Wednesday, July 25, 2012

आमचे वसतिगृह

लातूर येथे अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या निसर्गरम्य हवेशीर परिसरात सामाजिक न्याय विभागाच्या विभागीय शासकीय वसतिगृहाच्या इमारतीनी नयनरम्य आकार घेतला आहे. आपल्या जीवनाची रंगीबेरंगी स्वप्ने पहाणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या वसतिगृहामुळे आल्हाददायक व भावस्पर्शी अनुभवाचा अविष्कार होतो आहे. एक दिवस या वसतिगृहाला भेट देण्याची संधी मिळाली. या वसतिगृहाचे रूपडे ‍ पाहिले अन ख-याअर्थाने जाणीव झाली शासनाच्या लोककल्याणकारी धोरणाची.

तालुकास्तरावरील वसतिगृहाव्यतिरिक्त मोठया जिल्ह्याच्या ठिकाणी विभागीय वसतिगृहाची संकल्पना राज्यातील सात ठिकाणी राबविली जात आहे. यामध्ये लातूरचा समावेश झाल्याने या परिसरातील मागासवर्गीय जातीतील विविध घटकांच्या विद्यार्थ्यांना लाभ होतो आहे. राज्यातील उर्वरित मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर येथे अद्याप वसतिगृह सुरु होत असून औरंगाबाद व लातूर येथे विभागीय वसतिगृह सुरु झाले आहेत. राज्यात तालुकास्तरावर सामाजिक न्याय विभागाची ३७१ एवढी मुलां-मुलीची शासकीय वसतिगृहे आहेत. त्यामध्ये आता या विभागीय वसतिगृहांची भर पडत आहे.

उपलब्ध तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढल्या आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाही या स्पर्धांना सामोरे जावून आपली प्रगती साध्य करणे या वसतिगृहामुळे शक्य झाले आहे. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी नामवंत व प्रथितयश महाविद्यालये असल्याने अशा महाविद्यालयातून खेड्या-पाड्यातून व दुर्गम भागातून येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो आहे. सध्या या विभागीय वसतिगृहात ३५५ मुलांनी प्रवेश घेतला असून यावर्षासाठी जवळपास साडेसातशे नवीन अर्ज आले आहेत. प्रवेश प्रक्रियेअंती पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. या वसतिगृहात सांस्कृतिक सभागृह, ग्रंथालय, व्यायामशाळा, संगणक प्रयोगशाळा अशा व्यक्तिमत्व विकासाच्या सुविधा पुरविण्यात येत आहेत.

विभागीय स्तरावरील या शासकीय वसतिगृहात २५० क्षमतेची चार युनिट आहेत. त्यापैकी मुलींसाठी २५० क्षमेतेचे एक युनिट आहे. या सर्व चार युनिटसाठी स्वतंत्र गृहप्रमुख व कर्मचारी यांची तरतुद आहे. प्रशस्तरित्या उभारलेल्या दोन इमारतीमध्ये प्रत्येकी १२८ कक्ष आहेत. प्रत्येक कक्षात चार विद्यार्थ्यांना रहाता येते. पंखा, टेबल, कॉट, कपाट, गादी बिछाना २४ तास पाणी इत्यादी मुलभूत सोयी कक्षात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी वीजेची व्यवस्था डायरेक्ट एक्सप्रेस फिडरने केल्याने विद्यार्थ्यांना अत्यंत सोयीचे झाले आहे. येथील विद्यार्थी लातूर शहरातील वैद्यकीय, अभियांत्रिकी, अध्यापन, कला, वाणिज्य, विज्ञान, कृषि इत्यादी महाविद्यालयात प्रवेशित असून वसतिगृहापासून शिक्षण घेण्याची संधी सर्वाना उपलब्ध आहे.

सकाळी साडेपाच वाजल्यापासून दिनचर्या सुरु केली जाते. सकाळी ७-०० वाजता मुलांना भरपेट रुचकर व पौष्टीक नाश्ता दिला जातो. त्यामध्ये २०० एम.एल. दूध, दोन अंडी व आलटून पालटून पोहे, उपीट, शिरा, उसळ असा नाश्ता देण्यात येतो. मुलांच्या सोयीनुसार सकाळी ९-०० ते दुपारी २-०० वाजेपर्यंत जेवण दिले जाते तर रात्रीचे जेवण ७-०० वाजल्यापासून मिळते. आठवड्यातून दोनवेळा फिस्ट असते म्हणजेच नॉनव्हेज व गोड पदार्थ असलेल्या जेवणाचा आनंद मुले घेत असतात. विशेष म्हणजे मानसिक बळ वाढविण्यासाठी दहा दिवस विपश्यना शिबीराला उपस्थित राहण्याची सोय यामध्ये करुन देण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाने २६ जुलै, २०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये वसतिगृहातील विद्यार्थ्यासाठी ३७ प्रकारच्या सोयी सुविधा जाहीर केल्या आहेत. त्यासर्व येथे दिल्या जातात. विभागीय वसतिगृह म्हणजे आता विद्यार्थ्यांना वरदान ठरत असून भविष्यातील उज्वल नागरीक घडण्याकरिता मदत होणार आहे.


  • रामचंद्र देठे, माहिती अधिकारी, लातूर
  • No comments:

    Post a Comment