Sunday, July 8, 2012

हरिश्चंद्रगड किल्ला....अहमदनगर, किल्ला, ट्रेक, पर्यटन


हरिश्चंद्रगड किल्ला Harishchandragad Fort – ४००० फुट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे
अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.
पुण्याहून नाशिक मार्गावर आळेफाटा येथे येऊन कल्यान मुरबाडकडे जाणार्‍या हमरस्त्यावर माळशेज घाटाच्या अलीकडे खुबी हे गांव आहे. येथे उतरून खुबी रस्त्याने खिरेश्वर गावातून गडावर जाण्यासाठी पायी रस्ता आहे. ( पायी अंतर ४ ते ५ तास ) हा गड पूर्व-पश्चिम असा पसरला आहे. पश्मिमेला कोकणकडा हा एक अद्वितीय निसर्गाविष्कार आहे. अर्धवर्तुळाकार आणि डोकावणाऱ्या ह्या कातळकड्याची सरळ उंची १५०० फूट आहे. खिरेश्वर येथील एक प्रेक्षणीय मंदिर व लेणे धरणाच्या पाण्याखाली गेले आहे.
हरिश्चंद्रगड म्हणजे नगर जिल्ह्याचे महाबळेश्वर ! ठाणे, पुणे आणि नगर यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड, एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. इतर सर्व किल्ल्यांना मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहेत हरिश्चंद्रगडाला तर दोन चार हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहुबाजूंनी नटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्राचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात व मत्स्यपुराणात आढलतो. १७४७ – ४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.
गडावरील पहाण्यासाखी ठिकाणे : टोलारखिंडीच्या वाटेने गडावर आल्यावर आपण रोहीदास शिखरापाशी पोहचतो. येथून तास दीड तासात आपण तारामती शिखरापाशी पोहचतो. पायथ्याशीच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे.
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर : तळापासून या मंदिराची उंची साधारणतः सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच ‘मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहाआहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत ‘चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केल आहे असे स्थानिक गावकरी सांगतात.
‘शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा । मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥ हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु । सुरसिद्ध गणी विरुयातु । सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥ मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान । ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥ जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति । आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा ॥’ हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबावर, भिंतीवर आढळतात. श्री चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून ‘तत्वसार’ नावाचा ग्रंथ लिहिला. येथील एका शिलालेखावर, चक्रपाणी वटेश्वरनंदतु । तस्य सुतु वीकट देऊ ॥ अशा ओळी वाचता येतात. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक छोटे मंदिर आहे. यातही महादेवाची पिंड आहे. या छोट्या मंदिरासमोरच एकभाग्न अवस्थेतील मूर्ती आहेत. त्यातील पाषाणावर राजा हरिश्चंद्र डोंबाऱ्यांच्या घरी कावडीने पाणी भरत असलेला प्रसंग चित्रित केला आहे.
केदारश्वराची गुहा : मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एकगुहा लागते. याला केदारेश्वराची गुहा असेही म्हणतात. या गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कमरभर पाणी आहे. ही गुहा खरंतर चार खांबावर तोलली होती पण सद्यःस्थितीला एकच खांब शाबूत आहे. याच गुहेत एक खोलीही आहे. खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास बर्फतुल्य पाण्यातून जावे लागते.
तारामती शिखर : तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. साधारणतः उंची ४८५० फूटा. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फूटाची भव्य आणि सुंदरमूर्ती आहे. याच गणेशगुहेच्या आजुबाजुला अनेक गुहा आहेत. यातही राहण्याची सोय होते. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुख आढळतात. माथ्यावर दोन ते तीन शिवलिंग आढळतात.
कोकणकडा : कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण. कोकणकडा म्हणजे गिर्यारोहकांना आकर्षणाचे स्थान. अर्ध्या किलोमीटर परिघाचा , वाटीसारखा अर्धगोल आकाराचा काळाकभिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेवाद्वितीय असावा. कड्याची सरळधार १७०० फूटा भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणतः ४५०० फूट भरते. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे. १८३५ मध्ये कर्नल साईक्सला येथे आहे.
गडावर चहापाण्याची व जेवणाची सोय होते. पावसाळ्यात मात्र या गडाचे सौंदर्य काही औरच असते. विविधता या गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारावीच्या जाळी, धायटी, उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागातील प्राणीवैभव मात्र शिकाऱ्यामुळे बरेच कमी झाले आहे. तरीही कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी आढळतात. गडाचे सर्वोच्च शिखर तारामतीवरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो. अशा तऱ्हेने अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड ‘ट्रेकर्सची पंढरी’ ठरतो.
गडावर जाण्याच्या वाटा : हरिश्चंद्रगड पूर्ण पाहवयाचा असल्यास दोनते तीन दिवसांची सवड हवी. गडाचा घेरा फार मोठा असल्याने गडावर जाण्याच्या वाटाही फार आहेत.
खिरेश्वर गावातून वाट : सर्वात प्रचलित असणारी वाटही खिरेश्वर गावातून गडावर येते. या वाटेने येण्यासाठी पुण्याहून आळेफाटा मार्गे अथवा कल्याणहून मुरबाड-माळशेज घाट मार्गे खुबी फाट्यास उतरावे. खुबी फाट्यावरून धरणावरून चालत गेल्यावर ५ कि.मी. अंतरावर खिरेश्वर गाव लागते. हरिश्चंद्रगडावर जाताना खिरेश्वर गावातून अदमासे एक कि.मी. अंतरावर खिरेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर अकराव्या शतकातील यादवकालीन मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरील सभामंडप छताला शिल्प पट्टीका बसवलेले आहे. आतील गाभारा असलेल्या दाराच्या माथ्यावर शेषयायी विष्णू व परिवाराचे अप्रतिम कोरीव शिल्प आहे. मूषकवाहन मकर-रति, अशा अनेक कोरीव प्रतिमा येथील पाषाणावर आढळतात. या मंदिराला ‘नागेश्वराचे मंदिर’ असेही म्हणतात. या गावातून दोन वाटा गडावर जातात. १. एक वाट ही टोलार खिंडीतून गडावर सुमारे ३ तासात मंदिरापर्यंत पोहचते. २. दुसरी वाट ही राजदरवाजाची वाट आहे. ही वाट पूर्वी प्रचलित होती. आता मात्र वाटाड्याशिवाय या वाटेने गडावर जाऊ नये. या वाटेने आपण गडाच्या जुन्नर दरवाज्यापाशी पोहचतो. या मार्गाने जाताना गावातील विहिरीतून पाणी भरून घेतले पाहिजे कारण वाटेत कुठेच पाणी नाही.
नगर जिल्ह्यातून : हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट ही नगर जिल्ह्यातून आहे. यासाठी मुंबई-नाशिक हमरस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी जावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते. १. राजुर-पाचनई अशी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ कि.मी. भरते. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे ३ तास लागतात. वाट फारच सोपी आहे. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे ६ कि.मी. आहे. २. हल्लीच राजूर ते टोलारखिंड अशी खाजगी वाहनसेवा उपलब्ध झाली आहे.
राजूर, अंबीट, पाचनई, मूळा नदीच्या खोऱ्यातून, धनचक्कर या बालेश्वर रांगेतील टेकाडास वळसा घालून ही वाट टोलारखिंडीत पोहचते. ही वाट सरळ एक तासात टोलारखिंडीत घेऊन जाते. समोरच एक व्याघ्रशिल्प आढळते. येथून वर जाणारा रस्ता हा दमछाक करणारा आहे. येथून २ तासात मंदिरात पोहचता येते.
सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटमार्ग : गड सर करण्यासाठी एक सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटामार्ग आहे. परंतु हा मार्ग फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबाना. या मार्गे येण्यासाठी कल्याण-मुरबाड मार्गे माळ्शेजघाट चालू होण्यापूर्वी सावर्णेगावात उतरावे. येथून ‘बेलपाडा’ या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे. येथून कड्यातून काढलेल्या साधले घाटाच्या सहाय्याने कोकणकड्याच्या पठारावर जाता येते. या वाटेने मंदिर गाठण्यास सुमारे दीड दिवस लागतो. या वाटेलाच ‘नळीची वाट’ असेही म्हणतात.
राहण्याची सोय : गडावर हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या मागच्या गुहेत आणि गणेशगुहा व आजुबाजूच्या गुहेत सहता येते.
जेवणाची सोय : जेवणाची सोय गडावर जेवणाची सोय उपलब्ध आहे.
पाण्याची सोय : पाणी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : खिरेश्वर मार्गे ४ तास तर पाचनई मार्गे ३ तास लागतात.

No comments:

Post a Comment