Tuesday, July 24, 2012

गाड्यांच्या धुरापासून वीजनिर्मिती

मानवी कल्पनांना कसलेही बंधन व मर्यादा नसते. मात्र त्या प्रत्यक्षात उतरविणे, त्यात यशस्वी होणे हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते. त्यासाठी जिद्द, चिकाटी महत्वाची असते. याचेच एकय उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील वावी या गावचा तरूण राजेंद्र पवार. गाड्यांमधून निघणाऱ्या धुरापासून वीज निर्मिती करता येऊ शकते हे त्यांनी सिद्ध केले आहे.

सध्या सर्वत्र ध्वनी, वायू, जल प्रदुषणाने हाहा:कार माजवला आहे. ग्लोबल वार्मिंग आणि पर्यावरणाची हानी यामागील कारणे न संपणारी आहेत. या साऱ्या गोष्टींचा विचार करत असताना या युवकाच्या मनात गाड्यांमधून निघणाऱ्या धुरापासून वीज निर्मिती करण्याची कल्पना आली.

'थ्री इडीयट' या चित्रपटातील रँचो प्रमाणे आपल्यातील शोधक व कल्पक वृत्तीचा वापर राजेंद्रने विधायक कामासाठी केला आहे. राजेंद्र तसा ग्रामीण भागातील सिन्नर तालुक्यातील वावी या गावचा आहे. या परिसरात ना चालायला पक्का रस्ता ना रस्त्यावर दिवे. अशा भागात राहिलेल्या राजेंद्रने पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही, यासाठी गाड्यांमधून निघणाऱ्या धुरापासून वीज निर्मितीचा प्रयोग केलाय. या ऊर्जेचा वापर त्याने गाडीचा ॲव्हेरज वाढविणे, गाडीतील एसी व वायपर चालविणे अशा कामांसाठी केला आहे. तसेच या वाया जाणाऱ्या धुराचा वापर त्याने चक्क मोबाईल चार्जिंगसाठी आणि सिगारेट लायटर मध्येही केला आहे. त्याच्या प्रयोगाची चाचणी चारचाकी गाड्यांसाठी केली जाणार आहे. त्याला या कामगिरीचे पेटंट प्रमाणपत्र ही मिळाले आहे.

या रँचोची ही कल्पना आपल्या गाड्यांमध्येही उपयोगी पडावी यासाठी अनेक बड्या कंपन्या पुढे आल्या आहेत. त्याच्या प्रयोगानुसार यंत्रावरील अतिरिक्त भार कमी होतो. हा प्रयोग दुचाकीमध्ये वापरला तरीही फायदा होतो. दुचाकीचे सायलेन्सर लगेच तापते. परंतु या प्रयोगानुसार गाडी सुरू केल्यावरही ते थंड राहते. त्यामुळे सायलेन्सरच्या चटक्यापासून बचाव होऊ शकतो. या सर्वांपेक्षाही महत्वाचे म्हणजे पर्यावरण रक्षण. आपल्या मित्राचा हा फार्म्युला वापरल्याने प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे.

हे सर्व साकारताना राजेंद्रच्या धडपडीला, जिद्दीला कल्पनाशक्तीचे पाठबळ आहे. सध्या शैक्षणिक कर्जावर त्याचे शिक्षण सुरू आहे. इतरही तरुणांनी आदर्श घ्यावा अशीच राजेंद्रची ही जिद्द आणि कल्पनाशक्ती आहे!


  • मोहिनी राणे-देसले, माहिती सहाय्यक
  • No comments:

    Post a Comment