक पध्दतीने.
पूर्वीच्या काळी गणेश मूर्तीच्या निर्मितीसाठी स्थानिक पहाडातून माती मिळविली जात असे. कालांतराने ही माती गुजरात अथवा भावनगर मधून आणली जात असे. १९४० नंतर प्लास्टर ऑफ पॅरीसचा उपयोग सुरु झाला आणि तेथून मूर्तीला वेगळे स्वरुप प्राप्त झाले. १९७० नंतर गणेश मूर्तीचा व्यवसाय सुरु झाला आणि पेण शहरातील एक नामवंत उद्योग म्हणून या व्यवसायाने मोठे रुप धारण केले. ६०० पेक्षा अधिक कारखान्यात गणेश मूर्तीचे काम करतात. वेगवेगळया आकाराच्या १० लाखापैकी अधिक मूर्त्या दरवर्षी पेणमध्ये तयार होतात आणि सा-या देशभर वितरित केल्या जातात. गणेश मूर्तीवर आकर्षित रंग, वेशभूषा, दागिने यामुळे या मूर्त्या ओळखल्या जातात. पेणमध्ये फिरताना जाणवले ते म्हणजे मूर्त्या तयार झाल्यानंतर त्यातील प्रत्येकाला रंग देण्याची प्रक्रिया ही वैशिष्टयपूर्ण असते. सगळयात अवघड गोष्ट म्हणजे, गणेश मूर्तीचे डोळे. डोळे रंगविणारे कारागीरांची संख्याही फार कमी आहे. पण त्यात विशेषीकरण असून केवळ चेहरा रंगविणे हेच गणेश मूर्तीचे वैशिष्टय ठरतेय. आता मात्र अगदी सोवळयाचा रंग कसा असावा यावर मूर्तीची किंमत ठरते.
पेण नगरपालिकेने गणेश मूर्त्यासाठी एक संग्रहालय सुरु केले आहे. श्रध्देच्या बाजारातही विज्ञान शिरल्याने उत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घेतली जाते. गणेशोत्सवानंतर नद्या, नाले, ओढे, समुद्रात होणारे प्रदूषण टाळण्यासाठी “ इको फ्रेन्डली ” बेस गणपतीची संकल्पना पुढे आली. आणि पेणमधील सेवानिवृत्त शिक्षक विजय वामन वडके यांनी इको फ्रेन्डली गणपती बनविणे सुरु केले.
श्री. विजय वडके यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी इको फ्रेन्डली गणपतीच्या अर्थकरणाबद्दल म्हणाले, “ इको फ्रेन्डली ” मूर्त्यांसाठी अनेक समस्या आहेत. त्यात इको फ्रेन्डली रंग. हे रंग मोठया प्रमाणावर उपलब्ध होत नसल्यामुळे मूर्त्यांमधील आकर्षणावर मर्यादा येत आहेत. पेण मधील मूर्त्या व्यवसायाला २१ व्या शतकातही अनेक प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. त्यात मुख्य म्हणजे खंडित वीज पुरवठा. यामुळे उद्योगावर मोठा विपरित परिणाम झाल्याचे पहावयास मिळते. मोठया शहरात अनेक ठिकाणी आता पेण येथील गणपतीचे साचे आणि कारागीर स्थलांतरित झाल्यामुळे या शहरावर देखील परिणाम झाला आहे. भविष्यात पर्यावरण व्यवसायात जागृती होईल तसेच इको फ्रेन्डली मूर्तीला मागणी वाढेल असे येथील उद्योजकांना वाटते. त्यादृष्टीने आम्ही हा प्रयोग सुरु केला आहे. याची कल्पना कशी सुचली असे विचारल्यावर वडके गुरुजी म्हणाले की, मुळात मी शिक्षक. जे करायचं ते उत्तम आणि वेगळं करायचा हा ध्यास. मुलांना आयुष्यभर पर्यावरण चांगलं रहावं असे शिकवलं आणि या व्यवसायात मी पर्यावरण का बिघडवू? म्हणून माझे अध्यात्मिक गुरु अनिरुध्द बापू यांनी प्रेरणा दिली. त्यांच्या संस्थेत जमा होणा-या रामनामाच्या वहया एकत्र करुन त्या कागदापासून लगदा तयार केला जातो. जंगलात मिळणारे डिंक एकत्र केले जाते. त्यात व्हायटींग पावडर मिसळली जाते. सारे मिश्रण एकजीव केल्यानंतर मग गणपतीच्या साच्यात ते चोवीस तास ठेवलं जाते. नंतर मूर्ती वाळविली जाते. फिनीशींग झाल्यानंतर एक एक रंग दिला जातो. एक मूर्ती तयार व्हायला साधारणपणे दहा दिवस लागतात. पेणमध्ये पर्यावरण पुरक मूर्ती बनविण्याचा माझा एकमेव कारखाना आहे.”
आमच्या गप्पा सुरु होत्या. मुले काय करतात असा प्रश्न केला. एका पिढीने दुस-या पिढीकडे व्यवसाय दिल्याची अनेक उदाहरणं आहेत. वडके गुरुजी हातातला लगदा मळत म्हणाले, “माझा मुलगा वकिली करतो. एका मूर्तीसाठी दहा दिवस कष्ट करुन सातशे रुपये मिळतात. लोकांची मागणी फारशी नाही. हंगामात २०० ते ३०० मूर्त्या विकल्या जातात. एक मात्र सांगतो, पुढच्या दोन चार वर्षात याच मूर्त्या लोक मागतील. कारण पर्यावरणाचे महत्व लोकांना पटतंय . प्रदूषण कमी व्हायचं असेल तर श्रध्दा डोळस ठेवायला हवी. प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पडलेले हे एक सकारात्मक पाऊल होते. ते स्वत: पाहता आलं. या मताचा मी देखील आहे.” हाताने मूर्ती तयार करण्याचं काम सुरु होतं.
इको फ्रेन्डली गणेश मूर्त्या बनविण्याची प्रक्रिया पाहिली. गावातील बाजारपेठेत जावून गणेश मूर्त्यांचे फोटो काढले आणि गाडी परतीच्या दिशेने निघाली.
No comments:
Post a Comment