आमच्या बचत गटाच्या महिलांनी केलेल्या जेवणाचा एकदा आस्वाद घेतला की, तुम्ही पुन्हा पुन्हा आमच्या जेवणाची आठवण करणारच. आमच्या बचत गटामुळे वीस कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला आहे. गटातील महिला आर्थिकदृष्ट्या समर्थ झाल्या असून त्यामुळे गटाचे नावच अधोरेखित झाले आहे. समर्थ महिला बचत गटाच्या अध्यक्षा मालती यादव सांगत होत्या.
कोल्हापुरातील शाहू मिल परिसरातील मालती यादव यांनी १० मार्च २००५ रोजी महिला बचत गटाची स्थापना केली. त्यांच्या बचत गटात वीस सदस्य असून यशश्री गायकवाड या उपाध्यक्षा तर वंदना पाटील या सचिव आहेत. यादव यांनी सुरुवातीला प्रत्येकी १०० रुपये दरमहा गोळा करण्यास सुरुवात केली. त्याद्वारे दरमहा दोन हजार रुपये जमा होऊ लागले. यातून सदस्यांच्या सहकार्याने यादव यांनी केटरींगची ऑर्डर घेण्यास सुरुवात केली.
कोल्हापूर आणि मटणाचे जेवण यांचे अतूट नाते आहे. मांसाहारामध्ये रूची असणारा कोल्हापूरला गेलेला पाहुणा व्यक्ती देखील येथील तांबड्या पांढऱ्या रस्स्याची चव घेतल्याशिवाय राहत नाही. कोल्हापूरकरांची ही आवड ओळखून या बचत गटाने केटरींगचा व्यवसाय निवडला. बचत गटाच्या माध्यमातून जेवण बनवण्याचा व्यवसाय जोम धरू लागल्याने कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा आणि मटणाचे जेवण तयार करण्यासाठी यादव आणि त्यांच्या सर्व सहकारी स्वत: कष्ट घेतात. समर्थ महिला बचत गटाचे जेवण म्हटले की, खवय्यांची गर्दी होते. श्रीमती यादव यांना बँक ऑफ इंडियाचे प्रशिक्षण, महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय येथील विविध बैठका, प्रशिक्षण कार्यक्रमात आवर्जून भोजन व्यवस्था करण्यासाठी सांगितले जाते.
सुरुवातीला प्रत्येक सदस्यांकडून १०० रुपये गोळा केले जात होते. आता सदस्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली असून प्रत्येक सदस्यांकडून २०० रुपये गोळा केले जातात. यातून जमा होणारा निधी व्यवसायाबरोबरच बचत गटातील सदस्यांच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी वापरला जातो. त्यांना एक सक्षम आर्थिक आधार निर्माण झाल्याचे मालती यादव सांगतात.
समर्थ बचत गट भीमथडी, पवनाथडी, वारणा कृषी प्रदर्शन, सातारा महोत्सव, कृष्णाई महोत्सव अशा विविध महोत्सवात सहभागी झाला आहे. त्या-त्या महोत्सवात आता ग्राहक दरवर्षी आमचा स्टॉल शोधत येतात आणि जेवणाचा आस्वाद घेतात, असे यादव आवर्जून सांगतात.
बचत गटाने आता भांडवली गुंतवणूक केली आहे. किमान २०० लोकांना जेवण पुरवू शकेल इतकी साधनसामग्री घेतली आहे, अशी माहितीही श्रीमती यादव यांनी दिली. बचत गटाने वैनगंगा-कृष्णा ग्रामीण बँकेतून कर्ज घेतले आहे. मोठ्या प्रमाणावर भोजन व्यवस्था करावयाची असल्यास कर्जातून ठराविक रक्कम काढली जाते. त्याचबरोबर सर्व सदस्यांकडून पैसे घेऊनही एखाद्या कामासाठी निधी उभारणी केली जाते. संबंधित कामाचे पैसे मिळाल्यावर झालेला नफा बचत गटाच्या खात्यावर जमा करुन उर्वरित रक्कम सदस्यांना परत दिली जाते, असेही त्यांनी सांगितले.
बचत गटातील सहभागामुळे मुलांचे शिक्षण व्यवस्थित होऊ लागले आहे. आमच्या अर्थिक अडचणींवर आम्ही मार्ग काढण्यास समर्थ झालो आहोत, असे गटातील सदस्य महिलांचे म्हणणे आहे.
No comments:
Post a Comment